संख्या वाढवण्यासाठी प्रवेश नको

शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य पुढे उज्ज्वल व्हावे, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी फक्त विद्यार्थी भरून आपल्या शिक्षण संस्थेत त्यांची संख्या वाढवून चालणार नाही. आपल्या संस्थेत शिकलेला विद्यार्थी पुढे काय करणार, त्याचीही तयारी शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी करायला हवी.

Story: संपादकीय |
27th April, 10:09 pm
संख्या वाढवण्यासाठी प्रवेश नको

गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल ९४.५१ टक्के तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ९२.९६ टक्के लागला आहे. हा निकाल समाधानकारक आहे. दोन्ही परीक्षांमध्ये बरीच सुधारणा झाली. परीक्षा होऊन अवघ्या काही दिवसांत निकाल लावण्यावर गोवा शालान्त मंडळाने भर दिल्यामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल गेल्या काही वर्षांत लवकर जाहीर होत आहेत. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश देताना, केवळ पटसंख्या वाढवण्यासाठी भरती न करता, विद्यार्थ्यांची आवड काय आहे आणि कोणत्या क्षेत्रात त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे, याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अनेक विद्यार्थी दहावीनंतर आपल्या झेपपलीकडे असलेल्या विद्याशाखेत प्रवेश घेतात आणि नंतर कंटाळून पुढे ती शाखा बदलतात. अशा विद्यार्थ्यांना नेमके काय शिकायचे आहे, त्याची जाणीव नसते. काही वेळा पालक सांगतात म्हणून कला, विज्ञान, वाणिज्यसारख्या विद्याशाखेत मुले प्रवेश घेतात. शिक्षक व्हायचे नसले, तरीही बारावीनंतर मुलांना बीएडला पाठवले जाते. कोणाला नर्सिंगला पाठवतात. मुलांच्या मनात नसताना त्यांच्यावर जबरदस्तीने वेगवेगळ्या शाखांचे शिक्षण लादण्याचा प्रयत्न होतो. ते होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्या विषयाची आवड आहे किंवा पुढे कुठल्या क्षेत्रात जायचे आहे, त्याची विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन केले तर खऱ्या अर्थाने कौशल्य विकास होईल. कारण त्याच विषयात विद्यार्थी पुढे प्रगती करू शकतो, आवश्यक ते व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतो. यासाठी अकरावीत किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ‘मेन्टॉर’ची भूमिका घेतली तर विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना आवाहन करून केवळ आपल्या शिक्षण संस्थेची पटसंख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नका, तर त्याऐवजी त्यांना कुठल्या विषयात रस आहे त्याची चौकशी करून मार्गदर्शन करा, असे म्हटले आहे. अनेक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्याची गुणवत्ता पाहतात आणि सरासरी शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना मागे ठेवतात. त्यापेक्षा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला कोणत्या विषयात रस आहे, हे ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करावे. फक्त शालेय अभ्यासच नव्हे तर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी चमकू शकतात अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी, त्याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

सध्या राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. त्या परीक्षांचे निकाल पाहिले तर साध्या साध्या पदांसाठी नापास होणाऱ्यांची किंवा त्यांच्या निकषात न येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. यावरून आपली शिक्षण पद्धत नेमकी काय आहे, त्याचा अंदाज येईल. कर्मचारी भरती आयोगच नव्हे तर गोवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतही निकषांप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी आहे. काहीवेळा ही संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असते. अशा पद्धतीने जर विद्यार्थी फक्त पुढे ढकलले जात असतील, तर नोकरीच्या संधी कशा मिळतील? दहावीची पायरी ओलांडली की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये रस निर्माण होईल, अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. बारावीत आलेल्या मुलांना या स्पर्धा परीक्षांची जास्त आवड निर्माण होईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दहावीनंतर पदवीपर्यंत परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, ही खरी गरज आहे. ज्या पद्धतीने उच्चशिक्षित विद्यार्थी नोकरीच्या परीक्षांमध्ये मागे पडतात ते पाहता आपल्या शिक्षण पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते. हे बदल म्हणजे अभ्यासक्रम नव्हे, तर कौशल्य विकास गरजेचा आहे. शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य पुढे उज्ज्वल व्हावे, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी फक्त विद्यार्थी भरून आपल्या शिक्षण संस्थेत त्यांची संख्या वाढवून चालणार नाही. आपल्या संस्थेत शिकलेला विद्यार्थी पुढे काय करणार, त्याचीही तयारी शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी करायला हवी.