काश पटेल : सत्तेच्या वर्तुळातील वादळ

Story: विश्वरंग |
05th May, 11:06 pm
काश पटेल : सत्तेच्या वर्तुळातील वादळ

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक एफबीआयचे प्रमुख म्हणून काश पटेल यांचे नाव जितक्या वेगाने चर्चेत आले, तितक्याच वेगाने त्यांच्याशी संबंधित वादांनी वॉशिंग्टनचे राजकीय वातावरण तापवले आहे. अलीकडेच त्यांच्यावर बेजबाबदार वर्तन आणि मद्यपानाचे गंभीर आरोप झाले असून, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान त्यांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरणही द्यावे लागले. तरीही, नियमांची पर्वा न करता स्वतःच्याच धुंदीत जगणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा कायम आहे.

पटेल यांच्या आयुष्यातील सर्वात रंजक पैलू म्हणजे त्यांची ‘कोच काश’ ही ओळख. वकिलीच्या काळात ते स्थानिक हायस्कूलच्या हॉकी संघाला प्रशिक्षण देत. अनेकदा व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनमधील अत्यंत महत्त्वाच्या बैठका संपवून ते थेट सूटमध्येच हॉकी रिंकवर पोहोचत असत. मात्र, खेळाबद्दलची हीच ओढ त्यांच्यासाठी अडचणीची ठरली, जेव्हा मिलान ऑलिम्पिकदरम्यान ते अमेरिकन खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये बिअर पिताना आढळले. याशिवाय, गर्लफ्रेंडसाठी सरकारी विमानांचा वापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मियामीमधील सरकारी वकील असतानाच्या त्यांच्या आठवणी आजही अनेकांच्या चर्चेचा विषय असतात. भारतातून खास शिवून घेतलेले चकचकीत सूट आणि त्यासोबत घातलेले रंगीबेरंगी, विचित्र नमुन्यांचे मोजे यामुळे त्यांची नेहमीच थट्टा केली जात असे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पटेल यांनी एकदा निधी गोळा करण्यासाठी चक्क स्वतःला ‘एलिजिबल बॅचलर’ म्हणून लिलावासाठी सादर केले होते. एवढेच नव्हे तर, मुलांसाठी लिहिलेल्या ‘द प्लॉट अगेन्स्ट द किंग’ या पुस्तकात त्यांनी स्वतःची प्रतिमा एका जादूगाराच्या रूपात रेखाटली आहे.

काश पटेल यांच्या मुळांचे नाते युगांडा आणि भारताशी आहे. १९७० च्या दशकात त्यांचे वडील प्रमोद पटेल हुकूमशहा इदी अमीनच्या तावडीतून सुटून अवघ्या एका सूटकेससह न्यूयॉर्कला पोहोचले होते. याच संघर्षातून प्रेरणा घेत काश यांनी आपली कारकीर्द घडवली. आज त्यांनी स्वतःचा ‘K$H’ हा पर्सनल ब्रँडही बाजारात आणला असून, त्याद्वारे ते कपड्यांपासून वाइनपर्यंतची उत्पादने विकतात. यातून मिळणारा नफा ते ‘काश फाउंडेशन’ला देतात, मात्र या व्यावसायिकतेवरूनही अनेकदा नैतिक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. एकंदरीत, काश पटेल यांचा प्रवास हा सत्ता, संघर्ष आणि अतरंगी जीवनशैलीचा एक विचित्र मिलाफ आहे, जो त्यांना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवतो.

- सचिन दळवी