डाळ ही फक्त एक भाजी नसते; ती भारतीय घराघरांत शिजणारी माया असते, कष्टांची चव असते आणि माणसांना जोडणारा एक साधा पण अतूट धागा असतो.

मीशुद्ध शाकाहारी बनून वर्ष सरत आले होते. त्यामुळे आठवड्याच्या बऱ्याच दिवशी घरात डाळ बनत असे. एके दिवशी खूप भूक लागल्यामुळे मी गपागप जेवू लागले. ताटात गरम भातासोबत गरमागरम डाळ होती.
श्वेत कैलासावर सोनेरी तीर्थ ओतल्याप्रमाणे ते ताट आकर्षक दिसत होते. कोणास ठाऊक, त्या दिवशी पहिल्यांदाच डाळ-भात खाऊन मी मनापासून तृप्त झाले. आज आईंनी डाळ गडबडीत केली नाहीये, हे तिच्या रुचीतून मला जाणवले. स्वयंपाकघरात रोज बनणारी साधी डाळ एवढी स्वादिष्ट लागू शकते, याचा अनुभव मला याआधी कधीच आला नव्हता.
कधी कधी डाळ रोजची वाटते, कधी एकदम रुचकर. कधी तिला फोडणीची साथ नसते, तरी ती पौष्टिक असते. पण हीच साधी डाळ प्रत्येक बाईच्या हातून आगळ्यावेगळ्या तऱ्हेने रुचकर बनते.
मला अजूनही माझ्या एका शेजारीणीच्या हातची डाळ आठवते. ती चव, तो सुगंध मला पुन्हा कधीच अनुभवायला मिळाला नाही. गोवा सोडून त्या उत्तर प्रदेशात कायमच्या राहायला गेल्या, जवळजवळ पाच-सहा वर्षे झाली; पण त्यांनी बनवलेल्या डाळीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते.
प्रत्येक बाईच्या हातची डाळ तिच्या स्वयंपाकघराची आणि तिच्या पाककलेची कहाणी सांगते. बाहेरचं बरबटलेलं जग पदरात कवेत घेऊन जेव्हा ती घरी परतते, तेव्हा तिचे दमलेले हात बहुधा डाळच वेचायला पुढाकार घेतात. गडबडीत कुकरात शिजलेली डाळ आणि चुलीवर फुंकर मारत सावकाश शिजवलेली डाळ दोघींची चव वेगळी असते.
ती डाळ त्या बाईने गडबडीत केलेली असो किंवा खास सवड काढून; ती अन्नपूर्णा घरातील सदस्यांना आवर्जून विचारतेच “डाळ बरी झाली आहे ना?”
अशा प्रकारे ही साधी डाळ प्रत्येक बाईच्या स्वयंपाकघरातील तडजोडीची, प्रेमाची आणि पाककलेची कहाणी सांगत राहते.
म्हणूनच आमच्या भारतात पावलोपावली डाळीची चव बदलते. ही साधीशी वाटणारी, प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरात शिजणारी डाळ प्रत्येकाला आपल्या चवीने जोडते. तिचे पार्वतीमातेप्रमाणे तूरडाळ, मूगडाळ असे अनेक अवतार असोत; श्रीमंतातला श्रीमंत असो, गरीब असो किंवा मध्यमवर्गीय भारतीय प्रत्येक जण डाळ-भात अगदी प्रसन्नतेने जेवतो.
उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत मजूरसुद्धा आपल्या अपत्यांना निदान दोन वेळेस डाळ-भात मिळावा म्हणून धडपडत असतो.
गोव्यात खोबरं टाकून बनवलेली डाळ, महाराष्ट्रातलं वरण, उत्तर भारतातलं दाल-चावल, दक्षिण भारतातलं सांबार, गुजरातमधली दाळ ढोकळी, राजस्थानचा दाल-बाटी-चूरमा भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात ही साधी डाळ अनेकांमध्ये एकतेची चव शिजवत राहते. म्हणूनच तिची चव प्रत्येक मानवी मनाला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक स्वयंपाकघराला जवळ आणते.
चतुर्थीला संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पंगतीत बसून जेवत असताना हीच साधी डाळ तीर्थस्वरूपी प्रसन्न आणि रुचकर लागते.
“घर की मुर्गी दाल बराबर!” असं जेव्हा मी ऐकते, तेव्हा मला वाटतं आमच्या भारत देशाला “सोनेरी चिडिया” समजून लुटणारे परदेशीसुद्धा आज शिस्तीने मांडी घालून, पाचही बोटांनी घास बनवत डाळ-भात जेवत असतील.
कारण शेवटी, डाळ ही फक्त एक भाजी नसते; ती भारतीय घराघरांत शिजणारी माया असते, कष्टांची चव असते आणि माणसांना जोडणारा एक साधा पण अतूट धागा असतो.

- रुबिना हसीना शेख