पश्चात्ताप ते समाधान

​आज मेघनाकडे अनेक केसेस येतात अशा, पण मेघना बदलली आहे. लगेच आरपार करणारी ती आता दोघांना समोर बसवून समेट करायचा, संसाराचे महत्त्व पटवायचा प्रयत्न करते.

Story: सहज सुचलेलं |
24th April, 09:48 pm
पश्चात्ताप ते समाधान

को​र्ट रूमचे काम नुकतेच संपले होते दिवसभराचे. सगळे वकील एक तर आपल्या चेंबरमध्ये सुस्तावून चहा पीत होते किंवा आपल्या सायकल, स्कूटर, किंवा जर नशिबात असेल तर आपल्या ए.सी. गाडीतून घरी जायला निघाले होते. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यातून आत्ता कुठे मेघनाला आराम मिळाला होता. मेघना पाटील एक प्रतिथयश वकील शहरातील. कौटुंबिक हेवेदावे, पती-पत्नीची भांडणे, या विषयातील नामवंत वकील. विशेषतः घटस्फोट या विषयातील तज्ज्ञ अगदी. अ‍ॅड. मेघनाकडे घटस्फोटाची केस आली आणि निकाल त्या केसमधील पत्नीच्या बाजूने लागला नाही, असे कधीच झाले नव्हते.

​आजच मेघनाच्या करिअरमधल्या एका महत्त्वाच्या घटस्फोटाच्या केसचा निकाल लागला होता. अर्थात नेहमीप्रमाणे तो पत्नीच्याच बाजूने लागलेला. एका प्रसिद्ध गायिकेची, जी अनेक चॅनेलवर वगैरे गाजत होती, तिची ही केस होती. अर्थात प्रसिद्धीही मोठी मिळाली होती. एक मोठी गायिका आणि तिचा सध्या तरी काहीच कामधाम न करणारा नवरा. गायिकेला काडीमोड हवा होता असल्या नालायक नवऱ्याकडून. अर्थात असे तिचे मत होते. जनप्रवाह काही वेगळाच होता. परिचयाच्या अनेकांच्या म्हणण्यानुसार आपल्या पत्नीच्या कलेची योग्य कदर व्हावी म्हणून नवऱ्याने आपली शेती विकून तिला मुंबईत आणली. तिच्यासाठी अनेकांकडे, वेगवेगळ्या स्टुडिओकडे चपला झिजवल्या. एकुलत्या एक मुलीला सांभाळले. असा पती त्या गायिकेला आपले हात आभाळाला टेकल्यावर नकोसा झाला होता. नालायक, गावठी वाटत होता. अर्थात सदानकदा कर्तृत्वाचे चार चाँद लावण्यात मग्न अशा अ‍ॅड. मेघनाला त्याची फिकीर नव्हती. तिचा मतलब फक्त केस जिंकणे आणि पैसा मिळवणे.

​आपल्या थंडगार ए.सी. गाडीत बसतच होती मेघना, अचानक तिचे लक्ष समोर गेले. एक काळा-सावळा साधे कपडे घातलेला तरुण आणि त्याला घट्ट बिलगलेली एक छोटीशी मुलगी. मेघनाने ओळखले झटकन त्याला. काही वेळापूर्वीच तर तो माणूस कोर्टात होता आपला प्रतिवादी म्हणून. नेमके त्याच सुमारास एक आलिशान गाडी भरकन समोरून गेली. नक्कीच ती त्या गायिकेची, अर्थात त्या समोरच्या तरुणाच्या माजी पत्नीची होती. हो, माजीच. कारण अर्ध्या तासापूर्वीच तर अ‍ॅड. मेघनाने कागदावर सह्या घेतल्या होत्या घटस्फोटाच्या. त्या तरुणाची नजर आणि त्या नजरेतील भाव खूपच करुण वाटत होते. पत्नीच्या करिअरकरिता सगळे सोडून आलेला तो आता त्या छोट्या मुलीला घेऊन कुठे जाणार होता?

​कधी नव्हे ते झटकन नजर चोरून गाडीत बसली मेघना. घरी निघाली, पण का कोणास ठाऊक खूपच चलबिचल वाटत होती. आता यश तर मिळाले, उद्या पेपरमध्ये फोटो सुद्धा येईल, पण मनात आत कुठेतरी कोणावर अन्याय केल्याची भावना तीव्रपणे जागृत होत होती. त्याच तंद्रीत घरी आली मेघना.

​करिअर आणि यशाच्या नशेत असलेली मेघना तशी एकटीच राहत होती. तसेच तशा फार मित्र-मैत्रिणी सुद्धा नव्हत्या तिच्या, की कुठेतरी मन मोकळे करावे. फ्रेश झाली खरी पण डोळ्यासमोरून त्या असहाय नवऱ्याचा चेहरा काही केल्या हलेना. टी.व्ही.त मन रमेना. मोबाईल फोन घ्यावासा सुद्धा वाटत नव्हता. कळत-नकळत आपल्याकडून अन्याय झालाय एका कसलीही चूक नसलेल्या माणसावर, असे तिला सतत वाटू लागले. त्या छोट्या मुलीचे आई-बाप आपण तोडले, याबद्दल ती स्वतःला अपराधी मानू लागली. खरंच पूर्वी असे कधी घडत नव्हते, पण आज त्या असहाय माणसाच्या डोळ्यातील भाव तिला अस्वस्थ करू लागले.

​तशी मेघना जरी वकील असली तरी एका सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेली. आपल्या आई-बापाची संसार सुखाचा व्हावा, मुले मोठी व्हावी म्हणून चाललेली धडपड तिने पाहिली होती. अहो, त्यांचा संसार सुखाचा होता म्हणूनच तर आपण व्यवस्थित शिकलो, मोठे वकील झालो, याबाबत तिचे दुमतही नव्हते. पण मग त्या छोट्या मुलीचे काय? नक्की तिची आई, ती पत्नी आपल्या नात्याला विसरली होती, पण म्हणून एक वकील या नात्याने नव्हे, तर एक स्त्री म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे तसेच तिला हवेतून जमिनीवर आणून तिच्या कुटुंबाला तिच्या हृदयात परत स्थान मिळवून देणे सहज शक्य होते तिला. रात्रभर विचार करीत डोळ्याला डोळा न लागलेली मेघना पहाटे उठली ती एका वेगळ्याच विचाराने, एका वेगळ्या जाणीवेने. आतापर्यंत आपण अनेक संसार तोडले, पैसा मिळवला, यश मिळाले. पण आता गरज होती स्वस्थ मनाची, शांततेची.

​आज मेघनाकडे अनेक केसेस येतात अशा, पण मेघना बदलली आहे. लगेच आरपार करणारी ती आता दोघांना समोर बसवून समेट करायचा, संसाराचे महत्त्व पटवायचा प्रयत्न करते. काही वेळा विरस होतो, पण अनेकदा यश मिळते. खरंच आपल्या कामात खूश आहे अ‍ॅड. मेघना पाटील. पैसा भले कमी मिळो, पण समाधान आणि दुवा मात्र भरपूर जोडतेय ती.

​आणि हो! आतापर्यंत एकटी राहिलेली मेघना आपल्या हाताला मेहंदी लावायला उतावीळ झालीय. बघा कोण सुयोग्य नवरा मुलगा असेल तर...


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.