गोव्याच्या उन्हाळ्यातील कोकम : चव, आठवणी आणि परंपरा

आधुनिकतेत पारंपरिक गोष्टी कमी होत असल्या तरी कोकम आजही गोव्याच्या स्वयंपाकघरात आणि आठवणींत जिवंत आहे; मग ते सोलकढीतील थंडावा असो, मासे करीची चव असो की उन्हात वाळणाऱ्या कोकमाचा लाल रंग!

Story: दुर्बीण |
22nd May, 09:19 pm
गोव्याच्या उन्हाळ्यातील कोकम : चव, आठवणी आणि परंपरा

गोव्यात उन्हाळा सुरू झाला की बाजारात, घरांच्या अंगणात आणि गावातील रस्त्यांवर कोकमाचे दिवस सुरू झाल्याचे जाणवते. लालभडक कोकमाच्या साली उन्हात वाळत घातलेल्या दिसतात. घरभर एक वेगळाच आंबट-गोड सुगंध पसरलेला असतो. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात कोकमाची कामे चालायची. त्यामुळे कोकम हे फक्त फळ नसून गोव्याच्या जीवनशैलीचा एक भाग बनले आहे.

कोकमाचे शास्त्रीय नाव 'Garcinia indica' असे आहे. हे झाड पश्चिम घाट परिसरात मोठ्या प्रमाणात आढळते. गोवा, कोकण आणि कर्नाटकात कोकमाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. कोकमाचे झाड पावसाळ्यात हिरवेगार दिसते, तर उन्हाळ्यात त्याला गडद जांभळट रंगाची फळे येतात.

उन्हाळ्यात पिकलेली कोकम फळे गोळा करून त्यापासून 'आगळ' तयार केले जाते. ही प्रक्रिया अजूनही काही गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने केली जाते. प्रथम कोकम फळे धुवून कापली जातात. त्यातील बिया वेगळ्या केल्या जातात व नंतर सालींना मीठ लावून मोठ्या काचेच्या किंवा मातीच्या बरण्यांमध्ये भरून ठेवले जाते. काही दिवसांनी त्यातून गडद लाल रंगाचा रस बाहेर पडतो. त्यालाच 'आगळ' म्हणतात. हा आगळ पुढे सरबत, सोलकढी आणि इतर पदार्थांमध्ये वापरला जातो. उरलेल्या साली उन्हात वाळवून 'भिरणसूल' तयार केले जाते.

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलेही या कामात मदत करत. घराच्या अंगणात चटई टाकून कोकम वाळत घातले जात असे. अचानक पाऊस आला तर सगळ्यांची धावपळ उडायची. काही वेळा लहान मुले मीठ-तिखट लावलेले कोकम चोरून खात असत. आजही अनेकांना त्या चवीची आठवण आहे.

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत कोकमाला खूप महत्त्व आहे. सोलकढी हा गोव्याचा प्रसिद्ध पेयप्रकार कोकमाशिवाय पूर्णच होत नाही. नारळाचे दूध, कोकम आणि मसाले वापरून बनवलेली सोलकढी गरम हवामानात शरीराला थंडावा देते. अनेक घरांमध्ये जेवणानंतर सोलकढी पिण्याची पद्धत अजूनही आहे. कोकम सरबतही उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाते.

गोव्यातील मासे कढीमध्येही कोकमाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अनेक घरांमध्ये चिंचेऐवजी भिरणसूल वापरतात. बांगडा, तारली, सुरमई किंवा कोळंबीच्या कढीमध्ये कोकम घातल्यामुळे हलकी आंबट चव येते. नारळाच्या रस्स्यासोबत कोकमाची चव खूप छान लागते. त्यामुळे गोव्याच्या पारंपरिक मासे करीला एक वेशिष्ट्यपूर्ण ओळख मिळते.

बांगडा फ्राय करतानाही काही घरांमध्ये कोकम वापरतात. मसाल्यात थोडे कोकम पाणी किंवा आगळ घातले जाते. त्यामुळे माशांचा उग्र वास कमी होतो आणि चव अधिक छान लागते. गरम भात, मासे कढी, बांगडा फ्राय आणि सोबत सोलकढी; हे अनेक गोमंतकीयांच्या आवडीचे जेवण आहे.

कोकमापासून तयार होणारा आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे 'कोकम बटर.' कोकमाच्या बियांपासून हे बटर तयार केले जाते. पूर्वी गावांमध्ये बिया वाळवून त्यापासून घरगुती पद्धतीने कोकम बटर बनवले जात असे. हे बटर त्वचेसाठी चांगले मानले जाते. फुटलेले ओठ, कोरडी त्वचा किंवा टाचांवर ते लावले जात असे. आता अनेक साबण, क्रीम आणि लिप बाममध्येही कोकम बटरचा वापर केला जातो.

म्हापसा, पणजी आणि मडगाव बाजारात कोकमाचे विविध पदार्थ विक्रीसाठी दिसतात. आमसूल, आगळ, कोकम सरबत आणि कोकम बटर खरेदी करण्यासाठी स्थानिक लोकांसोबत पर्यटकही येतात. विशेषतः म्हापसा शुक्रवार बाजारात गावातून आलेल्या महिलांकडून घरगुती कोकम उत्पादने विकली जातात.

आज आधुनिक जीवनशैलीमुळे काही पारंपरिक गोष्टी कमी होत असल्या तरी कोकम अजूनही गोव्याच्या स्वयंपाकघरात आणि आठवणींमध्ये जिवंत आहे. एका ग्लासभर सोलकढीत, मासे करीच्या चवीत किंवा उन्हात वाळत घातलेल्या कोकमाच्या लाल रंगात गोव्याच्या उन्हाळ्याचे खरे सौंदर्य दडलेले आहे.



- डॉ. सुजाता दाबोळकर