सांगे पोलीस स्थानकात तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल

हिंदू देवदेवतांवर शिवीगाळ करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना निवेदन देताना सांगेतील हिंदू रक्षा महाआघाडीचे सदस्य. (संदीप मापारी)
सांगे : हिंदू देवदेवतांविषयी समाजमाध्यमांवरून अश्लील शिवीगाळ करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदू रक्षा महाआघाडीने सांगे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मेल्समन मास्कारेन्हेस, बबीता फर्नांडिस आणि जेल्सिया रोड्रीगीस या तिघांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत, त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
सांगे येथे पत्रकारांशी बोलताना अनिल काकोडकर यांनी संताप व्यक्त केला. भगवान परशुराम, प्रभू रामचंद्र, सीता माता आणि श्री देवी लईराईच्या धोंडांविषयी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याने हिंदू समाज दुखावला आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी संबंधित समाजकंटकांना ते जिथे कुठे असतील तिथून ताब्यात घेऊन कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू रक्षा महाआघाडीचे सत्यवान नाईक यांनी यावेळी इशारा दिला की, गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना काही लोक जाणूनबुजून हिंदूंच्या भावना भडकवण्याचे काम करत आहेत. आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सर्व धर्मांनी एकमेकांचा आदर राखून जगावे, पण हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे नाईक यांनी ठणकावून सांगितले.
सांगे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून, परिसरातील वाढता तणाव पाहता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
समान कारवाईची मागणी
यावेळी सुभाष वेळीप यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे इतर प्रकरणांत कारवाई केली जाते, त्याच धर्तीवर या तीन समाजकंटकांच्या कुटुंबियांचीही चौकशी करून कठोर पावले उचलली जावीत. महेश रायकर यांनी नमूद केले की, प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असतो. गोव्यातील शांतता टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, परंतु आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला गेल्यास आम्ही गप्प बसणार नाही.