‘गुड’ आणि ‘बॅड’ कोलेस्टेरॉल

फक्त कोलेस्टेरॉल असलेल्या पदार्थांना घाबरण्याऐवजी, शरिरात कोलेस्टेरॉल कोणत्या मेटाबॉलिक वातावरणात कार्य करत आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

Story: आहार |
29th May, 09:40 pm
‘गुड’ आणि ‘बॅड’ कोलेस्टेरॉल

लिपिड्स म्हणजे शरीरातील फॅटसारख्या घटकांचा एक मोठा गट असून त्यामध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि त्यांना रक्तामधून वाहून नेणारे कण म्हणजेच लिपोप्रोटीन्स यांचा समावेश होतो.

गेली अनेक वर्षे हृदयविकारांसाठी कोलेस्टेरॉलला मुख्य कारण मानले गेले आहे. त्यामुळे अंडी, मांसाहार, दूध व दुग्धजन्य पदार्थ, तूप, लोणी आणि नैसर्गिक फॅट्स व कोलेस्टेरॉल असलेले पारंपरिक पदार्थ यांची भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली. दुसरीकडे, 'लो-फॅट' पदार्थ अधिक लोकप्रिय होत गेले.

कोलेस्टेरॉल स्वतः 'वाईट' नसते. उलट, ते शरीरासाठी अत्यावश्यक आहे. शरीर कोलेस्टेरॉलचा उपयोग पेशींच्या भित्ती तयार करण्यासाठी, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन आणि कॉर्टिसोलसारखे हार्मोन्स तयार करण्यासाठी, व्हिटॅमिन D तयार करण्यासाठी तसेच फॅट्स आणि चरबीत विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांच्या पचन व शोषणासाठी आवश्यक पित्त आम्ले तयार करण्यासाठी करते.

शरीरातील बहुतांश कोलेस्टेरॉल शरीर स्वतः, मुख्यतः यकृतामध्ये तयार करते, तर अन्नातून मिळणारे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे अन्नातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील कोलेस्टेरॉल यांचा थेट संबंध नेहमीच असतो असे नाही. शरीराला आपण कोणत्या प्रकारचे पोषण, आहार आणि जीवनशैली देतो यावर त्याचा अधिक परिणाम अवलंबून असतो. शरीर कोलेस्टेरॉलचे शोषण, निर्मिती आणि वापर यांचे नियंत्रण गुंतागुंतीच्या पद्धतीने करत असते.

सोप्या भाषेत सांगायचे तर, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे 'सामान' आहेत, तर लिपोप्रोटीन्स ही त्यांना रक्तामधून वाहून नेणारी 'वाहतूक वाहने' आहेत, कारण फॅट्स पाण्यावर आधारित रक्तात थेट विरघळू शकत नाहीत.

वेगवेगळ्या लिपोप्रोटीन्सची शरीरात वेगवेगळी कामे असतात. VLDL मुख्यतः यकृतात तयार होणारे ट्रायग्लिसराइड्स वाहून नेते, LDL कोलेस्टेरॉल शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवते, तर HDL अतिरिक्त कोलेस्टेरॉल पुन्हा यकृताकडे नेण्यास मदत करते. अनेकजण LDL ला 'वाईट कोलेस्टेरॉल' आणि HDL ला 'चांगले कोलेस्टेरॉल' म्हणतात, पण हे वर्गीकरण अतिशय सोपे करून सांगितलेले आहे. प्रत्यक्षात LDL, HDL आणि VLDL हे लिपोप्रोटीन्स म्हणजेच रक्तामधून फॅट्स वाहून नेणारे कण आहेत.

ट्रायग्लिसराइड्स हा या संपूर्ण प्रणालीतील आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. ती शरीरातील फॅट्स साठवण्याची मुख्य पद्धत आहे आणि ऊर्जा संतुलन व मेटाबॉलिझमशी जवळून संबंधित आहेत. अतिरिक्त कॅलरीज विशेषतः साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, मद्यपान, अतिखाणे आणि कमी शारीरिक हालचाल  यांमुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढू शकते.

हे ट्रायग्लिसराइड्स नंतर मुख्यतः VLDL सारख्या लिपोप्रोटीन्सद्वारे रक्तामधून वाहून नेले जातात. वाढलेले ट्रायग्लिसराइड्स इन्सुलिन रेझिस्टन्स, फॅटी लिव्हर, पोटाभोवती वाढलेली चरबी, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि वाढलेला हृदयविकाराचा धोका यांच्याशी संबंधित आढळतात.

रक्तातील लिपिड प्रोफाइल ही तपासणी टोटल कोलेस्टेरॉल, LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्स यांसारख्या घटकांचे मोजमाप करते. या सर्व मूल्यांमधून शरीर फॅट्स, ऊर्जा संतुलन आणि मेटाबॉलिझम कशा प्रकारे हाताळत आहे याचा अंदाज येतो म्हणजेच ही तपासणी केवळ हृदयाच्या आरोग्यापुरती मर्यादित नसते. अनेकदा केवळ एखादा आकडा न पाहता, या सर्व घटकांमधील प्रमाण आणि संतुलन समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

सामान्य समजुतीच्या विरुद्ध, बिघडलेले लिपिड प्रोफाइल केवळ आहारातील फॅट्समुळे होत नाही. अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, अपुरी झोप, ताणतणाव, धूम्रपान, दीर्घकाळ बसून राहणे आणि कमी शारीरिक हालचाल यांसारख्या आधुनिक जीवनशैलीच्या सवयी मेटाबॉलिक बिघाडामध्ये मोठी भूमिका बजावतात.

काही व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलचे आकडे 'नॉर्मल' असले तरी इन्सुलिन रेझिस्टन्स, फॅटी लिव्हर किंवा पोटाभोवती वाढलेली चरबी यांसारख्या समस्या असू शकतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलकडे केवळ एका आकड्याप्रमाणे न पाहता, तो शरीरातील मोठ्या मेटाबॉलिक प्रक्रियेचा भाग आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

काही व्यक्तींमध्ये, विशेषतः ज्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त आहे, त्यांच्यासाठी औषधे आवश्यक आणि उपयुक्त असू शकतात. पण फक्त औषधांवर अवलंबून राहून, त्याच वेळी चुकीची जीवनशैली कायम ठेवली तर दीर्घकालीन मेटाबॉलिक आरोग्य पूर्णपणे सुधारेलच असे नाही.

दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी चांगल्या दर्जाचा आहार, नियमित शारीरिक हालचाल, योग्य झोप, ताणतणाव नियंत्रण, संतुलित शरीररचना आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचे कमी सेवन या सवयी महत्त्वाच्या ठरतात.

फक्त 'आकडे कमी' करण्याऐवजी, त्या आकड्यांमागील मेटाबॉलिक परिस्थिती समजून घेणे आणि सुधारण्यावर भर देणे अधिक आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली फक्त लॅब रिपोर्ट बदलत नाही ती शरीरातील असंतुलन निर्माण करणाऱ्या मूळ प्रक्रियांवर परिणाम करते.

म्हणूनच, फक्त कोलेस्टेरॉल असलेल्या पदार्थांना घाबरण्याऐवजी, शरीरात कोलेस्टेरॉल कोणत्या मेटाबॉलिक वातावरणात कार्य करत आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

खरा प्रश्न कदाचित 'आपण किती कोलेस्टेरॉल किंवा फॅट्स खातो?' हा नसून 'आपण आपल्या जीवनशैलीतून शरीरासाठी कोणते मेटाबॉलिक वातावरण तयार करत आहोत?' हा असू शकतो.


- डॉ.  स्नेहल नाईक 

म्हार्दोळ