ऑफिसच्या बाहेर पडताना ती पुन्हा त्या मोठ्या इमारतीकडे पाहते. सकाळी जी भीती वाटत होती, ती आता नाहीशी झालेली असते. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद असतो.

अाजचा दिवस काही वेगळीच ऊर्जा घेऊन आला आहे, असं सुमेधाला वाटलं. घड्याळाचा गजर जरी नेहमीप्रमाणे वाजला तरी आज तो आवाज उत्साहाने भरलेला आहे, असं तिला वाटलं. सुमेधाने झोपेतून जागं होत डोळे उघडले आणि क्षणभर छताकडे बघतच राहिली. मनात एकच विचार... आज माझी पहिली नोकरी, नोकरीचा पहिला दिवस!
तसं तर ट्रेनिंग पूर्ण झाल्यापासून ती या दिवसाची वाटच पाहत होती. ती पटकन उठली. सकाळची आन्हिकं आटोपून तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास तिला जाणवला. कालच नीट इस्त्री करून ठेवलेला फॉर्मल ड्रेस तिने घातला आणि केस नीट बांधले. आईनं स्वयंपाकघरातून आवाज दिला, "सुमेधा, नाश्ता तयार आहे गं!"
ती हसतच म्हणाली, "येते गं आई!"
सुमेधा नाश्ता करत असताना आई तिच्याकडे पाहत राहिली. आईच्या डोळ्यांत मुलीबद्दल अभिमान होता. बाबा पेपर वाचत असले तरी अधूनमधून तिच्याकडे पाहून हसत होते. "पहिला दिवस आहे, घाबरू नकोस. तू ट्रेनिंग उत्तम केलं आहेस," बाबा म्हणाले.
सुमेधानं मान हलवली. ‘घाबरू नकोस’ हे शब्द जरी आश्वासक असले, तरी तिच्या मनावर हलकासा ताण होताच. ती घराबाहेर पडली. रस्त्यावरची हवा आज अधिक ताजी वाटत होती. बस स्टॉपकडे जाताना प्रत्येक पाऊल जणू नव्या जगात टाकत आहे, असं वाटत होतं. बसमध्ये बसल्यावर ती खिडकीतून बाहेर बघत होती. कालपर्यंत आपण विद्यार्थिनी, आज मात्र काम करणारी व्यक्ती! हा बदल स्वीकारणं तिला जमत नव्हतं.
ऑफिसच्या इमारतीसमोर उभी राहिल्यावर तिला जराशी भीती वाटली. मोठ्या काचांची बिल्डिंग, आत येणारे-जाणारे लोक, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण, कामं उरकण्याची घाई हे सगळं पाहून ती क्षणभर थांबली.
'हेच माझं नवं जग आहे का?' तिला स्वतःला प्रश्न पडला. ती त्या प्रश्नाच्या गोंधळातच आत गेली. रिसेप्शनवर तिनं आपलं नाव सांगितलं, "सुमेधा देशमुख, आज जॉइनिंग आहे."
रिसेप्शनिस्टनं 'गुड मॉर्निंग' म्हटलं आणि हसून तिला आयडी कार्ड दिलं. "वेलकम! तुमचा डेस्क तिसऱ्या मजल्यावर आहे."
लिफ्टमध्ये उभी राहिल्यावर ती स्वतःच्या आयडी कार्डकडे बघत राहिली. तिसऱ्या मजल्यावर उतरल्यावर टीम लीडरने तिचं स्वागत केलं. "हाय सुमेधा! ट्रेनिंगमध्ये तुमचं काम चांगलं होतं. आजपासून तुम्ही आमच्या प्रोजेक्टचा भाग आहात."
ती नम्रपणे उत्तर देत म्हणाली, "थँक यू सर, मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन."
ऑफिस स्टाफ सुजयनं तिला तिचा डेस्क दाखवला. संगणक, फाईल्स, नोटपॅड सगळं तिच्यासाठी ठेवलेलं होतं. खुर्चीवर बसताना तिला जाणवलं, ही केवळ खुर्ची नाही, ही जबाबदारी आहे.
तिला एक फाईल दिली जाते. हे एक छोटसं टास्क असलं, तरी तिच्यासाठी ते खूप मोठं आहे. ती मन लावून काम सुरू करते. ट्रेनिंगमध्ये शिकलेलं सगळं आठवण्याचा प्रयत्न करते. काही वेळानं स्क्रीनकडे बघत बघत तिच्या कपाळावर आठ्या पडतात.
'हे कसं करायचं होतं?'
ती थोडी घाबरते, पण लगेच शेजारी बसलेल्या सुजयला विचारते. तो शांतपणे तिला समजावतो, "रिलॅक्स, टेन्शन नको घेऊस."
त्या एका वाक्यानं तिचा ताण कमी होतो. ती पुन्हा कामात लक्ष घालते. आता ती तिथल्या वातावरणात अॅडजस्ट होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी ती कॅन्टीनमध्ये जाते. नवीन चेहरे, नवीन गप्पा, नवीन वातावरण. काही जण तिची ओळख करून घेतात.
"पहिला दिवस?"
"हो," ती हसून उत्तर देते.
"एन्जॉय करा. पहिला दिवस कधीच विसरता येत नाही!"
ती हसते. खरंच, हा दिवस खास आहे. दुपारनंतर कामाचा वेग वाढतो. ती एकामागून एक टास्क पूर्ण करत राहते. काही चुका होतात, पण ती त्या लगेच दुरुस्त करते. प्रत्येक छोट्या यशाने तिचा आत्मविश्वास वाढत जातो.
संध्याकाळी ऑफिसमधील गडबड थोडी कमी होते. तीही कॉम्प्युटर बंद करून खुर्चीत मागे टेकून बसते आणि दीर्घ श्वास घेते.
झालं... पहिला दिवस पूर्ण झाला!
ऑफिसच्या बाहेर पडताना ती पुन्हा त्या मोठ्या इमारतीकडे पाहते. सकाळी जी भीती वाटत होती, ती आता नाहीशी झालेली असते. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद असतो.
घरी परतल्यावर आई दार उघडते. "कसा गेला पहिला दिवस?"
सुमेधा हसत म्हणते, "खूप छान! थोडी भीती वाटली होती, पण आता सगळं काही छान वाटतंय."
रात्री झोपताना ती दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा आढावा घेते. 'पहिली नोकरी म्हणजे फक्त पगार मिळवणं नाही, तर ती स्वतःला शोधण्याची सुरुवात आहे', हे तिला आज उमगलेलं असतं.
डोळे मिटताना तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं. उद्याचा दिवस अजून नवीन अनुभव घेऊन येणार आहे, याची खात्री तिच्या मनात असते. सुमेधाचा हा पहिला दिवस तिच्या आयुष्याच्या पुस्तकातलं पहिलं वहिलं सुंदर पान बनून राहतो.

मंजिरी वाटवे