सासू सुनेचं नातं फक्त वर्तमानकाळात घडत नाही, त्यात भूतकाळही जगत असतो. अनेकदा सासू स्वतः कधीकाळी सून म्हणून जे सहन करून गेली, ते नकळत पुढे सरकवत असते.

घरातल्या भांडणांना फार मोठी कारणं असतात असं नाही. कधी भाजीला मीठ जास्त पडतं, कधी कपडे वाळत घालण्याची पद्धत चुकते, कधी चहाचा कप वेळेवर मिळत नाही. बाहेरून पाहणाऱ्याला वाटतं, “इतक्याशा गोष्टीवर एवढा राग?” पण घरातल्या चार भिंतींना माहिती असतं, वाद भाजीवर नसतो, तो मनात साचलेल्या न बोललेल्या शब्दांवर असतो.
अनेक वर्षांच्या कष्टातून सासूने संसाराची घडी बसवलेली असते. नवीन सुनेच्या आगमनाने आपले महत्त्व किंवा नियंत्रण कमी होईल, या भीतीपोटी सासूच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. हीच बदलत्या स्थानाची भीती सासू-सुनेच्या नात्यात तणाव निर्माण करते.
दुसरीकडे सून नव्या घरातून येणाऱ्या सूचना आणि तुलनांच्या दबावात सून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असते. सासरचे नियम स्वीकारताना तिची खरी धडपड असते ती स्वतःला न हरवण्याची. सासरच्या चौकटीत स्वतःला न हरवता, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी चाललेली ही एका सुनेची धडपड सुरु असते
मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन : नात्याच्या पृष्ठभागाखाली काय चालतं?
मनोविश्लेषणाच्या दृष्टीने पाहिलं, तर सासू सूनेचं नातं फक्त वर्तमानकाळात घडत नाही, त्यात भूतकाळही जगत असतो. अनेकदा सासू स्वतः कधीकाळी सून म्हणून जे सहन करून गेली, ते नकळत पुढे सरकवत असते. “माझ्यावेळी मला कोणी विचारलं नाही” ही दडपलेली वेदना कधी कठोर अपेक्षांच्या रूपात बाहेर पडते. याला पुनरावृत्तीचा नमुना म्हणता येईल.
सूनेच्याही मनात तिच्या माहेरातील अनुभव, जडणघडणीची पद्धत, मान्यतेची गरज आणि स्वतःची ओळख सिद्ध करण्याची भूक असते. जर तिला सतत टीका जाणवली, तर ती प्रतिकार करते. परंतू जर तिला स्वीकार मिळाला, तर ती सहज उमलते.
घरात मग दोन व्यक्ती राहत नाहीत, दोन इतिहास राहतात. दोन अपूर्ण गरजा राहतात. दोन अहंकार नाही, तर दोन जखमा एकमेकींसमोर उभ्या राहतात.
मग ह्यावर उपाय काय?
प्रतिक्रिये मागची खरी भावना ओळखा : राग दिसतो, पण मुळात भीती, दुखावलेपण किंवा उपेक्षा असू शकते. वागणूक नव्हे, भावना समजून घ्या.
आरोप प्रत्यारोप थांबवा : “ती मला मुद्दाम त्रास देते” असं वाटणं अनेकदा आपल्या असुरक्षिततेचं आरोपण असू शकतं. प्रत्येक कृती वैयक्तिक हल्ला नसतो.
जुन्या जखमा ओळखा : “माझ्याशी असंच झालं होतं” म्हणून आपण नकळत तसंच वागत आहोत का, हा प्रश्न स्वतःला विचारा.
मान्यता द्या : सासूला तिच्या योगदानाची दखल हवी असते; सूनेला तिच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार हवा असतो. मान्यता दिली की प्रतिकार कमी होतो.
निरोगी मर्यादा ठेवा : प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप नको, पण पूर्ण दुरावाही नको. मर्यादा म्हणजे नातं तोडणं नाही; ते टिकवण्याची पद्धत आहे.
प्रत्यक्ष संवाद करा : टोमणे, तिसऱ्या व्यक्तीकडून बोलणं, अबोला याऐवजी स्पष्ट आणि शांत संवाद साधा.
भूमिकांतील बदल स्वीकारा : सासूने नियंत्रणातून मार्गदर्शनाकडे, सूनेने बचावातून सहकार्याकडे यायला हवं.
सहानुभूतीचा सराव करा : स्वतःच्या जागी न पाहता एक दिवस तिच्या जागी उभं राहून बघा. दृष्टिकोन बदलला की नातं बदलतं.
सूनेनेही सासूला फक्त टीका करणारी व्यक्ती म्हणून पाहू नये. तिच्यामागे वर्षानुवर्षांचा अनुभव, थकवा, आणि अनेकदा न मिळालेल्या कौतुकाची भूक असते. सासूनेही सूनेकडे फक्त “नवीन पिढी” म्हणून पाहू नये. तिच्यामागे स्वप्नं, करिअर, स्वतःची मतं आणि स्वतःच्या पद्धतीने जगण्याची इच्छा असते.
शेवटी प्रश्न एवढाच, घरात कोण जिंकलं याचा आनंद जास्त की नातं टिकल्याचं समाधान जास्त? कारण सासू आणि सून या प्रतिस्पर्धी नाहीत तर त्या दोन स्त्रिया आहेत, ज्यांना फक्त एकमेकींचं मन ऐकायचं बाकी आहे.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४