आज बेशिस्त पर्यटनाची शिकार ठरलेला ‘स्वीट लेक’ ही जागा ‘वाघ कोळंब’ म्हणून ओळखली जात होती आणि या तळ्यातील चवदार पाणी पिण्यासाठी वाघ यायचा, याचे विस्मरण स्थानिक समाजाला झालेले आहे.

गोव्याच्या भूमीला अज्ञात काळापासून येथील जीवसृष्टी जगवण्यासाठी सह्याद्री आणि सागर महत्त्वाचे योगदान करत आहेत. सह्याद्री आणि सागर यांचे अस्तित्व जसे एकमेकांसाठी पूरक आहे, तसेच येथील सजीवसृष्टीचे जीवन सुंदर आणि समृद्ध करण्यात सह्याद्री आणि सागर महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहेत. मान्सूनचा पाऊस सह्याद्रीतील पशुपक्षी, वनस्पती यांच्यासाठी जीवनाधार ठरलेली असून, तेथे कोसळणाऱ्या पावसामुळे नदीनाले मोठ्या प्रमाणात गोडे पाणी डोंगरातून सखल प्रदेशात आणून सागराची क्षारता नियंत्रित करत असतात आणि त्यामुळे गोवा - कोकणातील मानवी समाजाचे जगणे येथील दमट हवामानात सुसह्य होत असते. गोवा-कोकणातील सह्याद्रीच्या जंगलात जी प्राणीसंपदा पूर्वापार आढळते, त्यात पट्टेरी वाघ हा सर्वोच्च शिखरस्थानी असल्याची जाणिव इथल्या निसर्ग आणि पर्यावरणस्नेही लोकमानसाला शेकडो वर्षांपूर्वी झाली होती आणि त्यामुळे गावातील दैवत पंचायतनात पट्टेरी वाघालाही महत्त्वाचे स्थान दिले होते. केवळ आदिवासी बहुल प्रदेशातच नव्हे, तर जंगल निवासी लोक समूहात पट्टेरी वाघ हा वाघ्रो देव म्हणून पूजला जात आहे.
सांगेतील रिवणसारख्या जंगल समृद्ध गावात पौष महिन्यातील अमावस्येला तेथील पट्टेरी वाघांनी आपल्या गुराढोरांना इजा पोहचू नये, त्यांच्यावर हल्ले करू नये आणि त्यांचे रक्षण करावे या भाबड्या आशेने ‘वागऱ्या अमास’ साजरी करायचे. पौषातील अमावस्येला पारंपरिक विधींचे पालन करून लोकमानस, इथल्या जंगलात शिखरस्थानी असणाऱ्या पट्टेरी वाघाविषयीची कृतज्ञता व्यक्त करायचे. वाघ हा त्यांच्यासाठी केवळ जंगलातील प्राणी नव्हे, तर तो त्यांच्या धर्मश्रद्धेचे संचित ठरला होता आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासाला सुरक्षित ठेवले जात होते. सांगे तालुक्यातील धारबांदोडा तालुक्याशी सीमा भिडणाऱ्या काले गावात ‘वागऱ्या गाळ’ म्हणून देवराईचे अस्तित्व होते. आज तेथील देवराईतील जंगलसंपदा शेती, बागायती पिकांच्या अतिक्रमणामुळे संकटग्रस्त झालेली आहे, परंतु असे असले तरी ‘वागऱ्या गाळ’ या जागेत जी वाघ्रो देवाची पाषाणी मूर्ती पूजली जाते, ती संपूर्ण गोव्यात वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. या मूर्तीत पट्टेरी वाघ प्रमुख असून त्याच्या पायाशेजारी सिंह आणि रानडुक्कर यांच्या छोट्या प्रतिमा आहेत.
केपे तालुक्यातील आंबावली या गावात पट्टेरी वाघांचे वास्तव्य पूर्वापार होते आणि त्यामुळे येथील आदिवासी वर्षपद्धतीने वाघाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघ्रो देवासमोर सामूहिक पद्धतीने गाव जेवणाचा विधी ‘म्हातण’ म्हणून साजरा केला जायचा. गुजरातमधील गीरच्या प्रदेशात आशियाई सिंहाचे वास्तव्य असून तेथील जंगलांचा तो अनभिषिक्त सम्राट मानलेला असला तरी सह्याद्रीच्या जंगलांचा मात्र पट्टेरी वाघालाच इथल्या कष्टकरी आणि आदिवासी समूहाने राजा मानलेला आहे. दुर्गा देवीचे वाहन म्हणून बऱ्याच पाषाणी मूर्ती शिल्पात सिंह जरी प्रकर्षाने दाखवलेला असला, तरी गोवा-कोकणातील तिच्या मूर्तीत वाघ वाहन म्हणून दाखवलेला आहे. भगवान शिव नंदीबैलावर आरूढ होत असला, तरी तो व्याघ्रांबर धारण करणारा देव मानलेला आहे. सत्तरीतील पिसुर्ले या खाणग्रस्त ग्रामपंचायत कक्षेत वाघुरे गाव येत असून, येथील शिवाला व्याघ्रेश्वर म्हणून पुजला जातो. वाघुरेत पूर्वापार वाघांची शिकार करणे आणि हत्या निषिद्ध मानलेली असून, चुकून सुद्धा कोणी वाघाला इजा पोहचवण्याचे धाडस केलेले नाही. वाघाला ठार केले, तर निर्वंश होण्याचा शाप बाधेल आणि त्या प्रकोपात आपल्या वर्तमान आणि भविष्याला काळिमा फासला जाईल, म्हणून वाघुरेत वाघाला देवाचे स्थान दिलेले असून, पूर्वी जी घनदाट देवराई होती तेथे वाघाचे अस्तित्व होते आणि लोहखनिज खाणींच्या उत्खननाची अराजकता इथे सुरू होण्यापूर्वी वाघ देवराईत बसायचा आणि तेथील ग्रामस्थांचा आणि पाळीव प्राण्यांचा रक्षणकर्ता मानला जात होता. पट्टेरी वाघाने माणसावर हल्ला केल्याची घटना इथे आजतागायत उद्भवलेली नाही.
जवळच्या खोडये गावात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने ‘देवचारा’च्या लग्नाचा विधी उरकला नाही, तर तेथील पट्टेरी वाघ त्यांच्या गुराढोरांवर हल्ले करायचा. माणूस आणि वाघ यांच्यात जे अनुबंध पूर्वापार प्रचलित होते, त्याची वीण आज मानवी समाजात अर्थकारणापायी क्षीण होऊ लागली आहे.
फोंडा तालुक्यातील मांडवी किनाऱ्यावरील खांडोळा गावाची ग्रामदेवी सांतेर ही मृण्मयी वारुळाच्या रूपात जेव्हा पूजली जात होती, तेव्हा तिचे स्थान महाकाय वृक्षवेलींनी समृद्ध होते. झरे, तळी आणि देवराई यांच्या सान्निध्यात देवी सांतेर राहत होती. या देवराईत पट्टेरी वाघ वास्तव्य करत असल्याची जाणिव लोकमानसाला असल्याकारणाने त्यांनी देवराईचे अस्तित्व सुरक्षित ठेवले होते. परंतु कालांतराने निसर्ग आणि पर्यावरण केंद्रित लोकधर्माचा पगडा जेव्हा दुर्बल होत गेला आणि लोकवस्तीचा विस्तार देवराईत करण्याची मानसिकता विकसित होत गेली, तेव्हा पट्टेरी वाघांचे अस्तित्व आणि तेथील त्यांचा नैसर्गिक अधिवास ठरलेल्या देवराईचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आज वाघ्रो देव पाषाणी मूर्तीद्वारे आपल्या घुमटीत बंदिस्त झाला आहे. वाघ्रो देव म्हणजे पट्टेरी वाघ आणि त्याचे मंदिर म्हणजे देवराई, ही भावना लोकमानसातून लोप पावली आणि त्यामुळे त्याला पाषाणी मूर्तीतच पुजणारे भाविक खांडोळात प्रबळ होत गेले.
काणकोण तालुक्यातल्या खोतीगाव आणि सांगे तालुक्यातील नेत्रावळी अभयारण्याच्या परिसरात जो वाघडोंगर आहे, तो पट्टेरी वाघांमुळेच नावारूपाला आला होता. आज काळी व्याघ्र राखीव क्षेत्रातील पट्टेरी वाघांच्या भ्रमण मार्गात येणारा हा वाघ डोंगर वाघांचा नैसर्गिक अधिवास हा आपला पूर्वाश्रमीचा लौकिक हरवत चालला आहे.
पेडणे तालुक्यातील पालये हा गाव जंगलांच्या वैभवाने नटला होता आणि त्यामुळे इथल्या जंगलांत बिनदिक्कतपणे वाघ संचार करायचा. आज बेशिस्त पर्यटनाची शिकार ठरलेला ‘स्वीट लेक’ ही जागा ‘वाघ कोळंब’ म्हणून ओळखली जात होती आणि या तळ्यातील चवदार पाणी पिण्यासाठी वाघ यायचा, याचे विस्मरण स्थानिक समाजाला झालेले आहे. त्यामुळे येथील सुंदर जंगल आणि ‘वाघ कोळंब’ यांचे अस्तित्व दिवसेंदिवस दुर्बल होऊ लागले आहे.

- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५