१६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडिया निर्बंधाचे दस्तऐवज तयार

आयटीमंत्री रोहन खंवटे यांची माहिती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
१६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडिया निर्बंधाचे दस्तऐवज तयार

पणजीः संबंधीत भागीदारांचा सल्ला घेऊन १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडियावर (Social Media)  निर्बंध घालण्याविषयीचा दस्तऐवज तयार केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief  Minister Dr. Pramod Sawant)  यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर हा दस्तऐवज केंद्रीय आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांना मान्यतेसाठी पाठवणार, अशी माहिती आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. 

एआय धोरण (AI Policy)  आणि सोशल मिडीया न‌िर्बंधांविषयी बोलावलेल्या भागधारकांच्या बैठकीनंतर माहिती देताना मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी आयटी खात्याचे संचालक कबीर शिरगांवकर, गोवा इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडचे सीईओ रेवती कुमार तसेच शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. 

भागधारकांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सोशल मिडीया टूल्स जसे की फेसबूक, इन्स्टाग्राम यांची सध्या मुलांना आवश्यकता नाही. पण याच्या बदल्यात शैक्षणीक टूल्स जसे की गुगल, एआय याचा वापर करून हा वेळ जास्त गोष्टी शिकण्यावर भर देवून आमच्या मुलांना देशाच्या भविष्यासाठी तयार करण्यावर भर दिला, असे खंवटे यांनी सांगितले. 

आम्ही हा विषय देशात प्रथम घेतला आणि आता ही चर्चा प्रत्येक राज्यांत सुरू झाली आहे. आयटी कायद्याच्या आधारावर आम्ही केंद्रीय आयटीमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे काही सुधारणा करण्याची मागणी करणार; जी सर्व राज्यांच्या हितासाठी ठरणार. आमचे तरुण तंत्रज्ञानाच्या जोरावर तयार झाल्यास राज्य आणि देशासाठी फायदेशीर ठरणार. 

पालक शिक्षक संघ, महाविद्यालय प्रतिनिधींच्या सूचना घेऊन सध्या स्थिती काय आहे आणि भविष्यात काय करायला शोधतोय हे सर्व मुद्दे आम्ही पत्रात मांडले आहेत. हा विषय प्रत्येक माणसाला आव्हान ठरल्याने केंद्र सरकार आणि इतर राज्ये हाच विचार मांडणार; अशी मला पूर्ण खात्री आहे, अशी आशा खंवटे यांनी व्यक्त केली. 

मुलांना कसला मोबाईल घेऊन द्यावा किंवा मोबाईल घेऊन दिल्यावर त्याच्या वापरासाठी मुलांवर नियंत्रण ठेवणे हे पालकांसाठी आव्हान आहे. त्यासाठी राज्यातर्फे हे विशिष्ट असे धोरण पालकांना दिलासा देणार. जेव्हा मुले किशोर वय ओलांडून १९ वर्षे पूर्ण करून पुढे जाणार तेव्हा आपली मागील पाच वर्षे गेमी खेळण्यात घालवली नाहीत याचा त्यांना कसलाच पश्चाताप होणार नाही,  असा विश्वास खंवटे यांनी व्यक्त केला. 

सरकार ४ मे रोजी जाहीर करणार ‘एआय’ मसुदा 

राज्य सरकार आपल्या ‘एआय’ धोरणाचा मसुदा ४ मे रोजी जाहीर करणार. हा मसुदा पुढील १५ दिवसांसाठी संकेतस्थळावर लोकांसाठी उपलब्ध असणार. नागरिक, विद्यार्थ‌ी, उद्योजक आणि तज्ञांनी यावर आपल्या सूचना आणि सल्ले द्यावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे. हे धोरण येणाऱ्या १०० दिवसांमध्ये पूर्णपणे लागू होणार. 

सरकारी सेवा कोंकणी आणि मराठी भाषेत उपलब्ध असणार. ‘चॅटबॉट्स’ आणि इतर एआय माध्यमांतून नागरिक २४ तास सरकारकडे संवाद साधू शकणार. पर्यटन, शेतीकाम, आरोग्य आणि शिक्षण या पातळ‌ीवरही एआय-चा उपयोग होणार. ‘डीपफेक’ किंवा सोशल मिडिया वरील वाईट मजकुरामुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाल्यास सरकार कडक पावले उचलणार. महिलांची सुरक्षा ही सरकारसाठी महत्त्वाची आहे व आम्ही त्याबाबतीत कसलीच तडजोड करणार नाही, असे मंत्र्याने सांगितले. 


हेही वाचा