वन्यजीवांना पेयजलाची सोय होईल, यादृष्टीने वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करून, पिण्याचे पाणी गरजेनुसार उपलब्ध करून दिले पाहिजे. बऱ्याचदा पेयजल आणि आवश्यक खाद्यान्न उपलब्ध नसल्याने, गव्यासारखे प्राणी अन्न-पाण्याच्या शोधार्थ गावाकडे जाताना दिसत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून भारतभरातला उन्हाळा तापदायक असणे ही बाब वार्षिक बनलेली असून, मानवी समाजाबरोबर समस्त प्राणिमात्रांचे जीवन उष्माघाताच्या तीव्र लाटात अक्षरशः होरपळून निघत असते. यंदाच्या वर्षी तर चक्क फेब्रुवारीपासून देशभरासहीत उन्हाळ्याच्या झळा सोसण्याची पाळी गोवा आणि शेजारच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांवर आलेली आहे. नदीनाले, तळी, तलाव, झरे याबरोबर नैसर्गिक जलस्रोत शुष्क पडण्याच्या प्रक्रियेत उन्हाळा ऐन भरात असताना मे महिन्यात पूर्वी वाढ व्हायची. परंतु यंदा गोवा आणि कोकणातील नदीनाल्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झालेली असून, पूर्वाश्रमीच्या बारामाही प्रवाहित राहणाऱ्या गोड्या पाण्याच्या नद्या मान्सूनच्या पावसाळ्यानंतर कोरड्या पडू लागलेल्या आहेत. एकेकाळी नदीनाल्यांच्या जलसंचय क्षेत्रातील जंगल सहसा कोणी तोडण्यास धजत नसे आणि त्यामुळे हे नदीनाले बारामाही प्रवाहित राहून, त्या त्या परिसरातील जलसिंचन सुविधेला हातभार लावत असत. परंतु आज जलसंचय क्षेत्रातील जंगलांवर सराईतपणे कुऱ्हाड चालवली जात असल्याने, पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या गोड्या पाण्याच्या बऱ्याच नद्यांची भूगर्भात पाणी धारण करण्याची क्षमता झपाट्याने कमी होऊ लागली आहे आणि त्याचे दुष्परिणाम वृक्षवेली आणि वन्यजीवांना भोगण्याची पाळी आलेली आहे.
यंदाच्या मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या झळा तीव्र होण्याच्या प्रक्रियेत वाढ झालेली असून, एप्रिल महिन्यात तर महाराष्ट्रातील काही भागातील किमान तापमानाने ४० सेल्सिएसचा टप्पा ओलांडलेला असून, काही ठिकाणी विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट होऊन अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मारा होऊन मोसमी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाल्याने, ते हवालदिल झालेले आहेत.
२०२६ चा उन्हाळा तीव्र उष्णतेचा असल्याची शक्यता यापूर्वी हवामान खात्याने व्यक्त केलेली असून, मार्चपासून किमान तापमान वाढले ते एप्रिलातसुद्धा चढत्या क्रमाचे राहिलेले आहे. देशभरात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेचे चटके सोसण्याची पाळी बऱ्याच मोठ्या लोकसंख्येच्या वाटेला आलेली आहे. यंदा प्रशांत महासागरातील बदलामुळे उन्हाळा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुसह्य होणार असल्याचे संकेत होते. परंतु याच आठवड्याच्या प्रारंभी महाराष्ट्रातील अकोल्यापाठोपाठ अमरावती, विदर्भ, चंद्रपूर येथील तापमानात कमालीची वाढ झाली असून, त्याचे चटके या परिसरातील लोकांना जाणवू लागलेले आहेत. तापमान वाढीचे संकट माथ्यावर असताना, त्यात भर म्हणून उन्हाळात त्याचे चटके मोठ्या प्रमाणात सोसण्याची पाळी लोकांवर आलेली आहे. दरवर्षी जेव्हा उन्हाळ्यात तापमान वाढू लागते, तेव्हा विजेच्या पुरठ्यावर आधारित पंखे, वातानुकूलीन यंत्रणेच्या मागणीपायी प्रचंड ताण येतो. धरणाच्या जलाशयातील उपलब्ध पाण्याच्या साठ्यात घट होत असल्याने, शेती, बागायतीच्या जलसिंचन पुरवठ्याच्या सुविधेवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि बागायतदार यांच्या लागवडीला सिंचन सुविधा व्यवस्थित होत नसल्याकारणाने नुकसानी सोसावी लागत असते.
