म्हणाले-सरकारने 'इंडस्ट्रीज'ना नेहमीच मदत केली, आता त्यांनी स्थानिकांना नोकरी देण्यात पुढाकार घ्यावा

पणजी : गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ आणि वेर्णा औद्योगिक वसाहत यांच्यातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यामुळे सुमारे एक हजारहून अधिक स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या. यापुढे दर महिन्याला प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये असे मेळावे आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असेल; मात्र यासाठी उद्योग क्षेत्राचा पाठिंबा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बुधवारी पणजीत आयोजित 'व्यवसाय सुरक्षा प्रदर्शन' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर आणि इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, याआधी गोव्यामध्ये सिंधुदुर्ग अथवा कारवारमधून मनुष्यबळ घेतले जात होते. मात्र, गोव्यातील स्थानिकांनाच रोजगार मिळावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. यासाठीच गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ कार्यरत आहे. वेर्णा येथील मेळाव्यामुळे १३०० स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध झाली असून, पुढील काही दिवसांत त्यांना नियुक्तीपत्रे दिली जातील. या मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांचे मी आभार मानतो. सरकारने उद्योग क्षेत्राला नेहमीच मदत केली आहे, आता स्थानिकांना प्राधान्याने नोकरी देण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यावा.
ते पुढे म्हणाले, कामाच्या ठिकाणी कामगार आणि कर्मचारी सुरक्षित राहतील, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विकास प्रक्रियेत उद्योग, पायाभूत सुविधा आणि रोजगारासोबतच 'कर्मचारी सुरक्षा' तितकीच महत्त्वाची आहे. सुरक्षित कामाचे ठिकाण कामगारांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांना स्थैर्य व मानसिक शांतता देते. आजच्या काळात सुरक्षा ही केवळ योग्य उपकरणांवरच नव्हे, तर योग्य पूर्वतयारी आणि जागृतीवरही अवलंबून आहे. औद्योगिक विकास आणि कामगारांचे कल्याण हे दोन्ही घटक हातात हात घालूनच पुढे जात असतात.
सरकारतर्फे शालेय तसेच तांत्रिक शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये विद्युत सुरक्षा, आग प्रतिबंध, आपत्ती सज्जता, आपत्कालीन प्रतिसाद आणि मानसिक स्वास्थ्य यांसारख्या विषयांचा समावेश आहे. या गोष्टी लहान वयात शिकल्यास भविष्यात कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन जीवनातही त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.