अपेक्षांचे सायलेंट ट्रॅफिक जॅम!

लग्नानंतर अपेक्षांचे सायलेंट ट्रॅफिक जॅम का निर्माण होतात? वेगवेगळ्या भावनिक भाषा आणि बालपणीच्या संस्कारांमुळे दोन व्यक्तींमध्ये होणारे सुप्त संघर्ष मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडणारा आणि 'एम्प्टी चेअर'सारखा प्रभावी उपाय सुचवणारा हा अभ्यासपूर्ण लेख.

Story: मनी मानसी |
29th May, 09:28 pm
अपेक्षांचे सायलेंट ट्रॅफिक जॅम!

“तुला इतकंसुद्धा कळत नाही का?” हे वाक्य आपल्या भारतीय लग्नसंस्थेचं एक अघोषित ब्रीदवाक्य असावं बहुतेक. 

लग्नाआधी प्रत्येकाला वाटत असतं, “हा माणूस मला न बोलताही समजून घेईल” किंवा “ही अगदी मला हवी तशीच आहे.” परंतू डोक्यावर अक्षता पडल्यावर लक्षात येतं की समोरचा माणूस काही वाय-फाय रूटर नव्हे... सिग्नल weak झाला तर स्वतःहून रि-कनेक्ट होईलच असं नाही!

आणि मग सुरू होतो अपेक्षांचं सायलेंट ट्रॅफिक जॅम. 

माझ्या निदर्शनास असं आलंय की बहुतेक वेळा लग्नानंतर पहिल्या काही महिन्यांतच अनेक जोडप्यांना एक जाणीव हमखास होते. ती अशी की, हा आपल्या समोरचा माणूस वाईट नाही. पण “आपल्याला वाटला तसा” ही नाही! उदाहरणार्थ, तो चहा करतो... पण आपल्या आईसारखा नाही. ती काळजी घेते... पण आपल्या कल्पनेतील सिनेमातल्या पत्नीप्रमाणे नाही.

“मी एवढं करते पण त्याला कदरच नाही...”, “मी एवढा धावतो पण तिला ते दिसतच नाही.” ही वाक्ये अनेकदा मोठ्याने बोलली जात नाहीत. ती फक्त मनाच्या कोपऱ्यात साचत राहतात. अशा परिस्थितीत समस्या बहुतेक वेळा प्रेम कमी असल्यामुळे निर्माण होत नाहीत. त्या निर्माण होतात कारण दोन्ही माणसांनी त्यांच्या वेगवेगळ्या ‘इमोशनल स्क्रिप्ट्स’ घेऊन लग्नात प्रवेश केलेला असतो. उदा. एका व्यक्तीसाठी प्रेम म्हणजे जबाबदारी तर दुसऱ्यासाठी प्रेम म्हणजे संवाद. एका व्यक्तीला शांतता म्हणजे जवळीक वाटते तर दुसऱ्याला बोलणं म्हणजे जवळीक वाटते. आणि गंमत म्हणजे दोघेही प्रेमच करत असतात. फक्त त्यांच्या प्रेमाची भाषा वेगळी असते.

आमच्या सायको-अॅनालिटिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपण फक्त आपल्या जोडीदारासोबत नाही तर त्यांच्या बालपणासोबत ही राहत असतो. बघा, लहानपणी ज्याला सतत दुर्लक्षित केलं गेलेलं असतं, तो बहुतांशी मोठेपणी “तू मला वेळ देत नाहीस” याबद्दल जास्त संवेदनशील होतो तर ज्याला लहानपणी सतत टीका ऐकावी लागली, तो लग्नाच्या बंधनात असता साध्या सूचनेलाही “मी पुरेसा नाही” असे समजू लागतो. म्हणूनच अनेक भांडणं वर्तमानात घडत असली, तरी त्यांची मुळे मात्र भूतकाळात असतात.

ह्यावर मानसशास्त्रातल्या ट्रान्झॅक्शनल अॅनालिसिसमध्ये एक सुंदर संकल्पना आहे ती म्हणजे आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात नेहमीच ‘पॅरेंट’, ‘अॅडल्ट’ आणि ‘चाइल्ड’ अशा मानसिक अवस्थांमधून वागत असतो.

उदाहरणार्थ, पत्नी म्हणते “तू मला फोन का केला नाहीस?” वरकरणी हा साधा प्रश्न वाटतो. पण आत खोलवर तिच्या ‘इनर चाइल्ड’ला कदाचित विचारायचं असतं, “मी तुझ्यासाठी महत्त्वाची आहे का?”

पण नवरा हे ऐकत नाही. त्याला फक्त आरोप ऐकू येतो. मग तो ‘डिफेन्सिव्ह पॅरेंट मोड’ मध्ये जातो, “मी एवढं काम करतो, ते दिसत नाही का?”

आणि मग दोन प्रौढ माणसांचं ते संभाषण राहत नाही. तर ते दोन जखमी बालमनांचं युद्ध बनतं. इथेच ‘एम्प्टी चेअर टेक्निक’ फार प्रभावी ठरते.

समोर एक रिकामी खुर्ची ठेवायची. कल्पना करायची की त्या खुर्चीत तुमचा जोडीदार बसलाय. आधी स्वतःच्या जागेवरून बोलायचं. राग. दुख. अपेक्षा. निराशा. मग शांतपणे खुर्ची बदलायची.

आता तुम्ही “तुम्ही” नसता. तुम्ही समोरची व्यक्ती असता. आणि इथे नकळतच एक फार खोल मानसिक बदल घडतो. आपल्याला अचानक जाणवतं की ज्याला आपण उद्धटपणा समजत होतो, तो कदाचित भावनिक थकवा होता किंवा ज्याला आपण दुर्लक्ष करणे समजत होतो, ती कदाचित प्रेम व्यक्त करण्याची एक वेगळी पद्धत होती.

एका सत्रात एका स्त्रीने खुर्ची बदलल्यानंतर अचानक मला म्हटलं होतं, “कदाचित तो शांत असतो कारण त्याला भांडणाची भीती वाटत असेल” आणि तेच त्यांच्या नात्याचं पहिलं खरं संभाषण ठरलं.

इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की हे का होतं कारण आपण अनेकदा एका व्यक्तीशी लग्न करत नाही तर आपल्या कल्पनेतील ‘ideal partner’ शी लग्न केलेलं असतं.

आणि ह्यात अपेक्षाभंग म्हणजे काय? तर वास्तवाने आपल्या कल्पनाशक्तीला दिलेला पहिला धक्का आणि एम्प्टी चेअर टेक्निक हा धक्का soften करावयास मदत करते. ती आपल्याला शिकवते की समोरची व्यक्ती शत्रू नव्हे तर तीसुद्धा आपल्यासारखीच स्वतःच्या भावनिक इतिहासाशी झुंजतेय. त्यामुळे एकमेकांना समजणे सोपे होते. 

शेवटी काय, एक सुखी लग्न म्हणजे अजिबातच कलह नसलेलं नातं नाही तर असं नातं असतं जिथे दोन माणसं अधूनमधून स्वतःची अहंभावाची खुर्ची सोडून, परस्परांच्या दृष्टीकोनातून ह्या नात्याकडे बघायला तयार असतात. कारण अनेकदा समस्या व्यक्ती नसते. समस्या असते त्यांच्या वागण्यामागची काही कारणं. एकदा त्यांची उकल केली की लग्नाची गाडी जोरात धावलीच म्हणून समजा, काय बरोबर ना? 



- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा 
७८२१९३४८९४