सलग काही दिवस २८ अंशांपेक्षा जास्त रात्रीचे तापमान नोंदवले जाणे म्हणजे हवामानात मूलभूत बदल होत आहेत हेच दिसून येते. १९९५ च्या विक्रमाजवळ पोहोचलेले तापमान हे दाखवते की, गेल्या काही दशकांत उष्णतेची पातळी सातत्याने वाढत आहे.

जगभरात तापमानाची वाढ ही आता केवळ आकडेवारीपुरती दिसणारी गोष्ट राहिलेली नाही; ती प्रत्यक्ष आयुष्यात जाणवणारी कठोर वास्तवता बनली आहे. या व्यापक संकटाचा परिणाम आज प्रत्येक देशावर, प्रत्येक समाजघटकावर आणि प्रत्येक व्यक्तीवर होत आहे. भारतासारख्या विकसनशील देशासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे, कारण येथे लोकसंख्या प्रचंड, संसाधने मर्यादित आणि विकासाची गरजही तितकीच तीव्र आहे. एकेकाळी एप्रिल-मे महिन्यापुरती मर्यादित असलेली तीव्र उष्णता आता मार्चपासूनच जाणवू लागते आणि अनेकदा जूनपर्यंत टिकते. यामुळे उष्माघात, निर्जलीकरण, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, शेतकरी, बांधकाम कामगार हे सर्वच सर्वाधिक असुरक्षित ठरतात. शहरांमध्ये नव्याने उभ्या राहिलेल्या बांधकामांमुळे काँक्रिटच्या जंगलात तापमान अधिक वाढते. झाडांची कमतरता, वाढती वाहतूक आणि प्रदूषण यामुळे शहरातील नागरिक अक्षरशः उष्णतेच्या कचाट्यात सापडले आहेत. गोव्यात बुधवारची रात्र ही अर्धशतकातील तिसरी सर्वाधिक उष्ण रात्र ठरली. ही केवळ हवामानाची नोंद नाही; ती आपल्या काळातील सर्वात मोठ्या संकटाचा, म्हणजेच हवामान बदलाचा स्पष्ट इशारा आहे. दिवसाच्या कडक उन्हाची सवय आपण करून घेतली आहे, पण आता रात्रीही तापमान कमी न होणे, ही चिंतेची नवी पातळी आहे.
परंपरेने रात्री म्हणजे विश्रांती, शीतलता आणि निसर्गाची शांतता. परंतु जेव्हा रात्रीचे तापमान २८ अंशांच्या वरच राहते, तेव्हा ही नैसर्गिक समतोलाची साखळी तुटू लागते. या स्थितीमुळे शरीराला उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेला वेळच मिळत नाही. परिणामी, माणूस सतत उष्णतेच्या ताणाखाली राहतो. रात्रीचे वाढते तापमान हे दिवसाच्या उष्णतेपेक्षा अधिक धोकादायक मानले जाते. कारण दिवसा आपण सावली, पंखे, वातानुकूलन यांचा आधार घेतो; पण रात्री शरीराला नैसर्गिकरीत्या थंड होणे अपेक्षित असते. तेच जर घडले नाही, तर त्याचे परिणाम गंभीर होतात. झोपेचा अभाव, मानसिक तणाव, हृदयविकारांचा वाढता धोका, उष्माघात हे सगळे परिणाम आता केवळ सैद्धांतिक राहिलेले नाहीत. विशेषतः वृद्ध, लहान मुले, आणि बाहेर काम करणारे कामगार यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम होतो. गोव्यासारख्या दमट हवामान असलेल्या प्रदेशात ही समस्या अधिक तीव्र आहे. आर्द्रता आणि उष्णता यांचे मिश्रण शरीरासाठी अधिक घातक ठरते. गोवा हे भारतातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. त्याची ओळखच समुद्रकिनारे, थंडगार वारा आणि आरामदायी वातावरण अशी आहे. परंतु जर रात्रीसुद्धा उष्णतेने हैराण करणाऱ्या ठरल्या, तर पर्यटकांचा अनुभव बिघडू शकतो. मासेमारी, शेती, लहान उद्योग हे सर्व हवामानावर अवलंबून आहेत. उष्णतेचा दीर्घकालीन परिणाम उत्पादनावर आणि रोजगारावरही होऊ शकतो.
सलग काही दिवस २८ अंशांपेक्षा जास्त रात्रीचे तापमान नोंदवले जाणे म्हणजे हवामानात मूलभूत बदल होत आहेत हेच दिसून येते. १९९५ च्या विक्रमाजवळ पोहोचलेले तापमान हे दाखवते की, गेल्या काही दशकांत उष्णतेची पातळी सातत्याने वाढत आहे. यामागे शहरीकरण, जंगलतोड, वाढते कार्बन उत्सर्जन आणि अनियंत्रित विकास या सगळ्या घटकांचा हात आहे. शहरी भागात हरित क्षेत्र वाढवणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. झाडे ही नैसर्गिक कूलिंग सिस्टीम आहेत. परंतु शहरांमध्ये काँक्रिटचे जंगल वाढत आहे आणि उष्णता साठवणाऱ्या पृष्ठभागांची संख्या वाढत आहे. सरकारवर सर्व दोष टाकून चालणार नाही. नागरिकांनीही आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे, ऊर्जेचा संयमी वापर, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे असे उपाय करावे लागतील. देशाचा विचार केला तर उष्णतेचा सर्वात मोठा फटका शेतीला बसतो आहे. गहू, तांदूळ, डाळी यांसारख्या मुख्य पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. जमिनीतील आर्द्रता कमी होत असल्याने पिकांना आवश्यक पोषण मिळत नाही. शिवाय, वाढत्या तापमानामुळे कीड आणि रोगांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, अन्नधान्याचा तुटवडा आणि महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाण्याची टंचाई ही भविष्यातील नव्हे, तर सध्याची समस्या बनली आहे. पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे आणि शेतीत ठिबक सिंचनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. प्रत्येक थेंब महत्त्वाचा ही मानसिकता समाजात रुजवावी लागेल. आज जर आपण ठोस पावले उचलली, तर उद्याचा धोका टाळता येईल. अन्यथा, येणाऱ्या पिढ्यांना आपण एक अस्थिर, उष्ण आणि नैसर्गिक साधानसपत्ती नसलेले जग देत आहोत, जिथे जगणेच सर्वात मोठे आव्हान असेल.