
पणजी : नगरनियोजन खात्याच्या कलम ३९ (अ) वरून नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्यासमोर काढलेल्या मोर्चा प्रकरणी आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांना पणजी पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स (Summons) बजावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पुढील तपासासाठी फेरेरा यांना आज बुधवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी पोलीस ठाण्यात (Panjim Police Station) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
गोव्यात (Goa) गेल्या काही दिवसांमागे नगरनियोजन खात्यातील ३९ (अ) कलमाविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले होते. पणजीतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू होते व त्याला वाढता प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्यातील काही आंदोलनकर्त्यांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी मोर्चा वळवला होता. त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. त्यात कॉंग्रेस पक्षाचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्यासहीत इतर विरोधी आमदार, नेते सहभागी झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी आमदार ॲड. फेरेरा यांच्यासहीत इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आता याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.