हुकूमशाहीला घाबरणार नाही : युरी आलेमाव

समन्सला उत्तर देण्यासाठी पणजी पोलिसांसमोर हजर


27th April, 11:39 pm
हुकूमशाहीला घाबरणार नाही : युरी आलेमाव

पणजी पोलीस स्थानकाबाहेर पत्रकारांशी बोलताना युरी आलेमाव. सोबत आमदार वीरेश बोरकर व इतर.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जमिनींचे रूपांतरण रोखण्यासाठी आम्ही ‘३९ अ’ विरोधात शांततेत आंदोलन केले होते. मात्र भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आम्हाला समन्स पाठवत आहे. याद्वारे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही याला घाबरणार नाही, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. सोमवारी त्यांनी पणजी पोलीस स्थानकात समन्सला उत्तर दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार वीरेश बोरकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर उपस्थित होते.
आलेमाव म्हणाले की, सरकारला राज्यातील जमीन बाहेरील व्यक्तींच्या घशात घालण्याची घाई झाली आहे. जमीन रूपांतरणला विरोध करणाऱ्या आमदार वीरेश बोरकर यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेलो होतो. जनतेलाही ‘३९ अ’ नको आहे. याविरोधात आम्ही शांततेत आंदोलन केले तरी आम्हाला पोलिसांकडून नोटीस येत आहेत. माझ्यासाठी हे समन्स म्हणजे पदक आहे. अशी कितीही पदके घेण्यास मी तयार आहे.
हरण्याची चाहुल लागताच फोंडा पोटनिवडणूक भाजपने अप्रत्यक्षपणे रद्द केली. नगरपालिका निवडणुकाही रद्द करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हुकूमशाही सरकारविरोधात लढा सुरूच राहील. आम्ही गोव्याचा वारसा, संस्कृती, परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत. जनता आमच्यासोबत आहे. भाजप पोलिसांचा गैरवापर करत आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. कितीही प्रयत्न झाले तरी आमचा आवाज बंद होणार नाही.
_ युरी आलेमाव, विरोधी पक्ष नेते

साखळी आणि सांत आंद्रे मतदारसंघांतील काही जमीन रूपांतरण थांबवण्यात आली आहेत. अन्य मतदारसंघांतीलही रूपांतरण थांबली पाहिजेत. सरकार आम्हाला समन्स पाठवत आहे. ही हुकूमशाही आहे. जनतेने जमीन रूपांतरण, मेगा प्रोजेक्टला विरोध करावा. भाजपला धडा शिकवण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.
_ वीरेश बोरकर, आमदार