सहा जणांना अटक

भोपाळ : एका माजी विद्यार्थ्यानेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दिल्लीतील नामांकित IAS कोचिंग इन्स्टिट्यूटच्या महिला संचालिकेला ओलीस ठेवून तब्बल १.८९ कोटी रुपये लुटल्याची खळबळजनक घटना भोपाळमध्ये घडली आहे. भोपाळ पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली आहे.
शुभ्रा रंजन असे पीडित महिला संचालिकेचे नाव आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रियंक शर्मा हा शुभ्रा यांच्याच संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. नवीन केंद्र उघडणे आणि सेमिनारचे आयोजन करण्याच्या बहाण्याने प्रियंकने शुभ्रा यांना २९ एप्रिल रोजी भोपाळला बोलावले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या, तिथून त्यांना एका भाड्याच्या सदनिकेत नेण्यात आले.
शुभ्रा यांना सदनिकेत डांबून सशस्त्र आरोपींनी त्यांच्यावर बंदुका रोखल्या आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या धाकाखाली त्यांच्याकडून १.८९ कोटी रुपये 'जनकशिला' आणि 'आरएस एंटरप्रायझेस' यांसारख्या विविध बँक खात्यांत ऑनलाइन ट्रान्सफर करून घेण्यात आले. पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून घरात धार्मिक कार्यक्रमाचा बनावट देखावा करण्यात आला होता. तसेच, त्यांना घाबरवण्यासाठी एका सहकाऱ्याच्या अपहरणाचा बनावट व्हिडिओही आरोपींनी तयार केला होता.
शुभ्रा रंजन यांनी सुटका झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी पोलीस ठाणे गाठले. गुन्हे शाखेने तातडीने हालचाली करत ट्रान्सफर केलेली रक्कम गोठवली. अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी प्रियंक शर्मा आजारपणाचे नाटक करून एम्स भोपाळमध्ये दाखल झाला होता. मात्र, पोलिसांनी तिथूनच त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कुटुंबाने पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घातला.
पोलीस आयुक्त संजय कुमार आणि अतिरिक्त आयुक्त मोनिका शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रोहित मालवीय, दीपक भगत, विकास उर्फ विक्की दहिया, कुणाल यादव आणि पंकज अहिरवार यांना विविध ठिकाणांहून अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात प्रियंक शर्मा हा पैसे लुटून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. या कटात त्याच्या पत्नीचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.