गोवा-कर्नाटकच्या सीमाभागात आरोग्य व्यवस्थाच व्हेंटीलेटरवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा-कर्नाटकच्या सीमाभागात आरोग्य व्यवस्थाच व्हेंटीलेटरवर

जोयडा : एका बाजूला विकासाचे मोठे दावे केले जात असताना, गोवा-कर्नाटक सीमेवरील जोयडा तालुक्यातील डिग्गी या दुर्गम भागात मूलभूत आरोग्य सुविधांअभावी एका डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे. डिग्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. लेन्सर लोबो यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सरकारी आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री डॉ. लोबो यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. मात्र, डिग्गी परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, अत्यंत अपुरी वाहतूक व्यवस्था आणि मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. शुक्रवारी सकाळी स्कोडवेस (Scodwes) संस्थेच्या वाहनामधून त्यांना जोयडा आरोग्य केंद्रात हलवण्यात येत असताना, वाटेतच त्यांची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला.

जोयडा तालुक्यात डॉक्टरांची कमतरता असल्याने शिरसी येथील 'स्कोडवेस' संस्था कराराच्या तत्त्वावर डिग्गी आरोग्य केंद्र चालवते. डॉ. लोबो गेली तीन वर्षे या दुर्गम भागात कार्यरत होते. जंगलांनी वेढलेल्या आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागात त्यांनी निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा केली. कर्नाटक-गोवा सीमेलगतच्या अनेक गावांतील नागरिक उपचारांसाठी त्यांच्यावर अवलंबून होते.

आपल्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि रुग्णांविषयीच्या कळकळीमुळे डॉ. लोबो परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संताप

या घटनेमुळे ‘जर डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय?’, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचा अभाव, रुग्णवाहिकेची अनुपलब्धता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच हा प्रकार घडल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा