केस गळती ही फक्त बाह्य बदल नाही, ती आतल्या थकव्याची, काळजीची आणि कधी कधी दुर्लक्षित आरोग्याची गोष्ट सांगते. ही फक्त केसांची समस्या नाही, तर आपल्या शरीराने दिलेली एक हाक आहे. या सामान्य वाटणाऱ्या पण दर एकाला कधी ना कधी सतावणाऱ्या या समस्येवर प्रभाव घालणाऱ्या काही गोष्टींबद्दल आज आपण बोलू.

काॅलेजमध्ये असताना केस किती दाट, लांबसडक आणि सुंदर वाटायचे.. कुठलीही खास काळजी न घेता ते आपोआपच चमकत राहायचे. कोणतीही हेयरस्टाईल सहज व्हायची अन् सदा केस पाठीवर मोकळे रूळत असायचे.. पण कधी तरी नकळत केस गळायला सुरुवात झाली आणि ती हळूहळू वाढतच गेली. सुरुवातीला ‘हे काही दिवसांचं असेल’ म्हणून दुर्लक्ष केलं, पण वेळ जसजसा गेला तसं केसांचं प्रमाण मात्र कमी होत गेलं. वेगवेगळी तेलं, शॅम्पू, घरगुती उपाय झाले पण काहीच फरक नाही. डिलिव्हरीनंतर तर ही समस्या अजूनच तीव्र झाली.
वरील स्थिती फक्त माझीच नसून दर दुसऱ्या महिलेची आहे.
आरशासमोर उभं राहून केस विंचरताना आपलं लक्ष कंगव्यात आलेल्या केसांवर नक्कीच जातं आणि हातात राहिलेले केस पाहून मन नकळत खिन्न होतं. ‘इतके केस का गळत आहेत?’ हा प्रश्न सतत डोक्यात घोळत राहतो. प्रत्येक केसासोबत जणू आत्मविश्वासाचाही एक तुकडा गळून पडतोय, असं वाटतं. पण हळूहळू लक्षात येतं ही फक्त केसांची समस्या नाही, तर आपल्या शरीराने दिलेली एक हाक आहे. या सामान्य वाटणाऱ्या पण दर एकाला कधी ना कधी सतावणाऱ्या या समस्येवर प्रभाव घालणाऱ्या काही गोष्टींबद्दल आज आपण बोलू.
हार्मोन्सचा प्रभाव
महिलांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये हार्मोन्समध्ये होणारे बदल केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. किशोरावस्था, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि रजोनिवृत्ती प्रत्येक टप्प्यावर शरीर वेगळ्या बदलांतून जातं. प्रसूतीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे केस गळती वाढते. काही वेळा पीसीओएस सारख्या समस्यांमुळेही ही समस्या अधिक जाणवते. त्यामुळे या बदलांकडे भीतीने नव्हे, तर समजून घेऊन पाहणं आवश्यक आहे.
आहार : केसांचा पाया
आपण जे खातो, त्याचं प्रतिबिंब आपल्या केसांमध्ये दिसतं. प्रोटीन, आयर्न, झिंक, बायोटीन आणि जीवनसत्त्वांची कमतरता केस कमकुवत बनवते. धावपळीच्या जीवनात अनियमित आहार, फास्ट फूड आणि पाण्याचं अपुरं सेवन यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे आपल्या ताटात रंगीत, पोषक आणि संतुलित आहार असणं हेच केसांसाठी पहिलं औषध ठरतं.
ताण आणि जीवनशैली
सततचा ताण, अपुरी झोप आणि भावनिक थकवा केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. ताणामुळे केसांच्या वाढीचं चक्र बिघडतं आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं. पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणं शांत बसणं, योग-ध्यान करणं, किंवा फक्त स्वतःशी संवाद साधणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मन शांत असेल, तर शरीरही त्याला साथ देतं.
बाह्य कारणांचा परिणाम
केमिकल ट्रीटमेंट्स, हीट स्टायलिंग, चुकीचे हेअर प्रॉडक्ट्स आणि प्रदूषण यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. त्यामुळे ट्रेंडपेक्षा आपल्या केसांच्या गरजेनुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. साधं, नैसर्गिक आणि सौम्य हेअर केअर अनेकदा जास्त परिणामकारक ठरतं.
समस्या समजून घेणं महत्त्वाचं
केस गळती ही एकच कारणामुळे होत नाही. हार्मोन्स, आहार, ताण आणि बाह्य घटक या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे उपायही एकाच गोष्टीत सापडत नाही. स्वतःकडे एक होलीस्टीक दृष्टीने पाहणं हाच बदलाचा पहिला टप्पा आहे.
केसगळती आटोक्यात ठेवण्यासाठी
संतुलित आणि पोषणयुक्त आहार घ्या
दररोज पुरेसं पाणी प्या
नियमित व्यायाम आणि योग करा
केसांवर जास्त केमिकल आणि हीट टाळा
ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा
गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या
शेवटचं महत्त्वाचं हे की, केwस गळती ही फक्त बाह्य बदल नाही, ती आतल्या थकव्याची, काळजीची आणि कधी कधी दुर्लक्षित आरोग्याची गोष्ट सांगते.
स्वतःसाठी थोडं थांबणं, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःवर प्रेम करणं कदाचित हाच खरा उपाय आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला जपतो, तेव्हा आपलं सौंदर्य आपोआप खुलतं.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर