पर्तगाळी येथील श्रीरामांची प्रतिमा भाविकांसाठी तात्पुरती खुली

प्रकल्प पूर्ण होण्यास लागणार वर्षभराचा कालावधी : विद्याधीश तीर्थ स्वामी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 mins ago
पर्तगाळी येथील श्रीरामांची प्रतिमा भाविकांसाठी तात्पुरती खुली

प्रभू श्रीरामाची ७७ फुटी कांस्य मूर्ती. (अशोककुमार देसाई)

पैंगीण : दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठात उभारण्यात आलेली प्रभू श्रीरामांची ७७ फूट उंच भव्य प्रतिमा सध्या भाविकांसाठी तात्पुरती खुली करण्यात आली आहे. दक्षिण आशियातील ही सर्वात उंच कांस्य मूर्ती मानली जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ नोव्हेंबर २०२५ रोजी याचे अनावरण करण्यात आले होते.
पर्तगाळ मठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून सुमारे एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. या मूर्तीची निर्मिती सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली असून, यात प्रभू रामाचे 'अयोध्या रूप' साकारण्यात आले आहे. १ जानेवारीपासून थीम पार्कच्या कामासाठी हा परिसर बंद ठेवण्यात आला होता. मात्र, भाविकांचा वाढता ओघ पाहून दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
मठाने केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही पाऊल उचलले आहे. मठातील पाठशाळेचे नामकरण करण्यात आले असून २४ जूनपासून वर्ग सुरू होतील. यंदा २८ विद्यार्थ्यांनी निवासी शिक्षणासाठी नोंदणी केली आहे. संपूर्ण मठाच्या वीज बचतीसाठी आणि सुरळीत पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
६ ऑगस्टपासून चातुर्मास सोहळा
यंदाचा चातुर्मास पर्तगाळ मठातच साजरा होणार आहे. हा सोहळा ६ ऑगस्टपासून सुरू होऊन २६ सप्टेंबर रोजी होईल. आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने ही ७७ फुटी मूर्ती आता गोव्याची एक नवीन ओळख बनली आहे.

भाविकांसाठी आधुनिक सुविधा
वयोवृद्ध आणि दिव्यांग भाविकांचा विचार करून मठाने विशेष सोयी उपलब्ध केल्या आहेत. थीम पार्क आणि प्रतिमेजवळ जाण्यासाठी पायऱ्यांऐवजी दोन लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे व्हीलचेअरने सहज दर्शन घेता येईल. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी बनवलेल्या हेलिपॅडच्या जागेवर आता भव्य पार्किंग विकसित केले जात आहे. परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, भविष्यात देखभालीसाठी नाममात्र शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

हेही वाचा