संसाराची तारेवरची कसरत करताना महिलांमध्ये वाढणारा विसराळूपणा, एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक थकवा यामागचे मुख्य कारण असणाऱ्या 'ब्रेन फॉग'ची लक्षणे, कारणे आणि उपाय सोप्या भाषेत मांडणारा अभ्यासपूर्ण लेख.

सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरात श्रीजा घाईघाईने डबा भरत होती. एका बाजूला मुलाच्या ऑनलाइन क्लासची तयारी, दुसऱ्या बाजूला ऑफिसची मीटिंग आणि मध्येच वॉशिंग मशीनचा आवाज. एवढ्यात ती अचानक थांबली.
“अरे... मी गॅस बंद केला का?”
ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. गॅस बंदच होता. दोन मिनिटांनी पुन्हा तिला आठवलं “मी मुलाची वही कुठे ठेवली?” शोधाशोध सुरू झाली. नंतर ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना तिला अचानक साधे शब्द आठवेना. संध्याकाळी ती शांतपणे म्हणाली, “हल्ली मला काहीच लक्षात राहत नाही... डोकं सतत धूसर वाटतं.”
तुम्हालाही असाच सतत विसराळूपणा जाणवतो का? संसाराची तारेवरची कसरत करताना श्रीजा सारख्या अनेक महिलांना अगदी ऐन चाळीशीत सुद्धा अनेकदा असाच अनुभव येऊ शकतो. सतत विसरणे, लक्ष केंद्रित न होणे, विचार स्पष्ट न वाटणे, मेंदू थकल्यासारखा वाटणे या अवस्थेला आजकाल ‘ब्रेन फॉग’ असे म्हटले जाते.
ब्रेन फॉग हा स्वतःमध्ये एखादा आजार नाही, तर मेंदूची कार्यक्षमता काही काळासाठी मंदावल्यासारखी वाटण्याची अवस्था आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. बदलती जीवनशैली, सततचा मानसिक ताण, हार्मोन्समधील बदल आणि झोपेचा अभाव यामुळे हा प्रश्न वाढताना दिसतो आहे.
ब्रेन फॉगमध्ये व्यक्तीला:
अशा समस्या दिसू शकतात.
अनेक महिला सांगतात की, “पूर्वीसारखं लक्ष लागत नाही”, “डोकं सतत भरल्यासारखं वाटतं”, “काम करताना मध्येच काय करत होते ते विसरते.”
महिलांमध्ये हा त्रास जास्त का दिसतो?
१. सततचा मानसिक ताण
महिला अनेक भूमिका एकाच वेळी सांभाळतात घर, नोकरी, मुलं, वृद्धांची काळजी, सामाजिक जबाबदाऱ्या. मेंदू सतत “ऑन मोड”मध्ये असल्याने मानसिक थकवा वाढतो.
ताण वाढला की शरीरात कॉर्टिसोल हे हार्मोन वाढते. दीर्घकाळ जास्त कॉर्टिसोल राहिल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
२. झोपेचा अभाव
अनेक महिलांची झोप पूर्ण होत नाही. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, मध्येच जाग येणे, लवकर उठणे यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. झोप ही मेंदूसाठी “रीसेट बटण” सारखी असते. झोप अपुरी राहिल्यास विचारांची स्पष्टता कमी होते.
३. हार्मोन्समधील बदल
महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ आणि पेरिमेनोपॉज या काळात हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. विशेष करून इस्ट्रोजेन कमी होणे, थायरॉईड समस्या, पीसीओएस या स्थितीमधे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
४. सततचा स्क्रीन टाइम
मोबाईल, सोशल मीडिया, सतत येणाऱ्या नोटीफीकेशन आणि मल्टीटास्कींग यामुळे मेंदूवर अतिरिक्त ताण पडतो. एका संशोधनानुसार सततचे डिजिटल विचलन मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी करू शकते.
५. शरीरातील काही कमतरता
ब्रेन फॉगची काही शारीरिक कारणेही असू शकतात:
म्हणून सतत त्रास होत असल्यास तपासणी आवश्यक ठरते.
ब्रेन फॉग आणि मानसिक आरोग्य
काही वेळा ब्रेन फॉग हा अॅन्जायटी किंवा डीप्रेशन चा भाग असू शकतो. सतत चिंता, भावनिक ताण आणि मानसिक थकवा यामुळे मेंदू “ओव्हरलोड” होतो. अनेक महिला बाहेरून सर्व काही व्यवस्थित सांभाळताना दिसतात; पण आतून मात्र त्या पूर्णपणे थकलेल्या असू शकतात.
यावर उपाय काय?
१. झोपेला प्राधान्य द्या
दररोज किमान ७–८ तास झोप आवश्यक आहे.
२. स्क्रीन टाइम कमी करा
विशेषतः झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे टाळावे.
३. शरीराची तपासणी करा
वीटामीन बी12, वीटामीन डी, थायरॉईड आणि हिमोग्लोबिन तपासून घेणे उपयुक्त ठरते.
४. मल्टीटास्किंग कमी करा
एकावेळी एकच काम करण्याची सवय मेंदूवरील ताण कमी करते.
५. व्यायाम आणि चालणे
नियमित व्यायामामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा सुधारतो आणि मानसिक स्पष्टता वाढते.
६. स्वतःसाठी वेळ काढा
सतत इतरांची काळजी घेताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये.
शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रेन फॉग म्हणजे ‘कमजोर स्मरणशक्ती’ नव्हे आणि तो आळशीपणाही नाही. अनेकदा हा शरीर आणि मन दोन्ही थकले असल्याचा संकेत असतो. महिलांनी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. कारण निरोगी शरीराइतकाच निरोगी आणि शांत मेंदूही महत्त्वाचा असतो.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर