पर्यटन व्यवसायावर सावट नक्की कशाचे ?

काळपट पडणारे किनारे, सर्वत्र फैलावत असलेला कचरा, काँक्रिटची जंगले आणि त्यामुळे आक्रसत गेलेली भूमी यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांचे आकर्षण कमी होत गेलेले आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

Story: विचारचक्र |
01st May, 09:39 pm
पर्यटन व्यवसायावर सावट नक्की कशाचे ?

गोव्यातील पर्यटन क्षेत्र एरवी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान गजबजायला सुरू होते आणि ती वर्दळ मे अखेर ते जूनच्या पहिल्याआठवड्यापर्यंत चालते. हल्लीच्या काळात गोव्यात पावसाळी पर्यटनाचे प्रयोगही होत आहेत. सरकार तर, वर्षाचे बाराही महिने पर्यटन चालावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे सांगते. पण हल्लीच्या काही वर्षांत या ना त्या कारणास्तव ठरलेल्या कालावधीपूर्वीच पर्यटन हंगाम लवकर आटोपता घेतला जात आहे. वास्तविक त्यामागील कारणांचा शोध त्या क्षेत्रातील संबंधितांनी तसेच सरकारने घ्यायला हवा, पण तसा तो घेतला जात नसावा. विविध किनारी भागांत पर्यटन खात्याने शॅकधारकांना किंवा अन्य पर्यटन व्यवसायांना दिलेले परवाने हे मे अखेरपर्यंत असतात. तरीही पावसाला उशीर झाला आणि पर्यटकांची गर्दी चालू राहिली, तर त्यांना पावसाला सुरुवात होईपर्यंत व्यवसाय चालू ठेवण्यास मोकळीक दिली जाते. यापूर्वी तशी ती दिलेलीही आहे. पण गेल्या काही वर्षांत वेगळेच चित्र दिसत असून ऐन मे महिन्यात पर्यटकांची गर्दी घटल्याने या लोकांनी व्यवसाय गुंडाळलेला आहे. पावसाचा विलंब वगैरे ठीक आहे, पण ऐन मोसमात पर्यटकांचा ओघ नेमका कशासाठी घटला, त्याचा शोध घेण्याची गरज असताना तो घेतला नाही. मात्र, इतरांवर प्रत्येक जण ठपका ठेवताना दिसतो. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असलेल्या या क्षेत्रासाठी ती चिंतेची बाब ठरणार आहे. चालू हंगामात उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध कळंगूट किनाऱ्यावरील असंख्य शॅकमालकांनी म्हणे पर्यटकांच्या कमी संख्येमुळे पर्यटन हंगाम संपण्यापूर्वीच शॅक हटविले आणि त्यामुळे ही बाब सध्या चर्चेची ठरली आहे. आता अशीच परिस्थिती अन्य किनाऱ्यांवरही तयार झालेली आहे की काय, त्याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण तशीच स्थिती असेल तर तो काळजीचा विषय ठरणार असून संबंधित यंत्रणेने तो गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. एका प्रसिद्ध स्थानिक वृत्त वाहिनीवर या संदर्भात चर्चा पहायला मिळाली, त्यातही हेच दिसून आले.

खरेच पर्यटकांची संख्या घटलेली आहे का, सरकारची आकडेवारी तर कोट्यवधींवर जाते, पण तरीही पर्यटन क्षेत्रातील संबंधित घटक नाराज का आहेत, हे जसे शोधावे लागेल तसेच खरेच ती घटली असेल तर त्या मागील कारणे कोणती, हेही शोधावे लागेल. इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडावलेली आहे, तसेच देशी पर्यटक काटकसरीने वागतात, हे जरी खरे असले तरी अनेक इमारत प्रकल्पात विनापरवाना पर्यटकांचे वास्तव्य असते, हेही खरे आहे. या प्रकारांना आळा घालणे संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. कारण त्यामुळे सरकारी महसूल बुडतो आहे. केवळ वास्तव्यच नव्हे, तर टॅक्सी आणि शॅक व्यवसायांतील बेकायदा कृत्ये, हा व्यवसाय आजच्या टप्प्यात पोहोचण्याचे कारण आहे. पर्यटन व्यवसायाची सारी उलाढाल ही विदेशी पर्यटकांवर अवलंबून असल्याचे अनेकजण मानतात आणि ते योग्य नाही. एकेकाळी ते खरे होते, पण त्या वेळची स्थिती आज राहिलेली नाही. त्याला कारण आपणच आहोत. सर्व गैरप्रकार या क्षेत्रात बोकाळलेले आहेत. ते लवकरात लवकर दूर न झाल्यास हे क्षेत्र कोसळण्यास जास्त काळ लागणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. गोव्यात पर्यटनाच्या निमित्ताने आज ज्या हजारो रेंट-अ-बाईक आणि कार चालतात, त्या या देशी पर्यटकांमुळेच. एवढेच नव्हे तर विविध भागात उभे राहिलेले हस्तकलासारखे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल त्याशिवाय अन्य व्यवसाय या पर्यटकांमुळेच. पण अनेकांना विदेशी पर्यटक आले नाहीत किंवा त्यांची संख्या घटली की आकाश कोसळले असे वाटते. खरे तर ते पर्यटक हवेतच, पण आजवरचा अनुभव पाहिला तर विदेशी पर्यटकांचा भरंवसा नसतो. अनेक गोष्टींवर त्याचे येणे अवलंबून असते, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून रहाणे यापुढे चालणार नाही याची खूणगाठ बांधावी लागेलच.

