पंचायतीकडून नोटिसा : अन्यथा वीज, पाणी खंडित करण्याचा इशारा

नागवे येथे सांडपाणी गटारात सोडणाऱ्या घरांचे सर्वेक्षण करताना सर्वेश गावकर, आरोग्य अधिकारी विकास नाईक, गजानन पार्सेकर व इतर.
वाळपई : म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे येथे काही घरांमधील सांडपाणी थेट गटारात सोडण्यात येत असल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भातील तक्रारी स्थानिकांनी पंचायतीकडे दिल्यानंतर पंचायतीच्या शिष्टमंडळासह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ज्यांनी सांडपाणी गटारामध्ये सोडले आहे, अशांना सोकपिट बांधण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सोकपिटची व्यवस्था न केल्यास संबंधित घरांचे वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील नोटिसा घरमालकांना देण्यात आल्या आहेत.
तक्रारींची दखल घेत पंचायतीचे सचिव सर्वेश गावकर, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक, स्वच्छता निरीक्षक गजानन पार्सेकर आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक घरांमधील सांडपाणी थेट गटारात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली असून, दुर्गंधी पसरली आहे. तसेच या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढली असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमुळे भविष्यात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही इमारतींचे मूळ मालक वाळपईत राहत नसून त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मान्सूनपूर्वी कारवाई आवश्यक
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कारवाई तातडीने हाती घेतली आहे. पावसाळ्यात हे सांडपाणी नाल्यांवाटे नदीत मिसळल्यास जलप्रदूषण होऊन जलचरांना आणि मानवी आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. ही मोहीम केवळ नागवेपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण म्हाऊस पंचायत क्षेत्रात राबवली जाईल, असे सचिव सर्वेश गावकर यांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिकांकडून पंचायतीच्या भूमिकेचे स्वागत
गेल्या अनेक दिवसांपासून या समस्येचा त्रास सहन करणाऱ्या नागवेवासीयांनी पंचायतीच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे. अस्वच्छतेवर आळा बसवण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आरोग्याच्या दृष्टीने हिताचा असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.