माझी आजी आणि आई अगदी सुगरण! रोजच्या जेवणात मासे तर असतच, शिवाय भाज्या, वेगवेगळी काप, पापड, लोणची हे प्रकारही असत. यात विकतचे फारसे नसे, सगळे कसे घरी केलेले, 'होम मेड' म्हणा हवे तर.

संसार सुखी होण्यासाठी छत्तीस गुण जुळणे आवश्यक असते असे म्हणतात. अर्थात, आमची पत्रिका बघितली गेली नाही, त्यामुळे किती गुण जुळले आणि किती नाही याची कल्पना नाही; पण आमचा एक मस्त गुण जुळला, तो म्हणजे 'खादाडी'. आमच्या सुखी संसाराचा मूलमंत्र म्हणा हवे तर - तो म्हणजे चवीचे आणि चवीने खाणे.
माझे लग्नापर्यंतचे आयुष्य खेड्यातच गेले, पण घरी तशी बऱ्यापैकी सुबत्ता होती. माझी आजी आणि आई अगदी सुगरण! रोजच्या जेवणात मासे तर असतच, शिवाय भाज्या, वेगवेगळी काप, पापड, लोणची हे प्रकारही असत. यात विकतचे फारसे नसे, सगळे कसे घरी केलेले, 'होम मेड' म्हणा हवे तर. काहीही म्हणा, चटकदार खाण्याची सवय मला माझ्या घरीच लागली. आमच्या लहानपणी हॉटेल हा प्रकार तसा कमीच होता आणि हॉटेलात पावभाजी, समोसा, लाडू, भक्कम पेढा असे ठराविक पदार्थच मिळत. गोव्यात तेव्हा शेट्टी-कामथ संस्कृती तशी कमीच होती, अगदी पणजी-मडगावपुरती मर्यादित. 'चायनीज' हे खायच्या पदार्थाचे नाव असते, याचा शोध मला मुंबईला गेल्यावर लागला.
मुंबईला पोहोचले आणि तशा म्हणाल तर सगळ्या सवयी बदलत गेल्या. त्यात वर म्हटल्याप्रमाणे पतीराजांची साथ, मग काय बघायलाच नको! नवपरिणीत आम्ही त्या वेळेस रोज संध्याकाळी कधी चौपाटी, तर कधी कुठे फिरायला जात असू. 'चाट' या प्रकाराची ओळख व चव मला पहिल्यांदा लागली ती याच काळात. मी तर त्या पाणीपुरीच्या अक्षरशः प्रेमातच पडले. मग तो दहीवडा, भेळ, रगडा-पॅटीस आणि सोबतीला चौपाटीचा तो थंडगार खारा वारा... अगदी मस्तच!
विविधतेच्या बाबतीत मुंबईचा नंबर पहिला; मग ती माणसांमधील असो अथवा खाण्यापिण्यातील. अहो, साध्या दुधाचे सुद्धा तीन प्रकार असतात, हे मला तिथे गेल्यावर कळले. आमच्या घरी कसे म्हशीचे ताजे दूध असायचे. असो! गोव्यात साधारणतः हॉटेलात गेल्यावर पावभाजी मागवणे हा प्रघात आहे. तिची टेस्ट सुद्धा फार सुंदर असे, मिक्स भाजीबद्दल तर विचारायलाच नको. तर एकदा सकाळी गिरगावात नाश्ता करायला गेल्यावर मी सवयीनुसार पावभाजी मागितली. वेटर बघतच राहिला, मग म्हणाला, "मॅडम, पावभाजी तो शाम को मिलती है, अभी किधर?" उगाच हसू नको म्हणून ऑर्डर चेंज केली. मग आठ दिवसांनी परत संध्याकाळी त्याच हॉटेलात गेल्यानंतर पावभाजीचा फरक कळला. 'बॉम्बे पावभाजी' म्हणजे काय, ते तेव्हा उमजले. खमंग बटर, मसाल्याचा वास आणि बटरमध्येच भाजलेले ते मऊ लुसलुशीत छोटे पाव... अहाहा!
गोव्यातील ते जुने दिवस जरा कर्मठच होते. त्या काळी 'गाडा' हा प्रकार गोव्यात नाहीसारखाच होता. माझ्या आठवणीत मडगावात गार्डनजवळ एक भेळपुरीचा गाडा होता. पण इकडे मुंबईत नाक्यानाक्यावर वडापावचे गाडे! पहिल्यांदा उघड्यावर खायला कसेतरीच वाटायचे, पण एकदा तो गरमागरम बटाटेवडा लाल सुक्या चटणीबरोबर उदरात गडप झाला की मग कसली भिड अन कसली लाज! पंधरा दिवसांत स्वतःहून गाड्यावर जाऊन वडापाव आणायला शिकले. तो गरम तेलात वडा सोडताना होणारा 'चर्रर्र' आवाज आणि सुटलेला खमंग वास मला खूप आवडू लागला.
मुंबईत त्या काळी शेट्टी-कामथ खाद्यसंस्कृतीचे अतिक्रमण होण्याआधी जी उपहारगृहे होती, ती जास्त करून जाती-धर्मावर आधारित नावाने असत. अर्थात प्रवेश सर्वांनाच होता, पण अस्सल ब्राह्मणी क्षुधाशांती गृहे, मांसाहारी भांडारी हॉटेल्स, मटण-चिकन करणारे बडेमियांसारखे मुस्लिम हॉटेलवाले... अहो, कधी नावेही ऐकली नव्हती असे पदार्थ या जिभेने चाखले आहेत. त्यात पुन्हा भर पडली ती पारशी आणि इराणी रिफ्रेशमेंटची. तुम्हाला माहिती आहे, दुधात साखर विरघळून जावी तशा सहजतेने हे लोक मुंबईकर झाले. काय लज्जत त्यांच्या पदार्थांची! मावा केक, ब्रून-मस्का, खिमा... अहो, चहा जरी घराबाहेर प्यायचा असेल तर तो इराण्यांचाच! आमचे सासरे तर चाफेकर दुग्धालयात थालीपीठ खात आणि चहा मात्र बाजूच्या 'गुडमन' इराण्याकडे जाऊनच पीत. असो!
पुढे मग मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत भरपूर नवनवीन पदार्थांची भर पडत गेली. सगळेच लिहायचे तर अख्खे पुस्तकच तयार होईल. आणि हो, मुंबईची स्पेशल 'पानावरची कुल्फी' ती तर राहिलीच! मस्त मलईदार, जास्त गोड नाही अशी घट्ट कुल्फी पानावर घेऊन खायची, आणि ती सुद्धा रात्री मस्त थंडीत. असो!
मला मुळातच खादाडीची आवड म्हणा किंवा माझी जीभ जास्त चवीची म्हणा, पण जिथे जिथे मी फिरले, तिथे तिथल्या स्थानिक पदार्थांची चव मी आवर्जून घेतली. काही आवडले तर काही नाही; पण खरं सांगू, अजूनही जिभेवर स्थिरावलेली फणसाच्या सुकी सुंगटा (सुकी कोळंबी) घातलेल्या खतखत्याची आणि गरमागरम हुमण अन् चुरचुरीत भाजलेल्या बांगड्यांची चव काही जात नाही हो...

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.