‘नवो खांब’चा फेरेरांचा दावा : इतिहासकार, हिंदुत्ववाद्यांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जुने गोवा येथे असलेल्या ऐतिहासिक खांबाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी तो खांब ‘नवो खांब’ असल्याचा दावा केला आहे. हातकातरो खांबाविषयी पुरावे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे यांनी या खांबावर फक्त गुन्हेगारांचे हात कापले जात होते, असे म्हटले आहे, तर हिंदुत्ववादी संघटनांनी जुने गोवे येथे उत्खनन करून सत्य शोधण्याची मागणी केली आहे.
जुने गोवे येथील हातकातरो खांबाचे खरे नाव ‘पेलोरिन्हो नोवो’ म्हणजे नवा खांब असे आहे. ३०-४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारावर त्याचा ‘हातकातरो खांब’ असा उल्लेख केला जात आहे. या खांबावर लोकांचे हात कापल्याचे ऐतिहासिक पुरावे नाहीत. गौतम खट्टरने एका व्हिडीओत याचा उल्लेख केल्यावर गोवा सरकारने ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले, असा दावा आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला.
एका वर्षापूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गौतम खट्टरने हातकातरो खांबाचा विषय घेऊन सेंट झेवियर यांचा उल्लेख एका व्हिडीओत केला होता. या व्हिडीओवरून अॅड. फेरेरा यांनी खट्टरविरोधात नवी तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर अॅड. फेरेरा बोलत होते. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी खट्टरने सेंट झेवियर यांच्यावर व्हिडीओ काढून त्यांना आतंकवादी संबोधत आम्ही आयुष्यात न ऐकलेल्या वाईट गोष्टी कथन केल्या होत्या. त्यासाठी एक वेगळी घटना म्हणून त्याचे सर्व शब्द लिहून तक्रार दाखल केली आहे, असे अॅड. फेरेरा यांनी सांगितले.
जुने गोवे येथील खांबाचे खरे नाव ‘पेलोरिन्हो नोवो’ म्हणजे ‘नवाे खांब’ असे आहे. या खांबाजवळ नव्या गावाची घोषणा होत होती. त्या खांबावर लोकांचे हात कापले जात होते, असे सांगून एक पॅटर्न तयार केला, असा आरोप अॅड. फेरेरा यांनी केला. लोकांनी हा व्हिडीओ पाठवल्यावर मी त्याची पडताळणी करून तक्रार दाखल केली. पोलिसांना व्हिडीओची लिंक दिली आहे, असेही अॅड. फेरेरा म्हणाले.

‘हातकातरो’ हे खांबाचे अधिकृत नाव नाही : प्रजल साखरदांडे
इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे यांनी या खांबाविषयी माहिती देताना सांगितले की, या खांबाच्या खालील दगडावर ‘पेलोरिन्हो नोवो’ असे लिहिलेले आहे. या खांबाला स्थानिक भाषेत ‘हातकातरो’ म्हणत असले तरी ते त्याचे अधिकृत नाव नाही. अधिकृत दस्तावेजानुसार या खांबाला पोर्तुगीजांनी ‘पेलोरिन्हो नोवो’ असे नाव दिले आहे. पेलोरिन्हो या शब्दाचा अर्थ दंड असा होतो. या जागी गुन्हेगारांना बांधून त्यांचे हात कापले जात होते. पूर्ण गोव्यात असा एकच खांब आहे. ५ मे रोजी तो संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचित केला जाणार आहे.

शास्त्रीय पद्धतीने उत्खनन आवश्यक : नितीन फळदेसाई
हातकातरो खांबाबाबत पुरावे नाहीत, असे आमदार फेरेरा म्हणतात. निर्णय खरोखरच पुराव्यावर आधारित घ्यायचा असेल, तर संभाव्य पुरावे जिथे असल्याचा दावा केला जातो, त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करणे आवश्यक आहे. हातकातरो खांब संदर्भातील पुरावे जुने गोव्याच्या चर्चखाली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही वर्षांपूर्वी माजी पुरातत्व खाते प्रमुख के. के. मोहम्मद यांनी यासंदर्भात प्रयत्न केले होते; मात्र त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने ती प्रक्रिया थांबविली. त्यामुळे वैज्ञानिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. उत्खनन प्रक्रियेची सुरुवात सॅ-कॅथेड्रलचा परिसर आणि पालास द इंक्विजिशनच्या जागी करावी, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य सह-समन्वयक नितीन फळदेसाई यांनी केली आहे.