पश्चिम बंगालात सत्ता कोणाची? उत्सुकता शिगेला

Story: राज्यरंग |
30th April, 10:48 pm
पश्चिम बंगालात सत्ता कोणाची? उत्सुकता शिगेला

संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. १५ वर्षांनंतर सत्तापरिवर्तन होण्याचे अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्या अर्थात ‘एक्झिट पोल’मधून व्यक्त झाले आहेत. ७ पैकी ५ चाचण्यांनी भाजप बहुमताचा जादुई आकडा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. दोन चाचण्यांनी मात्र ममता बॅनजी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसच सत्तासिंहासनावर विराजमान होईल, असे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्यांदा सत्ता राखणार की, जनता भाजपकडे राज्याच्या तिजोरीची चावी सोपवणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.

बंगाली अस्मिता, महिलांचे हक्क, लोकप्रिय योजना, मतदार फेरतपासणी मोहीम, बंगालबाहेरील पक्षाची (भाजप) घुसखोरी, अशा मुद्द्यांवर झंझावती प्रचार करून ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपला यावेळी राज्यात सत्तेची संधी दिसू लागली आहे. तृणमूल काँग्रेसची कथित गुंडगिरी, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, राम-दुर्गा अशा मुद्द्यांभोवती भाजपचा प्रचार केंद्रित होता. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज प्रचारात उतरले होते. दोन्ही टप्प्यांत मिळून ९२.४७ टक्के मतदान झाले. स्वातंत्र्यानंतरचा हा विक्रम आहे. भाजपला सत्ता मिळाली तर राज्यात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होऊ शकेल. 

यंदाच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे चर्चेत होती. तृणमूलमधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर यांनी ‘आम जनता उन्नयन पार्टी’ स्थापन केली. त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाशी युती केली. या आघाडीमुळे काही मुस्लिमबहुल मतदारसंघांत तृणमूलला फटका बसण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला होऊ शकतो.

२९४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता आहे. ‘मॅट्रिझ’च्या एक्झिट पोलनुसार, तृणमूलला १४० ते १६० जागा, तर भाजपला १३० ते १५० जागा मिळू शकतात. इतर पक्षांना ८ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अटीतटीच्या लढतीच्या अंदाजामुळे सरकार कोणाचे स्थापन होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.

या आधीच्या २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने २९४ पैकी तब्बल २१५ जागा जिंकून तब्बल ४८ टक्के मतांसह एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र यंदा परिस्थिती बदलली असून भाजपने कडवे आव्हान निर्माण केले आहे. विक्रमी मतदानानंतर जनतेचा कौल नेमका कोणाकडे आहे? ममता बॅनर्जी सत्तास्थापनेची 'हॅट्ट्रिक' साधणार की भाजप इतिहास घडवणार? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ४ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रदीप जोशी