खाजगी वाहनांच्या गर्दीत हरवत चाललेला गोव्याचा पारंपारिक बस प्रवास, जुन्या खडखडत्या गाड्यांमधील आत्मीयता आणि आजचा हायटेक बदल, यावर टाकलेला एक हळवा, नॉस्टॅल्जिक दृष्टिक्षेप.

हल्ली गोव्यात पूर्वीसारखा सार्वजनिक बस प्रवास असा फार कमी झालाय. कदाचित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे अजूनही नीट न झालेले नियोजन हे त्यामागील कारण असेलही आणि त्यामुळे गरज म्हणून म्हणा, किंवा फॅशन, चढाओढ म्हणा प्रत्येकाच्या दारात झुलणाऱ्या मोटारी, स्कूटर्स ह्याही कारणीभूत आहेत. आता माझेच बघाल तर खरंच खूप दिवसांनी पणजीत अचानक काही काम निघाले, म्हणून मडगावहून बसने जावे लागले. काय झाले नेमके त्या दिवशी आमचे हे घरी नव्हते. आणि अस्मादिकांचा गाडीशी संबंध फक्त बसण्यापुरता आणि फिरण्यापुरता. स्वतः ड्रायव्हिंग करणे कोसो दूर राहिले. असो! शेवटी बसने जायचे ठरले. मडगावहून अगदी रांगेत उभे राहून तिकीट काढून अगदी गारेगार बसमधून अर्ध्या तासात पणजी गाठली. तेसुद्धा अगदी शांतपणे... आरडाओरडा नाही, चेंगराचेंगरी नाही अगदी शांतपणे.
एक जमाना होता. आमच्या गावातून पणजीला जायचे असेल तर आधी फोंडा मग दुसरी बस पकडून पणजी, म्हणजे साधारण दोन ते अडीच तासांचा घोळ असे. तोसुद्धा त्या खडखडत्या गाड्या, कंडक्टरची गडबड. अहो काम असायचे अर्ध्या तासाचे पण जाऊन येऊन चार तास जायचे. हे काही फार पूर्वीचे नाही, फार-फार तर पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट.
आमचे गाव तसे अगदी जंगलात म्हणा हवे तर. दोन ते तीन शहरे साधारण पंधरा किलोमीटर आसपास. खोटे वाटेल आज, पण त्याकाळी फक्त दोनच बसेस यायच्या गावात. एक सकाळी पणजी आणि दुसरी मडगाव. सकाळी निघाल्या की एकदम दुपारी एक वाजता उगवत. मग परत गेल्या की डायरेक्ट संध्याकाळी सात. बसमध्ये काही नाही. ह्या मधल्या काळात कुठे जायचे झाले तर एक तर सायकल किंवा वन टू, वन टू. दुसरा पर्याय नव्हता. नाही म्हणायला मायनिंगचे ट्रक असत, पण तेसुद्धा गावापासून दोन किलोमीटर चालत गेल्यावर मिळत. आणि त्या ट्रक मधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच असे. अर्थात तेसुद्धा आम्ही अनेकदा पार पाडले आहे. माझा भाऊ सुद्धा दहावीचे पेपर द्यायला बस नव्हती म्हणून अशा ट्रकने सावर्ड्याला गेलाय. खरंच आज समजणार नाही, पण स्वतंत्र गोव्यात अगदी हल्ली हल्लीपर्यंत अशी परिस्थिती होती खेड्यापाड्यात.
मी आयुष्यात पहिली रिक्षा बघितली ती मडगाव येथे. रिक्षाच काय पायलट मोटरसायकल सुद्धा नव्हती आमच्या गावात. त्यात गाडी म्हणजे चारचाकी हे समीकरण डोक्यात फिट्ट बसलेले. त्यामुळे त्या रिक्षा नामक तीनचाकी वाहनात बसायला खूप भीती वाटे लहानपणी. उगाच कुठे पडली बिडली तर?
गावात बसेस कमी, त्यामुळे आहे त्याच्यात प्रवास करणे क्रमप्राप्त असे. बसमध्ये बरेचसे लोक ओळखीचेच असत. बऱ्याचदा त्यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या असत अगदी. सगळे एकाच गावातील, समदुःखी. त्यामुळे प्रवासात गप्पा चालत भरपूर. पाऊस-पाण्याच्या, कुळागरांच्या आणि मुख्यतः बसमध्ये जो कोणी हजर नाही त्याच्या नावाच्या. ऐकायला मजा येई, वेळही चांगला जात असे. मुळात गावाविषयीच्या ज्ञानातही भर पडत असे. असो!
रोजच्या प्रवासामुळे ड्रायव्हर, कंडक्टरही ओळखीचे होत. थोडे विषयांतर करते, मुंबईतील बस वाहतूक शिस्तबद्ध अगदी. एकाच रंगाच्या, नंबरने चालणाऱ्या बसेस. प्रवासही सुखाचा. पण सगळे कसे रुक्ष अगदी. एरवी त्या कंडक्टरच्या तोंडावरची माशीसुद्धा उडणार नाही, तो बस स्टॉपवर चढणाऱ्या प्रवाशांवर असा खेकसायचा की घाबरूनच अनेक जण बसमध्ये चढत नसत. आमच्याकडे अगदी विरुद्ध प्रकार. रोज एका ठराविक जागी बस पकडणारा जर वेळेत आला नाही, तर ड्रायव्हर एखाद मिनिट बस नक्की थांबवणार. उतरणाऱ्या प्रवाशाचे सामान न सांगता स्वतः उतरून देणारे कंडक्टर मी फक्त गोव्यातच बघितलेत. एखादे दिवशी पैसे विसरले तर "असू गो बाय, फाल्या दी" (असू दे बाई, उद्या दे), हे ठरलेले.
अर्थात आता जरा फरक पडलाय म्हणा. बरेचसे परप्रांतीयसुद्धा ह्या धंद्यात घुसलेत. पूर्वीची आत्मीयता कमी झाली आता. पण अजूनही प्रवाशांना आपले फॅमिली मेंबर मानून त्यांची काळजी घेत योग्य ठिकाणी व्यवस्थित पोहोचविण्यात गोव्याच्या त्या रांगड्या पण प्रेमळ बसवाल्यांना तोड नाही हे नक्की...

- रेशम जयंत झारापकर
मडगाव,गोवा