स्वावलंबनाचे पहिले पाऊल

परीक्षाही संपत आल्या होत्या आणि एक दिवस नोटीस बोर्डवर 'समर कॅम्प'ची नोटीस लागली. एक महिन्याचा कॅम्प आणि तोसुद्धा थेट सिंधुदुर्गात! मग काय, मैत्रिणींमध्ये चर्चा झाली आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी आपली नावं दिली. मीही घरी हट्ट धरला की मला जायचंच आहे.

Story: सहज सुचलेलं |
01st May, 11:01 pm
स्वावलंबनाचे पहिले पाऊल

शा​ळेतून आपण कॉलेजमध्ये जातो ना, तेव्हा सगळंच कसं वेगळं वाटतं! रंगबेरंगी कपडे, नवनवीन मित्र-मैत्रिणी, कॉलेज कॅन्टीन... सगळंच अगदी अप्रूप असतं. साहजिकच आपल्या 'ऍटीट्यूड'मध्येही थोडा फरक पडतोच. मग यालाच घरचे म्हणतात, "चला, कॉलेजात गेली आता, शिंगे फुटली हिला!" त्यात आम्ही तर अगदी गावातून शहराच्या झगमगाटात आलेलो, त्यामुळे आमची ती फुटलेली शिंगे जरा जास्तच टोकदार होती. असो!

घरात मी मोठी, त्यामुळे माझे भरपूर लाड झालेले. दहावीपर्यंत मला इकडची काडी कधी तिकडे करावी लागली नव्हती. शिवाय जे हवे ते मिळतही होते. सकाळी चहा-नाश्ता अगदी आईच्या हातचा मिळायचा. मग कॉलेज, त्यानंतर क्लासेस बंक करून कॅन्टीनमध्ये मारलेली रपेट! तो गरमागरम समोसा, ती भाजी... नुसती मज्जा असायची. तुम्हाला माहितीये? आम्ही क्लास बंक करायचो, ते अभ्यासाचा कंटाळा यायचा म्हणून नाही, तर त्यामागचा मुख्य विषय 'कॅन्टीन' हा असायचा. मस्त मोकळे वातावरण, रंगलेल्या गप्पा-टप्पा, साथीला थंड पेये... असं आमचं मस्त कॉलेज लाईफ सुरू होतं.

संध्याकाळी घरी आले की, "किती थकले मी, आज खूप अभ्यास होता," असं थोडं नाटक केलं की आई मायेने गरमागरम जेवण वाढायची. थोडक्यात सांगायचं तर, हे वय फक्त मजा मारण्यासाठीच आहे, हे मनावर पक्कं बिंबलेलं होतं. तशी आजी मधूनमधून ओरडायची, "अगं, ती आता मोठी झालीय. निदान भात तरी करायला शिकू दे तिला. आपले कपडे, चहाचा कप तरी निदान स्वतःचा स्वतः धुवून ठेवायला शिकव." असं ती नेहमी आईला सांगायची. पण आम्ही ऐकणार थोडीच ना!

अशीच हुंदडेगिरी करता करता एक वर्ष पूर्ण होत आलं. परीक्षाही संपत आल्या होत्या आणि एक दिवस नोटीस बोर्डवर 'समर कॅम्प'ची नोटीस लागली. एक महिन्याचा कॅम्प आणि तोसुद्धा थेट सिंधुदुर्गात! मग काय, मैत्रिणींमध्ये चर्चा झाली आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी आपली नावं दिली. मीही घरी हट्ट धरला की मला जायचंच आहे. घरच्यांनी खूप समजावलं की, "महिनाभर मुलगी बाहेर राहणार, ती स्वतःचं कसं करणार?" 'स्वावलंबन' हा शब्द फक्त पुस्तकापुरता मर्यादित असणारी मी, चक्क एक महिना कॅम्पला जाण्याचा हट्ट धरून बसले होते. शेवटी एकदाची आई-बाबांनी परवानगी दिली.

