मे महिन्यातील वळीव पाऊस, शेतातली लगबग आणि छत्री घरी विसरल्यावर चांदीवड्याच्या पानाचा आसरा घेणाऱ्या जोडप्याची निसर्गाशी नातं सांगणारी, जुन्या आठवणींना उजाळा देणारी सौ. मंजिरी वाटवे यांची सुबक कथा.

मे महिन्याचा शेवट आला की गावाकडे प्रत्येक घरी एकच धांदल सुरू व्हायची. सुकवणं-वाळवणं सांभाळून ठेवायची, गाई-गुरांसाठी आणलेल्या गवताची गंजी करायची अशा एक ना अनेक कामांची धांदल. आकाशात काळेभोर ढग जमायला लागले की सगळ्यांची नजर आभाळाकडे लागून राहायची. “यंदा वळीव कधी येतोय?” याची उत्सुकता प्रत्येकाला असायची. कारण वळीवाचा पाऊस म्हणजे फक्त थंडावा नव्हता, तर शेतकऱ्याच्या नव्या हंगामाची पहिली चाहूल असायची.
सुनील आणि मीरा त्या दिवसांत शेताच्या कामात अगदी गढून गेलेले असायचे. पहाटेपासून बैलांना जुंपणं, बांध दुरुस्त करणं, भाताच्या रोपांसाठी जागा तयार करणं अशी कितीतरी कामं सुरू असायची. गावातल्या लोकांकडे आजच्यासारखे महागडे रेनकोट नव्हते, प्रत्येकाकडे छत्रीही नसायची. काही जण इरलं वापरायचे, काही घोंगडी डोक्यावर घ्यायचे. पण अनेक वेळा कामाच्या गडबडीत तेही जवळ नसायचं.
त्या दिवशीही असंच झालं होतं.
दुपारची वेळ होती. उन्हाने अंग भाजून निघालं होतं. सुनील आणि मीरा दोघंही शेतात बांध दुरुस्त करत होते. आकाश मात्र सकाळपासूनच काहीसं बदललेलं दिसत होतं. दूर डोंगराकडून काळे ढग हळूहळू सरकत येत होते. वाराही अचानक जोरात वाहू लागला. झाडांची पानं सळसळू लागली.
“मीरा, वाटतं आज वळीव धडकणार,” सुनीलने वर पाहत म्हटलं.
मीरा हसली. “धडकू दे. पावसाशिवाय शेतीला जीव कुठून येणार?”
इतक्यात आकाशात मोठा गडगडाट झाला. क्षणभरात सगळं वातावरण बदललं. आकाश काळवंडून गेलं. गरम मातीवर पहिल्या सरी पडल्या आणि सगळीकडे एक वेड लावणारा सुगंध दरवळला. कोरड्या जमिनीने जणू पावसाचं स्वागत केलं होतं.
पण काही क्षणांतच सरींचं रूप मुसळधार पावसात बदललं.
दोघंही इकडे-तिकडे नजर फिरवू लागले. ना जवळ झोपडी, ना झाडाखाली पुरेसा आसरा. छत्री तर घरातच राहिली होती. इरलं आणि घोंगडी आणायचंही लक्षात राहिलं नव्हतं.
“आता?” मीराने हसतच विचारलं. तिच्या कपाळावरून पाण्याचे थेंब वाहत होते.
सुनीलने आजूबाजूला पाहिलं आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर चमक आली.
“थांब... उपाय आहे!”
शेताच्या कडेला मोठं चांदीवड्याचं झाड होतं. त्या झाडाची पानं इतकी मोठी आणि जाड असायची की लहान मुलाचं अर्ध अंग सहज झाकलं जाईल. सुनील पटकन तिकडे धावला. दोन-तीन मोठी पानं तोडून आणली. तसंही चांदीवड्याची पानं शेतावर न्याहारी खाण्यासाठी घेत असत. संध्याकाळी घरी परतताना टोपलीत रात्री भाजी-भाकरी खाता येईल असं म्हणून चांदीवड्याची पानं असायचीच.
उन्हाळ्यात बागायतीसाठी मिळणारं पाणी कमी असायचं. त्यामुळे केळीच्या पानांनी हिरवीगार दिसणारी बागायती एप्रिल-मे महिन्यात करडी, सुकलेली दिसायची. त्यात दमून-भागून घरी आल्यावर भांडी घासायला कमी कशी होतील याचा विचार करून बायका घरी येताना चांदीवड्याच्या झाडाकडे थांबायच्या व आठ-दहा पानं टोपलीत घेऊन निघायच्या.
“हे बघ,” तो म्हणाला.
त्याने एक पान स्वतःच्या डोक्यावर धरलं आणि दुसरं मीराच्या हातात दिलं. त्या मोठ्या हिरव्यागार पानाखाली पावसाचे थेंब थोपवले गेले. जणू निसर्गानेच त्यांच्यासाठी छत्री तयार केली होती.
मीरा खळखळून हसू लागली.
“अगदी राजांसारखी छत्री झाली की!”
दोघंही त्या पानांच्या आडून बांधाकडे चालत राहिले. पावसाच्या धारांचा आवाज, मातीचा सुगंध, वाऱ्याने हलणारी पिकं आणि हातात चांदीवड्याचं पान... तो क्षण किती साधा होता, पण तेवढाच सुंदरही.
पाऊस वाढतच होता. कधी एखादा थेंब पानाच्या कडेनं आत शिरून गालावर पडायचा आणि मीरा खुदकन हसायची. सुनील मुद्दाम पान हलवून तिच्यावर पाणी उडवायचा. त्या मुसळधार पावसातही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
आजच्या काळात कदाचित हे सगळं ऐकताना साधं वाटेल. पण त्या काळी निसर्गाशी माणसाचं नातं किती घट्ट होतं! जे उपलब्ध आहे त्यातून मार्ग काढण्याची कला गावाकडच्या माणसांना अवगत होती. चांदीवड्याचं पान हे फक्त पान नव्हतं; ती त्या काळच्या जगण्याची हुशारी होती.
पाऊस थोडा ओसरल्यानंतर दोघं घरी परतले. अंगावर फारसं पाणीही नव्हतं. दारात उभ्या असलेल्या आईने (सुनीलची आई) आश्चर्याने विचारलं,
“अरे, इतक्या पावसात भिजलात नाही कसे?”
मीरा हसत म्हणाली, “आमच्याकडे चांदीवड्याची छत्री होती ना!”
घरभर हशा पिकला.
आज अनेक वर्षांनीही जेव्हा पहिला वळीव पडतो, तेव्हा मीराला तो दिवस आठवतो. बाजारात कितीही सुंदर छत्र्या दिसल्या तरी त्या चांदीवड्याच्या पानासारखी आपुलकी त्यात कधी वाटत नाही. कारण त्या पानात फक्त पावसापासून बचाव नव्हता, तर तरुणपणाचा निरागस आनंद, श्रमाचं समाधान आणि निसर्गाशी असलेलं एकरूप नातं दडलं होतं.
पहिल्या वळीवाच्या पावसासोबत मनात दरवर्षी तीच आठवण पुन्हा येते... शेतातली धावपळ, अचानक कोसळलेला पाऊस आणि चांदीवड्याच्या मोठ्या पानाची बनवलेली ती पहिलीवहिली छत्री!

- मंजिरी वाटवे