
ब्रिटनमधील भाड्याच्या घरांच्या बाजारपेठेत धर्माच्या आधारावर उघडपणे भेदभाव केला जात असल्याचे एका शोधनिबंधातून समोर आले आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द टेलिग्राफने केलेल्या तपासणीत, भारतीय वंशाचे अनेक घरमालक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘केवळ हिंदू’ किंवा ‘केवळ मुस्लिम’ भाडेकरू हवे असल्याच्या बेकायदेशीर जाहिराती देत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार ब्रिटनच्या समानता अधिनियम २०१० चे थेट उल्लंघन मानला जात आहे.
द टेलिग्राफच्या अहवालानुसार, फेसबुक, गमट्री आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर अशा अनेक जाहिराती आढळल्या आहेत. यामध्ये स्पष्टपणे ‘केवळ मुस्लिमांसाठी’, ‘मुस्लिम मुलाला प्राधान्य’, किंवा ‘केवळ हिंदूंसाठी’ असे शब्द वापरले जात आहेत. इतकेच नव्हे तर, काही जाहिरातींमध्ये विशिष्ट भाषा (पंजाबी, गुजराती) किंवा ठराविक प्रदेशातील (केरळ, हरियाणा) भाडेकरूंनाच प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणाच्या चौकशीत ‘रोशन प्रॉपर्टीज’ नावाची कंपनी समोर आली आहे, जिने टिकटॉकसह विविध प्लॅटफॉर्मवर अशा भेदभाव करणाऱ्या जाहिराती पोस्ट केल्या होत्या. अहवाल प्रसिद्ध होताच या कंपनीचे फेसबुक पेज हटवण्यात आले. एका गुप्त ऑपरेशनदरम्यान, टेलिग्राफच्या रिपोर्टरने अशाच एका घरमालकाशी संपर्क साधला असता, त्याने बिगर-मुस्लिम भाडेकरू ठेवण्यास स्पष्ट नकार दिला.
ब्रिटनच्या समानता अधिनियम २०१० नुसार, धर्म, वंश किंवा कोणत्याही संरक्षित वैशिष्ट्यांच्या आधारावर गृहनिर्माण क्षेत्रात भेदभाव करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. जर घरमालक स्वतःच्या घरात एखादी खोली भाड्याने देत असेल आणि तिथे स्वयंपाकघर किंवा बाथरूम सामायिक असेल, तर घरमालक 'शाकाहारी जेवण' किंवा 'धूम्रपान निषिद्ध' अशा अटी टाकू शकतो. मात्र, या स्थितीतही ठरावीक धर्माचाच व्यक्ती हवा, असा आग्रह धरण्याची कायदेशीर मुभा नाही.
या खुलाशामुळे ब्रिटनमधील राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त होत आहे. ‘रिफॉर्म यूके’चे आर्थिक प्रवक्ते रॉबर्ट जेनरिक यांनी या जाहिरातींना ‘घृणास्पद आणि ब्रिटन-विरोधी’ ठरवले आहे. ते म्हणाले की, वादाच्या आणि भेदभावाच्या कोणत्याही स्वरूपाचा निषेध व्हायला हवा. कोणत्याही धार्मिक गटाला अशा प्रकारे समाजाचे तुकडे करण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही.
दुसरीकडे, 'गमट्री'सारख्या प्लॅटफॉर्मने आपली बाजू मांडताना सांगितले की, ते अशा जाहिरातींवर कठोर लक्ष ठेवून आहेत आणि तक्रार येताच त्या त्वरित हटवल्या जातात. या प्रकरणामुळे ब्रिटनमधील बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेत धर्माच्या नावावर निर्माण होत असलेल्या भिंतींवर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
- सुदेश दळवी