मॅच्युरिटी म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं नाही. कधी कधी मॅच्युरिटी म्हणजे, “माझी शांतता तुझ्या ड्रामापेक्षा महत्त्वाची आहे,” हे ओळखणं.

ग्रेरॉक टेक्निकची शांत पण ताकदवान गोष्ट
“तू एवढी शांत का असतेस गं? काही बोल ना!”
समोरून प्रश्न आला आणि ती फक्त हसली. पूर्वी असं झालं असतं तर तिने अर्धा तास स्वतःचं स्पष्टीकरण दिलं असतं.
“मी अशी नाहीये... माझा अर्थ तसा नव्हता...” वगैरे वगैरे.
पण यावेळी ती शांत होती. थंड नव्हती... तुटलेली नव्हती... फक्त त्या गोंधळासाठी इमोशनली अनअव्हेलेबल झाली होती.
सायकोलॉजीमध्ये यालाच म्हणतात, ‘ग्रे रॉक टेक्निक’.
ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा हे नाव ऐकलं तेव्हा मला वाटलं, हा काहीतरी जिऑलॉजीचा चॅप्टर असावा! पण नाही. हा खरंतर आपलं मानसिक आरोग्य जपण्याचा एक फार प्रॅक्टिकल मार्ग आहे. विशेषतः अशा लोकांसाठी, ज्यांच्या आयुष्यात कुणीतरी सतत प्रोव्होक करत असतं, गिल्ट देत असतं, मॅनिप्युलेट करत असतं.
ग्रे रॉक टेक्निक म्हणजे काय?
तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या इमोशन्सचं “फ्युएल” न देणं. काही लोकांना भांडण नको असतं, त्यांना तुमची रिऍक्शन हवी असते. तुमचा राग, तुमचे अश्रू, तुमची धडपड. कारण त्यातून त्यांना कंट्रोल मिळतो.
थोडक्यात काय तर तुमच्या इमोशन्सवरच त्यांची गाडी चालत असते! जसं ‘धुरंधर’ चित्रपटातील “सब्र... इंधन... हौसला...” ऐकल्यावर जसं वाटतं ना, तसंच काहीसं.
फरक एवढाच की इथे तुमचं ‘इंधन’ म्हणजे तुमची इमोशनल एनर्जी होय.
तुम्ही जितकं एक्सप्लेन कराल, रडाल, रिऍक्ट कराल तितकी समोरच्यांची ‘इंजिन कॅपॅसिटी’ वाढत जाते आणि मग त्यांना तुमच्या शांततेपेक्षा तुमची रिअॅक्शन्स जास्त प्रिय वाटू लागते. म्हणूनच ग्रे रॉक टेक्निक म्हणजे समोरच्याची गाडी बंद पाडणं नव्हे. फक्त तुमचं इमोशनल पेट्रोल उगाच वाया जाऊ न देणं.
मग तुम्ही काय करता?
तुम्ही “ग्रे रॉक” बनता. साधा. शांत. प्रतिक्रिया न देणारा. उदाहरणार्थ, “तुला काही कळतंच नाही!”
पूर्वीचं उत्तर : “कसं नाही कळत? मीच तर सगळं करते!”
ग्रे रॉक उत्तर : “हं... ओके.”
बस्स!!!
आता काही लोकांना हे ऐकून वाटेल, “म्हणजे आपण गप्प बसायचं? अन्याय सहन करायचा?”
अजिबात नाही! ही टेक्निक तुम्हाला टॉक्सिक लोक टॉलररेट करायला शिकवत नाही तर ती तुम्हाला कंपोज, शांत, संयमित राहणं शिकवते. रिअॅक्शन्स आणि रिस्पॉन्स मधला फरक शिकवते.
एका कॉर्पोरेट क्लायंटने मला सांगितलं होतं, “मॅडम, माझा बॉस रोज मीटिंगमध्ये मुद्दाम टोमणे मारतो.” मी विचारलं, “मग तुम्ही काय करता?” तो म्हणाला, “मी प्रूव्ह करायला लागतो की मी कॅपेबल आहे.”
मी त्याला सांगितलं, “तुम्ही स्वतःला डिफेन्ड करता, म्हणून त्याला पॉवर मिळते.” दोन आठवड्यांनी तो म्हणाला,
“आता मी फक्त मुद्द्याचं उत्तर देतो. पर्सनल कमेंट इग्नोर करतो.”
आणि गंमत म्हणजे, बॉसचा इंटरेस्टच कमी झाला! घरातही हे तितकंच लागू होतं.
एक सासू-सुनेचं उदाहरण घ्या,
“आमच्या वेळेला आम्ही इतक्या आरामात बसत नव्हतो.”
पूर्वीची सून : “म्हणजे मी काहीच करत नाही असंच ना?”
आणि मग तीन दिवस अबोला.
ग्रे रॉक व्हर्जन?
“हं... काळ बदललाय.”
नो फाइट. नो फ्युएल.
टीनएजर्समध्येही हे तितकंच उपयोगी आहे. एका मुलीने सांगितलं, तिच्या मित्रमैत्रिणी मुद्दाम ग्रुपमध्ये तिला इग्नोर करायचे. ती रडायची, एक्सप्लेन करायची, पुन्हा मेसेज करायची. नंतर तिने शांतपणे डिस्टन्स ठेवायला सुरुवात केली.
रिझल्ट?
तिचा सेल्फ-रिस्पेक्ट परत आला.
पण एक गोष्ट मात्र महत्त्वाची, ग्रे रॉक म्हणजे पर्सनॅलिटी बदलणं नाही किंवा तुम्ही कायम थंड, इमोशनलेस होणं असं ही नाही. इथे तुम्ही तुमची एनर्जी फक्त कुठे आणि नेमकी किती खर्च करायची, हे ठरवता.
अहो, श्रीमदभगवद्गीतेत ही श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध टाळायला नाही सांगितलं... पण भावनांच्या भरात निर्णय घेऊ नकोस, हे नक्कीच सांगितलं होतं.
ग्रे रॉक टेक्निक थोडी तशीच वाटते मला.
कारण मॅच्युरिटी म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं नाही.
कधी कधी मॅच्युरिटी म्हणजे, “माझी शांतता तुझ्या ड्रामापेक्षा महत्त्वाची आहे,” हे ओळखणं.
आणि खरं सांगू?
काही लोकांना तुमचा आवाज नाही, तुमची रिऍक्शन अॅडिक्ट असते. तीच बंद झाली, की अर्धं युद्ध तिथेच संपतं.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४