केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही मतमोजणी सुरू; निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

पणजी : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सोमवार, ४ मे २०२६ रोजी सुरुवात झाली आहे. केरळ, आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या ४ राज्यांमध्ये व एका केंद्रशासित प्रदेशात मतमोजणीची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असून सुरुवातीचे कल समोर येत आहेत. मतमोजणीच्या या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काही राज्यांमध्ये भाजपला आघाडी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार सकाळी १० वाजेपर्यंतची राज्यनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
१) आसाम: भारतीय जनता पक्ष ५२ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस १५ जागांवर पुढे आहे.
२) पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजप आणि इतर प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये जोरदार चुरस सुरू असून निकालांबाबत अनिश्चितता कायम आहे. भाजप १० वाजेपर्यंत ३०+ जागांवर आघाडीवर होता तर १६ जागांवर तृणमूल आघाडीवर होता.
३) तामिळनाडू:अभिनेता विजय यांचा टीव्हीके (TVK) पक्ष ४७ जागांसह आघाडीवर असून अण्णाद्रमुक (ADMK) ४४ जागांवर पुढे आहे; तर द्रमुक (DMK) सध्या २० जागांवर आघाडीवर आहे.थलपती विजय यांचा पक्ष तामिळनाडूच्या निवडणुकीत X फॅक्टर बनून समोर आला आहे.
४) केरळ: काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे, तर सीपीएम (CPIM) २९ जागांवर आघाडी मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
५) पुडुचेरी: एआयएनआरसी (AINRC) ८ जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला ३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
सध्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्या सुरू असून, अंतिम आणि अधिकृत निकाल येत्या काही तासांत स्पष्ट होतील. या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.