केरळमध्ये सत्तांतराचे वारे: काँग्रेसप्रणित यूडीएफची मुसंडी, मुख्यमंत्र्यांसह डावे पिछाडीवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28 mins ago
केरळमध्ये सत्तांतराचे वारे: काँग्रेसप्रणित यूडीएफची मुसंडी, मुख्यमंत्र्यांसह डावे पिछाडीवर

केरळ : विधानसभेच्या मतमोजणीत आज सकाळी अत्यंत धक्कादायक आणि मोठे कल समोर आले आहेत. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट दिसत असून, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) जोरदार मुसंडी मारली आहे. १४० जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागांची आवश्यकता असताना, मतदानाच्या तिसऱ्या तासाअखेर यूडीएफने ९१ जागांवर आपली आघाडी मजबूत केली आहे. या निकालांमुळे केरळच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडण्याचे संकेत मिळत आहेत.

या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या रूपाने समोर आला आहे. कन्नूर जिल्ह्यातील डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धर्मदाम मतदारसंघातून मुख्यमंत्री विजयन सध्या दोन हजार मतांनी पिछाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत ५० हजारांहून अधिक मताधिक्क्याने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची ही पिछाडी डाव्या आघाडीसाठी मोठे चिंतेचे कारण ठरली आहे. दुसरीकडे, एलडीएफला सध्या केवळ ४६ जागांवर आघाडी मिळवता आली आहे, जे त्यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठे अपयश मानले जात आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी देखील हे निकाल संमिश्र आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर नेमम मतदारसंघातून १३०० मतांनी आघाडीवर आहेत. सडीघडीला केरळमध्ये भाजप तीन जागांवर आपले अस्तित्व दाखवताना दिसत आहे. काँग्रेसच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण आहे. व्ही. डी. सतीशन, रमेश चेन्नीथला आणि के. मुरलीधरन यांसारखे दिग्गज नेते आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत. मात्र, पेरावूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांना माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी कडवे आव्हान दिले असून ते सध्या ३०० मतांनी पिछाडीवर आहेत.

यूडीएफचा मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) मलबार भागात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली असून लढवलेल्या २७ जागांपैकी २१ जागांवर त्यांनी आघाडी मिळवली आहे. एक्झिट पोलमध्ये यूडीएफला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु केवळ एकाच पोलने ९० जागांचा आकडा पार करण्याचा अंदाज दिला . तो अंदाज सध्या खरा ठरताना दिसत असून केरळच्या जनतेने स्पष्टपणे परिवर्तनाला साथ दिल्याचे चित्र या निकालांतून उमटले आहे.

हेही वाचा