इराणकडून ‘होर्मुझ’ सर्वांसाठी खुली

४८ दिवसांनंतर सागरी मार्ग खुला : ट्रम्प यांनी मानले आभार


5 hours ago
इराणकडून ‘होर्मुझ’ सर्वांसाठी खुली

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
तेहरान/वाशिंग्टन : पश्चिम आशियातील वाढता तणाव संपवत इराणने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करण्यात आली आहे. लेबनॉनमध्ये लागू झालेल्या युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत करून इराणचे आभार मानले आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. लेबनॉनमधील युद्धबंदीच्या करारानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक विनाअडथळा सुरू राहील. हा निर्णय युद्धबंदीचा कालावधी असेपर्यंत लागू असेल. गेल्या दीड महिन्यांपासून या मार्गावर असलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठ आणि शिपिंग उद्योगावर मोठे संकट ओढवले होते. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारपेठेत स्थिरता येण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या घोषणेचे स्वागत केले. या निर्णयाकडे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
ट्रम्प यांना अमेरिकन प्रतिनिधीगृहाचा पाठिंबा
अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही इराणच्या मुद्द्यावरून खलबते सुरू आहेत. इराणविरुद्धच्या युद्धात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणारा ठराव अमेरिकन प्रतिनिधीगृहात मंजूर झाला आहे. इराणविरोधी लष्करी कारवाई रोखण्यासाठी विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने मांडलेला प्रस्ताव अवघ्या एका मताने फेटाळला गेला. या प्रस्तावाच्या विरोधात २१४, तर समर्थनार्थ २१३ मते पडली. यामुळे प्रशासनाला इराणबाबत कठोर पावले उचलण्याचे स्वातंत्र्य कायम राहिले आहे.