अमेरिकेने इराणचा १४ मुद्द्यांचा प्रस्ताव फेटाळला

होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांना मार्गदर्शन करणार : अमेरिका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
अमेरिकेने इराणचा १४ मुद्द्यांचा प्रस्ताव फेटाळला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी इराणकडून सादर करण्यात आलेला ताज्या १४ मुद्द्यांचा प्रस्ताव फेटाळत तो “अस्वीकार्य” असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट करण्यासाठी इराणने हा प्रस्ताव मांडला होता.

या प्रस्तावानुसार, पहिल्या टप्प्यात ३० दिवसांच्या आत युद्धविराम लागू करून होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz ) खुली करण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर पुढील टप्प्यात अमेरिकेची नाकेबंदी उठवणे आणि नंतर इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा सुरू करणे अपेक्षित होते. तसेच अणुसंपन्नतेवर (न्यूक्लियर एनरिचमेंट) १५ वर्षांची मर्यादा घालण्याचाही मुद्दा या प्रस्तावात असल्याचे वृत्त आहे. मात्र, ट्रम्प यांनी हा प्रस्ताव अभ्यासल्यानंतर तो नाकारत इराणने “पुरेशी किंमत चुकवलेली नाही” असे मत व्यक्त केले.

होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांसाठी अमेरिकेची “मार्गदर्शन मोहीम”  

दरम्यान, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी सोमवारपासून “मार्गदर्शन मोहीम” सुरू करण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांनी त्यांच्या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेकडे मदत मागितल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. “प्रोजेक्ट फ्रीडम” नावाच्या या उपक्रमाला त्यांनी “मानवीय प्रयत्न” असे संबोधले आहे.

अडथळा आल्यास कठोर कारवाई : ट्रम्प

या सामुद्रधुनीत अडकलेल्या अनेक जहाजांवर अन्न व आवश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याची माहिती देत, या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास कठोर कारवाईचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

दरम्यान, इस्लामीक रेव्होल्युशनरी गार्ड कोर्प्स (Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ) कडूनही कठोर प्रतिक्रिया देण्यात आली असून, अमेरिकेसमोर “अशक्य मोहिम किंवा वाईट करार” यापैकी एक पर्याय असल्याचे म्हटले आहे.

तसेच, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट्ट बेसेंट  यांनी इराणवर आर्थिक नाकेबंदीमुळे तीव्र दबाव निर्माण झाल्याचा दावा केला आहे. “इराण सरकार आर्थिकदृष्ट्या गुदमरले आहे,” असे त्यांनी नमूद केले. एकंदरीत, युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव कायम असून, होर्मुझ सामुद्रधुनी आणि अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा