फ्लॅटमध्ये सामसूम होती. श्री आणि सौ. गोखले दोघेच. वयाची पंचाहत्तरी पार केलेली. ज्या वयात नातवंडांनी घर दणाणून सोडायचं, त्या वयात घरात फक्त घड्याळाच्या काट्याचा आवाज होता. नातवंडे असूनही त्यांच्याजवळ कोणीच नव्हते.
का म्हणता? तर ऐका...
श्रीपाद गोखले आणि मंदाकिनी गोखले यांना संजय नावाचा एकुलता एक मुलगा. शिकून तो सरकारी नोकरीत स्थिरावला. त्याला पत्नीही नोकरी करणारी मिळाली. जरी तिची नोकरी सरकारी नव्हती, तरी पगार चांगला होता.
त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न थाटामाटात झालं आणि सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. लग्नानंतर जेव्हा नवी नवरी पुन्हा कामावर रुजू झाली, तेव्हा नवलाईचे नऊ दिवस अगदी आनंदात गेले.
त्यांची सून म्हणजे स्नेहा. तीही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. लहानपणापासून तिला घरकामाची फारशी सवय नव्हती. तिचा दिनक्रम म्हणजे सकाळी उठून कामावर जाणे, संध्याकाळी घरी परतणे आणि थोडी विश्रांती घेणे. तिची आईदेखील नोकरी करत होती आणि नेहमी म्हणायची, "कामावर जाणाऱ्या माणसालाही विश्रांतीची गरज असते."
स्नेहाचं मत होतं की सासूबाई घरीच असतात, मग चार माणसांचं जेवण करणं एवढं अवघड नाही. त्यामुळे ती स्वयंपाकात फारशी मदत करत नसे. दुसरीकडे, वय झाल्यामुळे सासूबाईंनाही सर्व आवराआवर करताना थकवा यायचा. सुनेने कौतुकाने चार गोष्टी कराव्यात अशी त्यांची अपेक्षा होती, पण नोकरीच्या व्यापातून स्नेहाला ते जमत नव्हते.
यातूनच हळूहळू घरातील वातावरण बदलू लागलं. संध्याकाळी स्नेहा दमून येई. पिशवी टेबलवर ठेवताच सासूबाई पुटपुटत, "आमच्या वेळी नोकरी करून बैलासारखं राबायचो. आजकालच्या पोरींना नुसता AC लागतो." स्नेहा सुसंस्कारी असल्यामुळे ती कधीच उलट उत्तर देत नव्हती. फक्त मान खाली घालून आतल्या खोलीत निघून जायची.
संजय मधेच अडकला होता. आईचा थकवा त्याला दिसत होता, आणि बायकोची दमणूकही कळत होती. "अगं आई, जरा समजून घे तिला" असं म्हणायला जावं तर आईच्या डोळ्यात पाणी. "स्नेहा, थोडी मदत करत जा" म्हणावं तर तिच्या चेहऱ्यावरची मरगळ. तो दोघींमध्ये पूल बांधायचा प्रयत्न करायचा, पण प्रत्येक वेळी पूलच कोसळायचा. शेवटी तोही गप्प बसू लागला.
असेच दिवस जात होते आणि साधारण दोन वर्षांनी स्नेहाच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. तिची आई कॅन्सरने वारली.
स्नेहाचं संपूर्ण आयुष्यच विस्कळीत झालं. तिचा सर्वात मोठा आधार हरपला होता. ती आतून पूर्णपणे कोसळली होती. त्या दिवसांत तिला सासरच्या मायेची, एका शब्दाची गरज होती. पण घरात फक्त नेहमीचीच कामं आणि नेहमीचेच टोमणे होते.
काही महिन्यांनंतर ती गरोदर राहिली. त्या काळात तिला प्रेम, माया आणि आधाराची खूप गरज होती. पण सासूबाई फक्त रोजचा स्वयंपाक करत असत. तिच्या मनाचा विचार करून, तिच्या आवडीचं काही करून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न सासरच्या लोकांकडून कधी झालाच नाही.
जेव्हा तिचं डोहाळे जेवण होतं, तेव्हा बाबांच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्शी रडली. "आई असती तर..." एवढंच बोलू शकली. पण नवीन बाळाच्या आगमनाच्या आनंदाने ती पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत होती.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
बाळ जन्माला आलं, पण जन्मतः असलेल्या अपंगत्वामुळे अवघ्या पाच महिन्यांत त्याचा मृत्यू झाला.
स्नेहाचं संपूर्ण आयुष्यच कोलमडून पडलं. त्या वेळी तिला आईच्या मायेची तीव्र गरज होती. पण आई नव्हती आणि सासू-सासरेदेखील आधार देण्याऐवजी तिलाच टोमणे आणि अपशब्द लावत होते. "काहीतरी पाप केलं असेल मागच्या जन्मी" हे शब्द तिच्या काळजाला घरे पाडून गेले.
ती कशीबशी दिवस ढकलत होती. संजय रात्रभर तिचा हात हातात घेऊन बसायचा. त्याच्याकडे शब्द नव्हते, फक्त अपराधीपणाची जाणीव होती. तो आई-वडिलांना समजावू शकला नाही, बायकोला सावरू शकला नाही.
साधारण एक वर्षानंतर ती पुन्हा गरोदर राहिली. या वेळेलाही तिला सासरकडून विशेष आधार मिळाला नाही. सकाळी उपाशीपोटी कामावर जायची आणि तिथे खानावळीत काहीतरी खाऊन दिवस काढायची.
मध्यंतरी जेव्हा सासूबाई खूप आजारी होत्या, तेव्हा ती सकाळी उठून सगळा स्वयंपाक करून, सासूबाईंना औषध देऊन कामावर जायची. पण सासूबाई बऱ्या झाल्यानंतर जेव्हा तिने शरीराला थकवा असल्यामुळे कामाचा वेग थोडा कमी केला, तेव्हा पुन्हा तेच सुरू झालं, "आता सुनेला आमची काळजी कुठली."
शेवटी खूप विचार करून, रात्री उशिरापर्यंत चर्चा करून स्नेहा आणि संजय यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. संजयला माहित होतं की तो आई-वडिलांना दुखावतोय, पण त्याला आपल्या बायकोला आणि होणाऱ्या बाळाला वाचवायचं होतं. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात ते जवळच एका फ्लॅटमध्ये राहायला गेले.
संजय अधूनमधून आई-वडिलांची चौकशी करून येतो. खिशात पैसे ठेवतो, डॉक्टरकडे नेतो. पण तो आला की घरात फक्त औपचारिक बोलणं होतं. स्नेहाला आता पाच महिन्यांची मुलगी आहे. ती स्वतः तिचं संगोपन करत आहे आणि आपल्या सुखी संसारात आनंदाने जगत आहे. संजयला आता कळलंय की 'संसार' म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, तर माणसांची माया आहे.
आणि आज...
फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर पाहणारे श्री आणि सौ. गोखले, वयाच्या पंचाहत्तरीत एकाकीपणाची शिक्षा भोगत आहेत. शेजारच्या घरातून नातवाच्या रडण्याचा आवाज आला की सौ. गोखले यांचा जीव कासावीस होतो.
कारण अहंकाराने तोडलेली नाती, वेळ निघून गेल्यावर मिळणारा पश्चात्ताप कधीच जोडू शकत नाही. आणि पश्चात्ताप हा मायेची जागा कधीच घेऊ शकत नाही.

- गौरी रोशन वेर्लेकर


