सोनेरी झुमका

आईने प्रेमाने ते झुमके सीमाच्या कानात घातले. आरशात स्वतःकडे पाहताना सीमाला वाटलं, या कानातल्यांत फक्त सोनं नाही, तर उन्हात घालवलेले दिवस, झाडाची राखण, आई-वडिलांचे कष्ट आणि माझं छोटंसं स्वप्न सगळं सामावलेलं आहे.

Story: पहिलंवहिलं |
22nd May, 09:21 pm
सोनेरी झुमका

​उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की गावाकडच्या मळ्यांना एक वेगळंच रूप यायचं. आंबा, फणस, करवंद, काजू यांच्या सुगंधाने सगळा परिसर भरून जायचा. आमच्या बागेच्या टोकाला एक छोटासा मळा होता. त्या मध्यातून रानात जाण्यासाठी एक पायवाट होती. तसं पाहता मळ्यावर फारशी उपयोगी अशी झाडं नव्हती, होती ती रानझाडं. त्याला कारणही तसंच. मळ्यातली जमीन कातळ अशी आणि पाणी न टिकणारी. पण असं असलं तरी मधोमध उभं असलेलं एक मोठं काजूचं झाड मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं. झाड इतकं मोठं पसरलेलं व उंचीला बुटकं होतं की त्याच्या फांद्या जमिनीला टेकाव्यात इतक्या खाली वाकलेल्या असायच्या. त्या झाडापर्यंत जाणारी एक छोटी पायवाट होती. गावातील लोक, गुरं, शाळेत जाणारी मुलं सगळेच त्या पायवाटेने सहज ये-जा करायचे.

​त्या झाडाची राखण करण्याची जबाबदारी सीमावर आली होती. घरची परिस्थिती बेताची. वडील मजुरीला जायचे आणि आई घरकामाबरोबर इतरांच्या शेतात काम करायची. सीमाला लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधायची सवय होती. त्या वर्षी आईने सहज म्हटलं होतं, “यावेळी काजू चांगले आलेत. नीट राखण केलीस तर विकून काहीतरी घेता येईल.”

​आईच्या त्या शब्दांनी सीमानं मनात एक छोटंसं स्वप्न बघितलं. तिला सोन्याचं कानातलं घ्यायचं होतं. फार मोठं नाही, अगदी छोटंसं. गावातल्या जत्रेत किंवा लग्नसमारंभात इतर मुली कानातले घालून यायच्या तेव्हा ती नकळत त्यांच्याकडे बघत राहायची. पण घरच्या परिस्थितीत अशी हौस करणं शक्य नव्हतं. यावेळी जर खरंच काजू जमवले, तर कानातलं घे असं आईला सांगता येईल.

​दुसऱ्या दिवसापासून सीमाची काजू झाडाच्या राखणीची मोहीम सुरू झाली. सकाळी लवकर उठून ती त्या पायवाटेने मळ्यावर जायची. उन्हं चढायच्या आधीच झाडाखाली पडलेले काजू गोळा करायची. काही लोक पायवाटेने जाताना सहज थांबून काजू उचलायचे. काहींना ती हसून “घ्या” म्हणायची, तर काही वेळा मन कठोर करून “हे आमचे काजू आहेत” असंही सांगायची.

​झाडाखाली बसून सीमा कितीतरी वेळ घालवायची. वर हिरव्या पानांतून डोकावणारं निळं आकाश, वाऱ्याने हलणाऱ्या फांद्या आणि काजूफळांचा (बोंडांचा) हवेत पसरलेला वास, सगळं किती सुंदर वाटायचं! काही वेळा मैत्रिणी यायच्या. “एवढं काय जपतेस गं?” म्हणून चिडवायच्या. पण तिला माहिती होतं, या काजूंमध्ये तिचं स्वप्न दडलेलं आहे.

​दुपारच्या उन्हात मळा अगदी शांत व्हायचा. दूरवर कुणाच्या बैलांच्या गळ्यातल्या घंटा ऐकू यायच्या. सीमा झाडाच्या सावलीत बसून काजू वेचायची. कधी कावळ्याने खाल्लेला एखादा बोंडू खाली पडायचा. कधी खारुताई फांदीवरून उड्या मारत असताना पिकलेला काजू खाली पडायचा. त्या सगळ्यांत बालपण रमून जायचं.

​घरी आल्यावर सीमाला आई मदत करायची. फळं वेगळी, बिया वेगळ्या. हाताला चिकट रस लागायचा. काही वेळा बोटं काळी पडायची. पण त्या कष्टांतही एक समाधान होतं. खूप दिवसांनी काजूंनी अर्ध पोतं भरलं आणि सीमाला तिचं स्वप्न खरं होणार याची खात्री पटली.

​एकदा संध्याकाळी गावातल्या एका बाईने आईला विचारलं, “कशाला एवढे कष्ट? बाजारात काय भाव मिळणार आहे?”

​आई हसली आणि म्हणाली, “मुलीची हौस आहे. तिच्यासाठी करतेय.”

​आईच्या त्या वाक्याने सीमाचे डोळे भरून आले. त्या दिवसानंतर ती आणखी जास्त मन लावून राखण करू लागली. रात्री झोपताना सुद्धा मनात काजूंचीच गणितं सुरू असायची.

​उन्हाळा संपत आला आणि शेवटी काजू विकायचा दिवस ठरला. वडील पोतं घेऊन बाजारात गेले. दिवसभर सीमा बेचैन होती. किती पैसे मिळतील? कानातलं घेता येईल का? की पुन्हा पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल?

​संध्याकाळी वडील घरी आले तेव्हा त्यांच्या हातात एक छोटीशी कापडी पुडी होती. त्यांनी ती सीमाच्या आईच्या हातात दिली. आईने देवासमोर ठेवून नंतर सीमाला दिली. सीमाने हळूच उघडून आत पाहिलं. त्यांत सोन्याची छोटीशी कानातली चमकत होती. अगदी साधे, छोटेसे झुमके होते.

​क्षणभर सीमा काही बोललीच नाही. आईने प्रेमाने ते झुमके सीमाच्या कानात घातले. आरशात स्वतःकडे पाहताना सीमाला वाटलं, या कानातल्यांत फक्त सोनं नाही, तर उन्हात घालवलेले दिवस, झाडाची राखण, आई-वडिलांचे कष्ट आणि माझं छोटंसं स्वप्न सगळं सामावलेलं आहे.

​त्या दिवशी एक गोष्ट सीमाला समजली, मेहनतीचं फळ किती गोड असतं! सहज मिळालेल्या वस्तूंपेक्षा स्वतःच्या कष्टातून घेतलेली छोटीशी गोष्टही मनाला फार मोठा आनंद देऊन जाते.

​काळ बदलला, परिस्थिती बदलली. पण त्या काजूच्या झाडाखाली घालवलेले दिवस अजूनही सीमाला आठवतात. मळ्यावरची ती पायवाट, उन्हात वेचलेले काजू, आईचा हसरा चेहरा आणि पहिल्यांदा कानात घातलेलं सोन्याचं कानातलं...


- सौ. मंजिरी वाटवे