अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : कसूर केल्यास दंडात्मक कारवाईचा पर्यटन खात्याचा इशारा

पणजी : पर्यटन खात्याकडे (Goa tourism department) नोंदणी केलेल्या सर्व 'क' आणि 'ड' श्रेणीतील हॉटेलांना 'पर्यटक व्यवस्थापन माहिती एन्टरप्राइजेस' (टीआयएमई) प्रणालीद्वारे पर्यटकांच्या (tourist) चेक-इनची (check in) माहिती वेळेवर आणि नियमितपणे सादर करण्यासंदर्भात पर्यटन खात्याने पुन्हा एकदा सूचना जारी केली आहे. सर्व संबंधित संस्थांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून ठराविक माहिती सादर न केल्यास दंड आकारण्याचा इशारा पर्यटन खात्याने दिला आहे.
गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायद्यांतर्गत पर्यटकांच्या चेक-इनची माहिती सादर करणे सक्तीचे आहे. याबद्दल वारंवार आठवण करून देऊन आणि नोटीस पाठवूनही काही आस्थापनांनी या नियमाचे पालन केलेले नाही, असे दिसून आले आहे. अशा बेकायदेशीर वागणुकीमुळे पर्यटनाचे योग्य व्यवस्थापन, देखरेख आणि माहितीवर आधारित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो, असे पर्यटन खात्याने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.
अवैध हॉटेल्सवर कारवाई होणार
अनेक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस वैध नोंदणी परवाना नसताना चालवली जात असल्याचे पर्यटन खात्याच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय चालवणे हे कायद्याचे उल्लंघन असून, संबंधित आस्थापना बंद करणे आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते.
होमस्टे, एअर बीएनबीची नोंदणी सक्तीची
एअर बीएनबी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अल्पकालीन भाडे तत्त्वावर निवास सेवा देणाऱ्या व्यक्तींनीही पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे. या प्रकरणातही नियमांचे पालन न झाल्यास कडक पावले उचलली जातील. नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी पर्यटन खात्याची पथके राज्यभर तपासणी करतील आणि प्रत्यक्ष स्थळांना भेटी देतील.
सर्व भागधारकांना सहकार्य करण्याचे आवाहन
तपासणी दरम्यान अधिकारी 'टाईम' (टीआयएमई) अॅप्लिकेशनवर पर्यटकांची माहिती अपलोड करणे, नोंदणी परवान्याची वैधता आणि लागू असलेल्या पर्यटन नियमांचे पालन यांची तपासणी करतील. गोव्याच्या पर्यटनात पारदर्शकता, जबाबदारी आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व भागधारकांनी सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे.