महाराष्ट्रात काँग्रेसची दमछाक !

भाजपला शह देण्याचे राजकारण एकनाथ शिंदे खेळत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. सध्या भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षात शह-काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Story: विचारचक्र |
04th May, 09:11 pm
महाराष्ट्रात काँग्रेसची दमछाक !

गेले आठवडाभर महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक व उमेदवारांची रस्सीखेच हा विषय चर्चिला गेला होता. या दहा जागेत सर्वात बाजी मारली ती भाजपने, सहा जागा जिंकल्या. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसची अवस्था अत्यंत दारुण झाली. बारामती विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. एवढेच नाही तर उमेदवारीचा अर्जही भरला. त्यानंतर माघार घेतली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळीही हीच अवस्था काँग्रेसची झाली. काँग्रेसचे १६ आमदार असताना आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) १० आमदार असताना त्यांना राज्यसभेची जागा देऊ नये, अशी भूमिका जगताप यांनी घेतली. शेवटी शरद पवारांच्या उमेदवारीमुळे जगतापांना माघार घ्यावी लागली. हे दोन प्रकार झाल्यानंतर तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. मात्र त्यानंतर बाजी पालटली. उद्धव ठाकरे ऐवजी अंबादास दानवे हे नाव पुढे आले. त्यावरही काँग्रेसने आदळआपट केली. शेवटच्या तासापर्यंत विधान परिषदेची एक जागा काँग्रेस लढविणार असे जाहीर करण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी माशी शिंकली आणि काँग्रेसने अंबादास दानवे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे जाहीर केले. एवढेच कशाला आदल्या दिवशी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दानवे यांच्या उमेदवारीस प्रश्नचिन्ह उपस्थित करून काँग्रेस ही जागा लढविणार असे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार हेच दानवे यांच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी पुढे होते. एकूण या तिन्ही घटनांमुळे काँग्रेसची अवस्था 'ना घर की ना घाट की' अशी झाली आहे.

विधान परिषदेवर उबाठा शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचे नाव महाविकास आघाडीतर्फे निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर नेमकी काय झाले हे कळले नाही. कारण उद्धव यांनी आपले नाव मागे घेऊन दानवे यांचे नाव पुढे आणले. काँग्रेसने उद्धव यांच्या उमेदवारास पाठिंबा दिला होता, दानवेंच्या नाही. दरम्यान राष्ट्रवादीने (शरद पवार) दानवे यांच्या उमेदवारीस पाठिंबा जाहीर केल्याने अखेर काँग्रेसने दानवे यांना अटी व शर्ती टाकून पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. पण याच्या मागे मुख्य बाब म्हणजे शिंदे यांचे राजकारण, या सर्व खेळीमध्ये भाजपने आपले पाच व सहावा उमेदवारही निवडून आणून प्रज्ञा सातव यांचाही मार्ग सुकर केला.

प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा रिक्त झाल्याने भाजपने प्रज्ञा सातव याना तिकीट देऊन बिनविरोध निवडून आणले. भाजपने विधान परिषदेच्या ९ जागांच्या वेळी प्रज्ञा सातवचे दहावे पोटनिवडणूक जाहीर केली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या व बाजी मारली. याचबरोबर महायुतीचे तीन उमेदवार निवडून आल्याने विधान परिषदेचे संख्याबळ वाढले. यातून काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसचे बंटी पाटील यांना देण्याचे होत होते. राज्यसभा निवडणुकीनंतर हे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला दिले जाईल असे म्हटले जात होते मात्र आता काँग्रेसची ती आशाही मावळल्याचे दिसून येत आहे. यातूनच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. राज्यसभा, बारामती पोटनिवडणूक त्यानंतर विधान परिषदेची जागा न मिळणे व चौथे अपयशाचे कारण म्हणजे विरोधी पक्षनेते पद गमावल्याची स्थिती निर्माण होणे, हे पाहता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जे म्हटले आहे, त्याला पुष्टी मिळत आहे. काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी हे काँग्रेस पक्षात अस्वस्थ असून ते लवकरच भाजप पक्षात प्रवेश घेऊ शकतील, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. त्याची सुरुवात झाली आहे. इतर घटक पक्षांची अवस्था काय आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरचढ होऊ पाहत आहेत. समृद्धी महामार्ग व मुंबई-पुणे मिसिंग लिंकची कल्पना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती.

प्रहार ही संघटना शिवसेनेमध्ये विलीन झाली. असे म्हटले जात असले तरी कडू यांनी मात्र सामाजिक सेवेसाठी प्रहार ही संघटना काम करील असे जाहीर केले आहे. एका पक्षात काम करत दुसरे शस्त्र ही ताब्यात ठेवणे हे दबावाचे राजकारण असू शकते, ते राजकारण बच्चू कडू खेळतात की काय हे लवकरच कळेल.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने पराभूत झालेल्या उमेदवारास विधान परिषदेवर दिल्याचे दिसून येते. बाबा सिद्दीकी हा एक आक्रमक चेहरा होता. त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव झिशान सिद्धीकी हे राजकारणात आले. पराभूत उमेदवारास उमेदवारी देण्यात येणार नाही असे जाहीर झाले असतानाही अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येही नाराजी पुढे आली आहे. एकूण भाजप वगळता सर्व राजकीय पक्षात नाराजीनाट्य काही संपत नाही. काँग्रेस पक्ष तर नगण्य झाला आहे. सत्ताधारी एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावरफुल होत आहेत. बच्चू कडू यांना जवळ केल्याने अमरावती विभागात पक्षबळ वाढू शकते. भाजपने रवी राणा व नवनीत राणा यांना शह देण्यासाठी बच्चू कडूंचा आक्रमक चेहरा शिंदे शिवसेनेला भारी पडू शकतो. पक्षाचे जाळे विदर्भात पोहोचवण्यासाठी कडू यांचा उपयोग शिंदे करू इच्छितात. कडू यांचा आक्रमक स्वभाव हा शिंदेंना प्रभाव दाखवू शकतो. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही कडू यांच्यामुळेच मिळाली, तर कडू यांच्यामुळे दिव्यांग विभाग स्वतंत्र निघू शकला आणि त्याचा उपयोग शिंदे करू इच्छितात आणि म्हणूनच ऑफर देऊन कडू यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे यांची ही चाल प्रभावी वाटत आहे. असे असले तरी भाजपला शह देण्याचे राजकारण हे शिंदे खेळत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सध्या भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षात शह-काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नव्या मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद सुरू आहे तर इकडे मीरा-भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता विरुद्ध शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. साताऱ्यामध्ये तर शंभूराज देसाई हे मंत्री रस्त्यावर उतरल्याने राजकारण तापले होते. त्यांना बळ देण्यासाठी शिंदे यांनी सातारा येथे जाऊन जाहीर सभाही घेतली. एक मात्र निश्चित की भाजपचा वळू हा पश्चिम महाराष्ट्रात उधळला जात आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे काँग्रेसचे गड असायचे; परंतु सध्या हे गड संपले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले, तर इकडे बाळासाहेब थोरात हे संगमनेर विभागातून पराभूत झाले. ही सर्व पार्श्वभूमी पाहता काँग्रेसची अवस्था सर्वच पातळीवर अत्यंत दयनीय झाली आहे.


- अरविंद भानुशाली