गोमंतकाची महामाया देवी लईराई

देवीवरील श्रद्धा प्रत्येक भक्ताला जगण्याची नवी ऊर्जा देते. अवघ्या गोमंतकाची पाठराखण करणारी देवी लईराई भक्तांच्या पाठीशी सदैव उभी असते, असा विश्वास आहे.

Story: विशेष |
17th April, 09:20 pm
गोमंतकाची महामाया देवी लईराई

वै​शाख शुद्ध पंचमीला खुलते गोमंतक भूमी; 

देवी लईराईच्या जत्रेसाठी भरते भक्तांची गर्दी.

गोवा म्हटला की आपल्याला समुद्रकिनारे, हिरवीगार निसर्गरम्य दृश्ये, शेती आणि कष्टकरी माणसे आठवतात. पण या सर्वांबरोबरच गोव्याची एक महत्त्वाची ओळख म्हणजे त्याची समृद्ध धार्मिक परंपरा. आजही ‘सात बहिणी आणि एक भाऊ’ या देवदेवतांच्या कथा गोमंतकीयांच्या जीवनात खोलवर रुजलेल्या आहेत. जत्रा, कळस, कौल यांसारख्या परंपरांमधून ही श्रद्धा स्पष्ट दिसून येते.

एप्रिल-मे महिन्याची चाहूल लागली की संपूर्ण गोमंतक भूमी उत्साहाने भरून जाते, कारण याच काळात अवघ्या गोमंतकाची आदिमाया देवी लईराईची जत्रा भरते. प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात देवीबद्दल अपार श्रद्धा आणि भक्ती असते. जत्रा जवळ आली की मांसाहारी असलेले लोकही शुद्ध शाकाहार पाळतात. ही त्यांची श्रद्धा आणि भक्ती दर्शवणारी गोष्ट आहे.

उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील शिरगाव येथे भरत असलेली ही जत्रा अत्यंत प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे जळत्या निखाऱ्यांवरून अनवाणी पायांनी चालणारे ‘धोंड’. हे धोंड देवीच्या सन्मानार्थ अग्निदिव्यातून चालत तिचे आशीर्वाद घेतात.

या परंपरेमागे एक पुरातन कथा सांगितली जाते. एकदा देवी केळबाईने तिचा भाऊ खेतोबा याला जळण आणण्यासाठी पाठवले. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने तिने देवी लईराईला त्याचा शोध घेण्यासाठी पाठवले. लईराईला तो मुलांबरोबर खेळताना दिसला, पण त्याने घरी येण्यास नकार दिला. यामुळे रागावलेल्या लईराईने त्याला लाथ मारली. नंतर स्वतःच्या कृतीबद्दल तिला पश्चात्ताप झाला आणि प्रायश्चित्त म्हणून तिने अग्निदिव्यातून चालण्याचा संकल्प केला. त्या स्मरणार्थ आजही हजारो धोंड अग्निदिव्यातून चालतात.

जत्रेला मोगऱ्याचा सुगंध दरवळतो,

एका मोगरीच्या कळीने होमकुंड प्रज्वलित होते अन् आईचा आशीर्वाद सर्वांना लाभतो.

मोगऱ्याचा सुगंध दरवळणारी ही जत्रा भक्तिभावाने भरलेली असते. असे मानले जाते की देवीला मोगऱ्याची फुले अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे प्रत्येक भक्त देवीला मोगऱ्याची फुले अर्पण करतो. धोंडदेखील अग्निदिव्यातून चालताना हातात मोगऱ्याच्या कळ्या धरून असतात. यातून त्यांच्या अढळ श्रद्धेची प्रचिती येते.

जत्रेच्या एक महिना आधीपासूनच धोंड कठोर नियम आणि संयम पाळायला सुरुवात करतात. आधुनिक युगातही अशा परंपरा जपल्या जात आहेत, ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे.

देवीवरील श्रद्धा प्रत्येक भक्ताला जगण्याची नवी ऊर्जा देते. अवघ्या गोमंतकाची पाठराखण करणारी देवी लईराई भक्तांच्या पाठीशी सदैव उभी असते, असा विश्वास आहे. जत्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि जातीभेद, द्वेष विसरून एकोपा अनुभवतात.

म्हणूनच म्हणावेसे वाटते,

 अवघ्या गोमंतकाची आई, देवी लईराई,

 तिची गाथा शब्दांत मावेनाशीच आहे...