इतक्यात तिला तिची शाळा आठवली. शाळेत मधल्या सुट्टीत रोज तो यायचा. काही श्रीमंत मुले रोज आईस्क्रीम घ्यायची. चुकून कधीतरी मामा आला आणि पैसे दिले तर ती घ्यायची, किंवा कधीतरी तिला मैत्रीण द्यायची.

तुरी दुपारच्या वेळी ओट्यावर बसली होती, इतक्यात 'पी ssss पी ssss' असा आवाज कानात पडला. "कादर आला का आईसफ्रूट घेऊन?" अशी मनात उत्सुकता वाढली व ती धावत पैसे आणायला घरात गेली. "मी आज तिन्ही आईस्क्रीम घेणार बरं का! बर्फाचे, दह्याचे आणि मॅंगो सुद्धा; आणि तिन्ही आईसफ्रूट मीच खाणार," असे ती स्वतःशीच म्हणाली. कारण तिला तिन्ही आईसफ्रूट आवडत होती.
तो आवाज खूप लांबून तिच्या कानात पडला होता. आज तिला तिच्या वयाचे भानही उरले नव्हते; तेच बालपण, तोच बालिशपणा, तेच चेहऱ्यावरचे हसू, तीच पैशांसाठी धाव आणि मनात आठवणींचा काहूर...
आईस्क्रीमवाला आला की सगळी मुले धावून जायची. "ये माका बर्फाचा दी", "माका मॅंगो दी", "ये माका बेगीन बेगीन दह्याचा दी मरे, माका जावचा आसा," अशी त्याच्याभोवती गर्दी असे. बर्फाचे घेताना मग "मला लाल दे", "कोणी म्हणे मला हिरवे दे", "कोणी म्हणे मला ऑरेंज दे". गरिबांची भूक बर्फावर, मध्यमवर्गीयांची दह्यावर, तर श्रीमंतांची मॅंगोवर, अशी तिची समजूत होती. हे तिन्ही गट असले तरी, प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आईसफ्रूट घ्यायचा. पैसे असले तरी रोज ते मिळावे म्हणून मॅंगो किंवा दह्याचे आईसफ्रूट न घेता, बर्फाचेच घेणे काही मुलं पसंत करायची आणि झाडाखाली बसून पहिल्यांदा चोखून चोखून खायची आणि मग एकमेकांची जीभ पाहायची.
"अरे! पाच काजींचे (काजू) साधे, दहा काजींचे दह्याचे आणि पंधरा काजींचे मॅंगो मिळायचे." आज त्या काजींची पण आठवण झाली. तुरी त्या गावात भाड्याने राहायची. मग पाच काजू घेऊन गेल्यानंतर "तुझ्याकडे कुठचे काजू ग?" असे विचारल्यावर ती म्हणायची, "तूच पाहिले नाही का काल? ओवळीच्या झाडाखाली दोन काजी मेळलेले ते!" पक्षी बोंडू घेऊन दुसरीकडे जाऊन खायचे व आम्हा मुलांना काजू कोणत्याही झाडाखाली मिळायचे. असेच मिळालेले काजू ती जमवून ठेवायची आणि त्या बदल्यात आईसफ्रूट घ्यायची. काजूच्या झाडाखाली गेल्यावर मिळालेले काजू जमवणे आणि ते आईस्क्रीमसाठी वापरणे, हेही तिला आठवले.
आता मात्र आम्ही मुलांना सांगतो की, "कोणाच्या झाडाला हात लावू नको, कैऱ्या काढू नको, पेरू पाडू नको, हे करू नको, ते करू नको..." पण आता लोकही बदलले आहेत. जरा कुठे झाडाला हात लागला किंवा झाडाकडे नजर टाकली, तरी लोक घरी भांडायला येतात आणि चोरीचा आळ घालतात; म्हणून मुलांना असे सांगावे लागते. मात्र त्यावेळी आम्ही चोरून कैऱ्या पाडायचो, पेरू पाडायचो आणि एकत्र मीठ-मसाला घालून खायचो, हे तिला आठवले. हे आठवून तुरी आता पटकन हसली.
कादर दुपारच्या वेळी आईस्क्रीम घेऊन यायचा. एकदा काय झालं, तिच्या छोट्या भावाला कादरने पाणी आणायला सांगितले. तो धावत गेला आणि घरातून पाणी घेऊन आला. त्याने पाणी पिल्यानंतर तांब्या परत देताना तुटलेली चार-पाच आईसफ्रूट त्याच्या तांब्यात टाकली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला! तो घरी आला आणि सर्वांना देऊन त्यांनी ती खाल्ली. त्या दिवसापासून कादर आला की तो रोज त्याच्यासाठी तांब्याभर पाणी घेऊन धावत जायचा आणि कादरही त्याला आईसफ्रूट द्यायचा. कादरलाही ते बालमन उमजले होते.
इतक्यात तिला तिची शाळा आठवली. शाळेत मधल्या सुट्टीत रोज तो यायचा. काही श्रीमंत मुले रोज आईस्क्रीम घ्यायची. चुकून कधीतरी मामा आला आणि पैसे दिले तर ती घ्यायची, किंवा कधीतरी तिला मैत्रीण द्यायची. तिचा भाऊही त्याच शाळेत होता. त्याच्याकडे पैसे असले तर तो आईस्क्रीम घ्यायचा किंवा त्याचे मित्र त्याला द्यायचे. पण तो खाता खाता चोखून चोखून त्याचा बर्फ करायचा आणि त्याला आपल्या बहिणीची आठवण यायची. तो धावत बहिणीकडे यायचा व तिला ते थोडे द्यायचा. तीही ते आवडीने खायची. हे भावंडांचे प्रेम आठवून तिचे मन भरून आले.
एवढ्यात एकदम पुढ्यातच 'पी पी' करून आवाज झाला. ती भानावर आली आणि पाहते तर काय... कादरचा मुलगा! आज तो आपल्या वडिलांचा व्यवसाय करत होता. तो आईस्क्रीम घेऊन आला होता. तिने टोप (पात्र) घेऊन धावत जाऊन पहिल्यांदा कादरची चौकशी केली, मग सर्वांसाठी व स्वतःसाठी तीन आईस्क्रीम घेतली व फ्रिजमध्ये ठेवली. दिवसभरात एक-एक करून ती खाल्ली. तेव्हा ते मोजकेच मिळायचे. आज मनभर आठवणी काढून तिने आईसफ्रूट खाल्ली आणि खाताना त्या आठवणी मुलांना सांगितल्या. मुलांनीही त्या कुतूहलाने ऐकल्या. अशी ही तुरी आणि तिच्या आईसफ्रूटची कथा!

- संतोषी महाले