अटकेची आवश्यकता नसल्याने सोहम नाईकचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण : आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 11:47 pm
अटकेची आवश्यकता नसल्याने सोहम नाईकचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

मडगाव : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या पाचव्या गुन्ह्यात अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणणे गुन्हा शाखेने न्यायालयात मांडले. याची दखल घेऊन सोहमने मडगाव येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला.
लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित सोहम नाईक विरुद्ध कुडचडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याने तसेच त्याच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले.
गुन्हा शाखेने संशयित सोहमविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल केले. त्यानुसार, संशयिताविरोधात आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील तीन गुन्ह्यांत त्याला पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. तर एका गुन्ह्यावेळी तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड समोर हजर करण्यात आले. बोर्डाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवून २८ रोजी हजर करण्यास सांगितले आहे. तर सोमवार ३० मार्च रोजी गुन्हा शाखेत १९ वर्षीय युवतीने तक्रार दाखल केली. यानुसार, संशयित सोहम नाईकने जुलै २०२५ ते ९ मार्च २०२६ दरम्यान पीडित युवतीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. केपे तालुक्यातील एका धबधब्यावर तसेच इतर ठिकाणी नेऊन लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सदर घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी संशयित सोहम नाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
क्राईम ब्रँचने अटकेची शक्यता फेटाळली
पाचव्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सोहमने मडगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणी दरम्यान क्राईम ब्रँचने स्पष्ट केले की, या विशिष्ट गुन्ह्यात सध्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता नाही. पोलिसांच्या या विधानाची दखल घेत संशयिताच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य केली.            

हेही वाचा