२०१५ ते २०२५ या दशकभरात तापमानात कमालीची वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेले. ही वाढ १७५ वर्षांच्या इतिहासातील लक्षणीय ठरलेली आहे. २०२४ हे इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले असून, त्यापाठोपाठ २०२५ या वर्षाचा क्रम लागलेला आहे. २०२५ च्या फेब्रुवारी ते जुलै या कालखंडात भारतभर ८४ लोकांचा मृत्यू उष्माघाताच्या लाटेत झाल्याची नोंद असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांत उष्माघातापायी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. महाराष्ट्रात १७ लोकांचा मृत्यू उष्माघाताने उद्भवल्याची नोंद आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात उन्हाळात अवकाळी पावसाच्या पायी काही भागांतील लोकांच्या पिकांची नासधूस होण्याचे प्रमाण जसे लक्षणीय आहे, तसेच काही ठिकाणी उष्माघातामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडण्याचे तसेच उष्माघातामुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांचे प्रमाणही चिंताजनक आहे.
यंदा भारतभरातील डोंगरभागात उन्हाळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हिमालय, ईशान्य भारतातील प्रदेशात त्याचप्रमाणे पश्चिम घाटातील डोंगर प्रदेशात उन्हाळ्याचे दुष्परिणाम दरवर्षीपेक्षा यंदा प्रकर्षाने जाणवतील. उन्हाळ्यात कोरडेपणा प्रकर्षाने जाणवू लागल्याने, यंदा दुष्काळ, जलस्त्रोत शुष्क पडणे, जंगलातील वणवे लागून वन्यजीवांना प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याबरोबर, उष्माघातविषयक विकारात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून डोंगराळ प्रदेशातील उन्हाळा असह्य होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, पूर्वीच्या तुलनेत झरे, विहिरी, तळ्या कोरड्या पडण्याचे प्रमाणही वाढत असल्याने तेथील जलसिंचनाच्या पुरवठ्याबरोबर पेयजलाची समस्याही इथे प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. यंदा ही समस्या उन्हाळा प्रखर होणार असल्याने, आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा आला की जंगलांना आगी लागण्याच्या आणि काहीवेळा हेतुपुरस्पर त्या लावण्याच्या प्रकारांत वाढ होत असल्याने, या संकटाला सामोरे जाण्याची पूर्वतयारी वन खात्यातर्फे केली जात नसल्याने, जंगल संपदेचे आणि वन्यजीवांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यंदा पश्चिम घाटात उन्हाळ्याची तीव्रता वाढणार असल्याचा जो अंदाज व्यक्त केलेला आहे, त्याची दखल घेऊन, वन खात्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, उद्भवणाऱ्या प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतपारी करणे गरजेचे आहे. वन्यजीवांना पेयजलाची सोय होईल, यादृष्टीने वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करून, पिण्याचे पाणी गरजेनुसार उपलब्ध करून दिले पाहिजे. बऱ्याचदा पेयजल आणि आवश्यक खाद्यान्न उपलब्ध नसल्याने, गव्यासारखे प्राणी अन्न-पाण्याच्या शोधार्थ गावाकडे जाताना दिसत आहेत. सदाहरित जंगल आणि बारामाही पाणी उपलब्ध असणाऱ्या प्रदेशात वास्तव्य करणारा भूजंग (किंग कोब्रा) मानवी वस्तीकडे अन्न-पाण्याच्या शोधार्थ वळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा एप्रिलच्या मध्यावर उन्हाळा प्रखर झालेला असून, सध्या आणि आगामी काळात, त्याची प्रखरता वाढणार असल्याचे लक्षात घेऊन आवश्यक पूर्वतयारी आणि नियोजनबद्ध उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. उपलब्ध सौर उर्जेचा वापर पंखे आणि अन्य स्वयंचलित उपकरणे कार्यान्वित करण्यासाठी वापरणे शक्य आहे. मसालेदार, चमचमीत आहाराऐवजी पालेभाज्या सेवन, सरबते प्राशन आणि पौष्टिक मोसमी अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे उचित ठरेल. उन्हाळ्याला सामोरे जाण्याची मानसिकता आपल्याकडे निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.

- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५