कोविड संकटापासून पर्यटन व्यवसाय रोडावलेला आहे, हे खरे असले तरी गेल्या दोन-अडीच वर्षात देशी पर्यटकांची संख्या वाढलेली आहे हे मान्य करावेच लागेल. त्याचबरोबर राज्यातील काही अनिष्ट गोष्टीही पर्यटकांची नाराजी ओढवून घेण्यास कारणीभूत ठरल्या आहेत, हे खरेच. गोव्यातील टॅक्सी आणि रिक्षावाले पर्यटकांना लुटतात अशा सर्रास तक्रारी होत्या आणि आता त्यात हॉटेलमालकांचीही भर पडल्याची चर्चा आहे. गोव्यात खरी पर्यटकांची गर्दी उसळते ती नाताळ-नववर्ष दिवसांत. त्यावेळी वर उल्लेखित पर्यटन क्षेत्राशी संबंधित सुविधांचे शुल्क कित्येक पटींनी वाढते, ही वस्तुस्थिती आहे. आता तर त्यात विमान प्रवासाचीही भर पडली आहे. कारण त्यावर कोणत्याच यंत्रणेचे नियंत्रण नसते. अनेकांनी त्या संदर्भातील अनुभव माध्यमांवर टाकल्याची उदाहरणेही आहेत. सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला एकदम अंडी मिळविण्यासाठी कापण्यासारखाच तो प्रकार ठरेल. म्हणूनच कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी या संदर्भात व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. एकेकाळी शिखरावर पोहोचलेल्या गोव्यातील पर्यटनाची वाट आम्हीच लावली, असे ते म्हणतात. पण असे वाटून उपयोगाचे नाही, तर आपल्या चुकीत सुधारणा गरजेची आहे. पण त्यासाठी सर्वांनाच विशेषतः टॅक्सी, शॅक, हॅाटेलवाले यांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सरकारला नवा प्रस्ताव द्यावा लागेल. दोन ते तीन दशकांपूर्वी सगळ्यांनाच गोव्यातील निसर्ग सौंदर्याचे आकर्षण होते. स्वच्छ समुद्र किनारे, निळेभोर पाणी  अशी गोव्याची ख्याती होती. त्यामुळे चोगम विश्रांतीसाठी गोव्यात आलेले राष्ट्रकुल प्रमुखही गोव्याच्या प्रेमात पडले होते. त्यानंतरचा काळ गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी भरभराटीचा गेला होता. पण आता तसे ते सौंदर्य शिल्लक राहिलेले नाही. काळपट पडणारे किनारे, सर्वत्र फैलावत असलेला कचरा, काँक्रिटची जंगले आणि त्यामुळे आक्रसत गेलेली भूमी यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांचे आकर्षण कमी होत गेलेले आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तशातच गेल्या काही वर्षांत, तपमान वाढीचा फटका ऐन उन्हाळ्यात बसू लागला आहे. दमट हवामानामुळे ही उष्णता असह्य होते आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाणेही टाळण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. त्यातूनच  पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली, असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण किनारी भागांत नसली तरी अन्य भागांत पर्यटकांची वर्दळ असते, त्याचा फायदा घेता येईल.


- प्रमोद ल. प्रभुगावकर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)