सद्‌गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजी गुरुपीठारोहण रौप्य महोत्सवारंभ

श्री क्षेत्र तपोभूमीचे संस्थापक राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी पुण्यतिथी तथा पद्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण रौप्य महोत्सवारंभ निमित्ताने...

Story: प्रासंगिक |
28th April, 10:34 pm
सद्‌गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजी गुरुपीठारोहण रौप्य महोत्सवारंभ

श्रीदत्त पद्मनाभ पीठाच्या अखंडित दिव्य सद्‌गुरु परंपरेतील संतविभूती, श्री क्षेत्र तपोभूमी संस्थापक राष्ट्रसंत सद्‌गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी एक महान सत्पुरुष. 

स्वामीजींनी वेद, संस्कृत, ज्योतिष, वास्तुशास्त्र, योगशास्त्र आदि वैदिक विद्यांचा वारसा घरोघरी पोहोचवला आणि सामान्यांसाठी या वैदिक विद्या, मनुष्याच्या इतिकर्तव्यतेची शिकवण, संस्कार, संस्कृती, व्यसनमुक्ती, शिस्तबद्धता आणि अध्यात्म ज्ञानाच्या माध्यमातून आचरणात आचरणात उतरले पाहिजे, यासाठी देदिप्यमान कार्य केले आणि संपूर्ण विश्वाला उपदेश केला. सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी गोमंतकासाठी केलेले कार्य भव्य आणि दिव्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी अत्याचारानंतर लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे अनुकरण करणारा समाज व्हावा यासाठी पूज्य सद्गुरुंनी भगीरथ प्रयत्न केले. गोव्यात श्री दत्त पद्मनाभ पीठ - तपोभूमीचा लाभ म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत. किती घडामोडी झाल्या या गोव्यात? अनेक क्रांतिकारी गोष्टींनी गोवा सतत सळसळत असतो. क्रांती आणि शांती हा गोव्याचा मानदंड आहे. आज तपोभूमी तर गोव्याच्या सर्वोन्नत्तीचे केंद्रस्थान आहे. सन २००२ साली सद्‌गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींचे गुरुपीठाचे उत्तराधिकारी पीठारोहण झाले. सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी म्हणजे गोव्याचे महान वैभवच होय. श्री दत्त पद्मनाभ पीठ, गोव्याला लाभलेली दिव्य सद्गुरु परंपरा म्हणजे, गोवा पर्यायाने भारत देशासाठी भूषणावह असेच आहे. पूज्य ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींनी निरामय मानवी जीवनासाठी गोवाच काय, थेट वैश्विक पातळीवरही आध्यात्मिक ते सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांना गतीमान केले आहे. त्यामुळे पूज्य स्वामीजींच्या सान्निध्यात आलेला प्रत्येक घटक भाग्यशाली होऊन, आनंदाने देव, देश, धर्मासाठी समर्पित होऊन जातो. अशी किमया लिलया फक्त सद्गुरूच करतात. पूज्य स्वामीजींनी बाहेरील समाजाच्या मनात गोव्याबद्दल असलेल्या नकारात्मकतेला दूर सारली आणि सकारात्मकतेतूनच मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो, हे सिद्ध केले. 

