स्वातंत्र्याचा परवाना

लायसन्स मिळाल्याची खात्री होताच चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटतं. इतक्या दिवसांची मेहनत, सराव, पडणं-उठणं, सगळं काही डोळ्यासमोर येतं. पहिल्यांदा स्कूटर शिकताना जी भीती वाटली होती, ती आठवते आणि आज त्याच भीतीवर मात करून मी इथे उभी आहे, याची जाणीव होते.

Story: पहिलं वहीलं |
17th April, 08:04 pm
स्वातंत्र्याचा परवाना

आ​जचा दिवस काहीसा वेगळाच उगवला. खरं तर सगळे दिवस सारखेच असतात. फक्त प्रत्येक व्यक्तीला तिच्या कामानुसार ते वेगळे वाटतात. जसं सरितासाठी आजचा दिवस काहीसा टेन्शनवाला, पण एक स्वप्न पूर्ण होणार याची खात्री असणारा असा; पण तिच्या मनात मात्र हलकीशी धडधड सुरू आहे. आज ती टू-व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी टेस्ट द्यायला जात आहे. इतके दिवस स्कूटर शिकताना जो आत्मविश्वास वाटत होता, तो आज कुठेतरी लपून बसला आहे. “काही नाही, जमेल तुला,” असं स्वतःलाच पुन्हा पुन्हा सांगत ती तयार होते.

​घरातून बाहेर पडताना सरिता आईचा आशीर्वाद घेते. आईच्या डोळ्यांतही थोडी काळजी, पण त्याहून जास्त विश्वास दिसतो. हातात कागदपत्रांची फाइल घट्ट पकडलेली असते. सरिता स्कूटर सुरू करते आणि आरटीओच्या दिशेने निघते. रस्त्यावरची वर्दळ नेहमीसारखीच आहे, पण आज प्रत्येक सिग्नल, प्रत्येक वळण जणू तिला काहीतरी शिकवत आहे, “सावध राहा, पण घाबरू नकोस,” असं सांगत आहेत असं तिला वाटत होतं.

​आरटीओ ऑफिससमोर पोहोचताच तिथलं वातावरण वेगळं जाणवतं. अनेक जण टेस्टसाठी आलेले असतात. सरिता सभोवताली एकदा बघते. तिला दिसतं की काही जण अगदी शांत आहेत, तर काहींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण आहे. सरिताही त्या गर्दीत उभी राहते, तिचं नाव पुकारलं जाईल त्या क्षणाची वाट बघत. तिचे हात थोडे थरथरतात आणि हृदयाची धडधड वाढत जाते.

​“पुढचं नाव...!” आवाज येतो आणि सरिता नाव ऐकू येताच ती पुढे सरकते. त्या क्षणी सगळं काही जणू थांबतं. अधिकारी तिच्याकडे पाहतात आणि शांतपणे सांगतात, “आठ अंकात गाडी चालवून दाखवा.” इतकं ऐकताच मनात भीतीचं सावट पसरतं. आठ आकृती! सराव केला आहे, पण इथे चूक झाली तर? अपयश आलं तर?

​ती स्कूटरवर बसते. हात हँडलवर घट्ट पकडलेले, पाय थोडेसे थरथरत आहेत. ती एक खोल श्वास घेते आणि स्वतःलाच सांगते, “हेच तर तू रोज करतेस, मग आज का घाबरतेस?”

​ती गाडी सुरू करते. पहिलं वळण घेते. मन पूर्णपणे एकाग्र झालेलं आहे. आसपासचे लोक, त्यांचे आवाज, सगळं काही ती विसरते. फक्त ती आणि तिची स्कूटर. दुसऱ्या वळणावर येते तेव्हा क्षणभर वाटतं की संतुलन ढळेल, पण लगेच ती स्वतःला सावरते. “नको घाबरूस,” मनातला आवाज पुन्हा धीर देतो.

​आता आठ आकृतीचा मध्यभाग येतो. हा भाग नेहमीच थोडा कठीण वाटतो; पण आज जणू सगळं काही तिच्या बाजूने आहे. हात स्थिर आहेत, नजर पुढे आहे आणि मन शांत होत चाललं आहे. एकेक वळण सहज पार होतं. क्षणाक्षणाला आत्मविश्वास वाढत जातो.

​आणि मग... शेवटचं वळण. स्कूटर सरळ पुढे जाते. ती इंग्रजी '८' ची पूर्ण आकृती पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करते.

​क्षणभर विश्वासच बसत नाही. “झालं का खरंच?” मनात प्रश्न येतो. स्कूटर थांबवते आणि अधिकाऱ्याकडे पाहते. ते हलकंसं स्मित करून हाताने अंगठा दाखवून म्हणतात, “ओके.”

​त्या एका शब्दाने जणू सगळं काही बदलून जातं. आतापर्यंतचा ताण, भीती, धडधड... सगळं एका क्षणात नाहीसं होतं. मनात एक वेगळीच आनंदाची लहर पसरते. “मला जमलं... मी केलं!” हे शब्द तिच्या मनात घुमत राहतात.

​लायसन्स मिळाल्याची खात्री होताच चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटतं. इतक्या दिवसांची मेहनत, सराव, पडणं-उठणं, सगळं काही डोळ्यासमोर येतं. पहिल्यांदा स्कूटर शिकताना जी भीती वाटली होती, ती आठवते आणि आज त्याच भीतीवर मात करून मी इथे उभी आहे, याची जाणीव होते.

​बाहेर पडताना आकाशाकडे नजर जाते. आजचं आकाशही काहीसं खास वाटतं. जणू तेही तिच्या आनंदात सामील झालं आहे. रस्त्यावर पुन्हा स्कूटर सुरू करते, पण यावेळी हातात वेगळाच आत्मविश्वास आहे. प्रत्येक वळण आता अधिक सहज वाटतं.

​हा फक्त लायसन्स मिळवण्याचा अनुभव नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवण्याचा धडा आहे. भीती असते, ताण असतो, पण त्यावर मात केल्यावर मिळणारा आनंद अनमोल असतो.

​आज तिने फक्त एक परवाना मिळवलेला नाही, तर एक नवीन आत्मविश्वासही मिळवलेला आहे. पुढचा प्रवास अजून मोठा आहे, पण आजचा हा पहिला टप्पा तिच्यासाठी खूप खास आहे.

​स्कूटर चालवत घरी परतताना मनात एकच विचार येतो,

‘पहिलं पाऊल टाकलं की, रस्ता आपोआप सापडतो.’


- मंजिरी वाटवे