निरागसतेचा मखमली स्पर्श: संदीप

क्षणभराच्या भेटीतही मनावर कायमचा ठसा उमटवणाऱ्या एका निष्पाप बालकाची ही गोष्ट आहे. 'संदीप' नावाच्या निरागस जिवाने लेखिकेला दिलेली 'दीदी' ही हाक एका अनोख्या, मळकट पण तितक्याच निर्मळ नात्याची गुंफण करते.

Story: ललित |
22nd May, 09:52 pm
निरागसतेचा मखमली स्पर्श: संदीप

आयुष्याच्या प्रवासात अनेक व्यक्ती क्षणभरासाठी येतात आणि नकळत निघून जातात; पण त्यांची आठवण मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमचे घर करून राहते. काहींचे चेहरे विसरतात, तर काहींची नावे आठवत नाहीत; पण काही जीव आपल्या भावविश्वाचा असा भाग बनतात की काळ जसजसा पुढे सरकतो, तशा त्यांच्या आठवणी मनात अधिक खोलवर रुजतात. अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडली आणि 'संदीप' नावाचा एक निष्पाप जीव माझ्या मनात कायमचा कोरला गेला.

मी माझ्या आईला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात होते. क्लिनिक घरापासून बरंच दूर असल्याने ये-जा करण्यातच तीन-चार तास निघून जायचे. त्यात क्लिनिकमध्ये प्रचंड गर्दी आणि प्रवासाचा थकवा, यामुळे तो प्रवास कंटाळवाणा वाटायचा. पहिले तीन दिवस असेच गेले; पण चौथ्या दिवशी मात्र काहीतरी वेगळे घडले.

त्या दिवशी मी क्लिनिकबाहेर एका झाडाच्या खोडावर बसले होते. माझी मावस बहीणही सोबत होती आणि आई आत गेली होती. इतक्यात अचानक माझ्या अंगावर माडाच्या झावळ्याचा एक हीर येऊन पडला. मी पटकन मागे वळून पाहिले आणि क्षणभर दचकले. त्या झाडामागून एक छोटासा, काळाभोर, मळकट चेहऱ्याचा मुलगा डोकावत होता. त्याचे लुकलुकणारे डोळे आणि पांढरे शुभ्र दात स्पष्ट दिसत होते. तो मला पाहून निरागसपणे हसत होता. तो झाडामागून बाहेर आला आणि माझ्या जवळ येऊन तो हीर पुन्हा माझ्याकडे फेकू लागला.

नकळत आमच्यात एक खेळ सुरू झाला. तो मुलगा त्या खेळात इतका रमला की जणू जगाचे भानच हरपले होते. माझी ताई हे सुंदर दृश्य मोबाईलमध्ये टिपत होती. ना परिचय, ना भाषा; तरीही त्या काही क्षणांत एक अलौकिक नाते तयार होत होते.

इतक्यात आईचा नंबर लागला आणि मी आत गेले. तो मुलगाही माझ्या मागोमाग धावत आत आला. पण डॉक्टरांनी त्याला पाहताच नाराजीने बाहेर जाण्याचा इशारा केला. तो छोटासा जीव हिरमुसला, त्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि शांतपणे बाहेर निघून गेला. अर्ध्या तासाने आम्ही बाहेर आलो, तर तो क्लिनिकबाहेर जिन्याच्या पायरीवर बसला होता. त्याच्याजवळ माझ्या चपला होत्या. मी आत जाताना चपला काढलेल्या त्याने पाहिले होते आणि गर्दीतून त्या जपून काढून ठेवल्या होत्या. मला पाहताच तो धावत आला आणि पायाजवळ चपला ठेवू लागला.

त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी तुटले. खरं तर, आधी त्याचा मळकट अवतार, विस्कटलेले केस आणि फाटके कपडे पाहून मला थोडी किळस वाटली होती. पण त्याच्या या कृतीने माझी विचारसरणीच लहान ठरवली. माझे हात नकळत त्याच्या केसांवरून फिरले. मी त्याला नाव विचारले, तो म्हणाला, "संदीप." तीन-चार वर्षांचा तो कोवळा जीव! त्याला हिंदीत बोललेले थोडेफार समजत होते. पण भाषेपेक्षा त्याच्या डोळ्यांतला विश्वास खूप काही सांगत होता. त्याने माझा हात असा धरला, जणू आमची जन्माची ओळख होती.

मी त्याला चॉकलेट, सरबत आणि काही खाऊ घेऊन दिला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद शब्दातीत होता. आम्ही निघायची वेळ झाली तेव्हा संदीपने माझा हात घट्ट पकडला होता. शेवटी मनावर दगड ठेवून आम्हाला त्याचा निरोप घ्यावा लागला. त्या क्षणी त्याचा चेहरा ज्या प्रकारे उतरला, ते दृश्य आजही डोळ्यांसमोर उभे राहते. तो शून्यात नजर लावून फक्त माझ्याकडे हरवल्यासारखा पाहत होता.

दुसऱ्या दिवशी पुन्हा क्लिनिकमध्ये गेल्यावर माझी नजर त्यालाच शोधू लागली. तो दिसताच मी हाक मारली, "संदीप!" क्षणात तो धावत आला आणि मला बिलगला. मी खाली बसले तेव्हा त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून आपल्या मित्रांना ऐटीत सांगितले— "दीदी". संदीपने आमच्या नात्याला एक निरागस नाव दिले होते. काही नाती जन्माची नसतात, ती मनाची असतात, याची जाणीव मला झाली. पुढचे चार दिवस आम्ही रोज भेटलो. तो माझी मनापासून वाट पाहायचा.

आठ दिवसांनंतर आमचा दवाखान्याचा क्रम बदलला. दोन दिवसांनी मी पुन्हा गेले, तेव्हा संदीप कुठेच दिसला नाही. चौकशी केल्यावर कळले की तो सुट्टीसाठी आला होता आणि गावी निघून गेला होता. मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. मी निशब्द होऊन मोबाईलमधील त्याचा फोटो पाहिला. त्याचे ते मोठे डोळे आणि निर्मळ हास्य खूप काही सांगत होते.

आजही कधी कधी त्याचा तो मळलेला हात, चमकदार डोळे आणि विश्वासाने हात धरलेला संदीप डोळ्यांसमोर येतो आणि मन भरून येते. ज्या नात्याला पत्ता नव्हता, भाषा नव्हती, तिथे एका कोवळ्या जीवावर आपण 'दीदी' म्हणून कायमचे स्थान मिळवले, हेच मोठे समाधान. आज संदीप कुठे असेल? मला विसरला असेल का? कधी समोर आला तर ओळखेल का? सगळे प्रश्न अधांतरी...


- तेजल तुळशीदास नाईक

मांद्रे, गोवा