गोवा हे भारतातील एक समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. गोवा गोमातेच्या अस्तित्वाने पवित्र मानले जातो आणि अनेक पुराणांमध्ये तिचा उल्लेख आढळतो. बऱ्याच काळापासून, जगभरात या राज्याकडे केवळ पर्यटन आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून पाहिले जात होते, परंतु आज ते आपल्या खऱ्या ओळखीकडे वाटचाल करत आहे. अध्यात्म, संस्कृती, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक सहभाग यांच्या संगमातून हा बदल शक्य होत आहे. तथापि, गेल्या अनेक वर्षांत, आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या दिव्य नेतृत्वाखाली ही धारणा बदलण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक प्रयत्न होत आहेत. अर्थात गोव्याकडे पाहाताना ही भूमी पवित्र होती, पवित्र आहे, पवित्र राहील, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. अर्थात सद्गुरुंच्या सान्निध्यात आल्यानंतर कायापालट होतो याचे साक्षात प्रतिबिंब तपोभूमीवरच सर्वांना दिसून येत आहे. विश्व स्तरावर स्वामीजींच्या कार्याची दखल घेतली जात आहे. विविध क्षेत्रातील युवा, युवती आज विविध माध्यमातून नेतृत्व करत आहेत. वैश्विक पातळीवर मानव समाज सुसंस्कृत राहावा. या समाजाकडून धर्माचरण घडावे व मानवता निकोप राहावी, यासाठी अनादी काळापासून गुरु-शिष्य परंपरा आपल्या भारत वर्षांत अखंडितपणे प्रवाहित आहे. आज संपूर्ण गोवा राज्यच काय, देश-विदेशातील सद्भक्त पूज्य सद्गुरुंचे अनुयायी गुरुभक्तीच्या आनंदात रंगले आहेत. समाजात सकारात्मक अन् क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी पूज्य सद्गुरु माऊली समाजाशी एकरूप होऊन जातात. सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींनी गोव्याला सावरताना समाजातील कुटुंबातील सर्व घटकांना धर्मशील बनविले. पूज्य स्वामीजींनी गोव्याचे खरे वैभव युवा वर्ग आहे, हे दिव्य दृष्टीने जाणले आहे. संप्रदायाचे कार्य देव देश व धर्म या त्रिसूत्रीच्या माध्यमातून अखिल मानवमात्राचा कल्याणास्तव होत आहे. अखिल भारतीय संत सम्मेलन, वेद सम्मेलन, आंतरराष्ट्रीय संस्कृत सम्मेलन, वर्ल्ड योग फेस्टिवल, दिव्य देवस्थान सभा, वंदे मातरम्, धर्मो रक्षति रक्षितः, जय गोवा, जनकल्याण महायज्ञ, ॐ नमो नारायणाय, चलो अयोध्या, गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल अशा विविध भव्य-दिव्य कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाद्वारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचा गोव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोणच बदलला व गोवा भोगभूमी नसून योगभूमी तपोभूमी हे अर्थाने सिद्ध करून दाखविले व गोव्यात एक आध्यात्मिक क्रांतीच पूज्य स्वामीजींनी सुरू केली. आज पूज्य अखिल भारतीय संत समिती, हिंदू धर्म आचार्य सभा, अखिल भारतीय साधू समाज, अशा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थावर पूज्य स्वामीजी प्रतिनिधित्व करत आहेत. स्वामीजींनी जगभरातील ३० हून अधिक देशांमध्ये कार्य करून, 'वसुधैव कुटुंबकम्' या संदेशाच्या माध्यमातून भारत व गोव्याच्या आध्यात्मिक संस्कृतीचा प्रसार केला आहे. भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार, ब्रिटिश संसदेत शांतिदूत, काशी विद्वत् परिषदेद्वारे अध्यात्म शिरोमणी असे अनेक पुरस्कार स्वामीजींच्या कार्याची दखल घेऊन बहाल करण्यात आले आहेत आणि अशाच या कार्यातून गोव्यात होत असलेले हे आध्यात्मिक परिवर्तन पाहून, देशातील संत आणि महंतांनी स्वामीजींना 'गोवा स्वामी' या उपाधीने सन्मानित केले व हाच स्वामीजींचा परिचय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. आज स्वामीजींचे गुरुपीठारोहण होऊन दोन तप पूर्ण झाली आणि आजपासून रजत महोत्सवारंभ आहे, हा क्षण सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. हे संपूर्ण वर्ष पद्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्ष म्हणून विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सर्वजण साजरे करणार आहोत. आज राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी पुण्यतिथी तथा पद्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण रजत महोत्सवारंभाच्या या शुभदिनी श्रीगुरु चरणी विनम्र अभिवादन.


- वेदमूर्ती व्रजेश गुरव

तपोभूमी - गोवा