बॅग भरायला बहीण आणि बसपर्यंत सोडवायला हिराबाई... अशा थाटात मी कॅम्पला निघाले. पोहोचलो तो पहिला दिवस मस्त गेला. रात्री जेवून, गप्पा मारून आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ती मॅडमच्या आवाजाने आणि तीसुद्धा पहाटे साडेपाचला! मी अभ्यंगस्नानाचा दिवस सोडला तर पहाटेचे साडेपाच कधी घड्याळात पाहिलेच नव्हते. प्रवासाचा थकवा होताच, पण नाईलाज होता. गपचूप उठले, प्रातर्विधी आटोपले आणि चहाची वाट पाहत बसले.

एवढ्यात मॅडम आल्या आणि त्यांनी एक लिस्ट काढली. सकाळी चहा कोणी बनवायचा, त्या विद्यार्थ्यांची नावे त्यांनी वाचली. हाय रे देवा! त्यात नेमके माझेच नाव होते. चरफडत उठले आणि आणखी दोन मैत्रिणींच्या मदतीने कसातरी चहा बनवला. त्यानंतर मॅडमनी कॅम्पमधील कामांची वाटणी सगळ्या विद्यार्थ्यांत केली. हे माझ्यासाठी अगदी नवीनच होतं. "मस्त खायचं-प्यायचं आणि फिरायचं म्हणजे कॅम्प," असा जो माझा समज होता, त्याला पार तडा गेला.

पण आता कोणाकडे तक्रार करणार? सकाळी नाश्ता, त्यानंतर गावात स्वच्छता मोहिमेत भाग घ्यावा लागायचा. घरात 'खराटा' कोणता आणि 'केरसुणी' कोणती, हे न समजणारी मी चक्क लोकांना स्वच्छतेचे धडे देत होते! सुरुवातीला "हे आपल्याला जमणार नाही," "कुठून या कॅम्पला आले," असं वाटायचं. त्यात आरोग्य शिबिर असायचं. दुपारच्या वेळी डॉक्टरांबरोबर आम्हालाही पाठवलं जाई. अहो, जेवण झाल्यावर मस्त वामकुक्षी घेणारी मी, भरदुपारी मेडिकल सेंटरमध्ये मदतनिसाचे काम शिकू लागले.

हळूहळू दिवस जाऊ लागले आणि कठीण वाटणारी कामे अंगवळणी पडू लागली. जेवण करणे, भांडी घासणे, स्वतःचे कपडे धुणे... अशा अनेक गोष्टी मी शिकले. 'स्वावलंबन' म्हणजे नेमके काय, हे मला तिथे उमजले. शरीराची हालचाल झाल्याने अंगी एक प्रकारचा हलकेपणाही आला होता.

बघता बघता महिना संपला आणि मी घरी पोहोचले. महिनाभरानंतर आईच्या हातचे जेवून सुखात झोपले. आणि काय सांगू! दुसऱ्या दिवशी बरोबर साडेपाचला मला जाग आली. सवयीने उठले आणि पटापट चहाचे आधण ठेवले. कपांचा आवाज ऐकून आई जागी झाली आणि आश्चर्याने म्हणाली, "रेशू, कितें करता गो?" (रेशू, काय करतेस ग?) आईच्या आवाजाने मला भान आले की मी घरी आहे. अरे हो, कॅम्प संपला ना! पण तरीही मी मस्त चहा केला, आईला दिला आणि स्वतःही घेतला. आई खूप खुश झाली. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "शिकलीस पोरी, एका महिन्यात मोठी झालीस तू!"

खरंच, मी मोठी झाले होते. त्या एका महिन्याच्या कॅम्पमध्ये माझे सगळे लाड, अहंकार आणि ती नुकतीच फुटलेली टोकदार शिंगे... सगळं काही गळून पडलं होतं. उरली होती ती फक्त एक स्वावलंबी, जाणती आणि समजदार 'रेशू'!


- रेशम जयंत झारापकर, मडगाव, गोवा.