१०० टक्के निकालात सरकारी शाळांची टक्केवारी घसरली

गतवर्षी ५५.१२ टक्के, यंदा ४३.५८ टक्के : यंदा ७८ पैकी ३४ सरकारी शाळांतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण


27th April, 11:42 pm
१०० टक्के निकालात सरकारी शाळांची टक्केवारी घसरली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील दोन शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १०० टक्के देणाऱ्या सरकारी शाळांचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी यंदा १०० टक्के निकाल देण्यात सरकारी शाळा अनुदानित शाळांपेक्षा किंचित आघाडीवर आहेत. २०२४ मध्ये एकूण सरकारी शाळांपैकी ५१ टक्के शाळांचे निकाल १०० टक्के लागले होते. २०२५ मध्ये हे प्रमाण वाढून ५५.१२ टक्के झाले होते. मात्र यंदा हे प्रमाण कमी होऊन ४३.५८ टक्के झाले आहे. मागील वर्षी ३९ टक्के अनुदानित शाळांमध्ये १०० टक्के निकाल लागला होता. यंदा हे प्रमाण वाढून ४२.६७ टक्के झाले आहे.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत एकूण ४१० शाळांतील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ३२१ अनुदानित, ११ विनानुदानित, तर ७८ सरकारी शाळांचा समावेश आहे. ७८ पैकी ३४ सरकारी शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १३७ अनुदानित व ७ विनानुदानित शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील ४१० पैकी १७८ (४३.४२ टक्के) शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २०२५ मध्ये ४०७ शाळांतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यात ३१८ अनुदानित, ११ विनानुदानित, तर ७८ सरकारी शाळांचा समावेश होता. गतवर्षी ७८ पैकी ४३ सरकारी, ३१८ पैकी १२३ अनुदानित तर ११ पैकी ७ विनानुदानित शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये ४०८ शाळांतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यात ३१९ अनुदानित, ११ विनानुदानित तर ७८ सरकारी शाळांचा समावेश होता. २०२४ मध्ये ७८ पैकी ४० सरकारी (५१ टक्के), ३१९ पैकी ८० अनुदानित (२५ टक्के), तर ११ पैकी ४ (३६ टक्के) विनानुदानित शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता.
यंदा डिचोलीतील सरकारी शाळा अव्वल
यंदा डिचोली तालुक्यातील सरकारी शाळांनी १०० टक्के निकाल देण्यात अव्वल कामगिरी केली. डिचोलीतील ६ सरकारी शाळांचे निकाल १०० टक्के लागले. पेडणेतील ५, सत्तरीतील ४, काणकोण, फोंडा आणि सांगे तालुक्यातील प्रत्येकी ३ सरकारी शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत.
इंडियन साईन लँग्वेज ठरला कठीण विषय
यंदा विद्यार्थ्यांना इंडियन साईन लँग्वेज हा विषय अन्य विषयांच्या तुलनेत थोडा कठीण गेला आहे. इंडियन साईन लँग्वेज या विषयात ८६.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मूलभूत गणित या विषयात ९१.४४ टक्के, तर विज्ञान विषयात ९४.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अन्य सर्व विषयांत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वरील तीन विषयांपेक्षा अधिक आहे