
देशभरात सध्या भीषण उष्णतेची लाट उसळली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने ५० अंश सेल्सिअसचा उंबरठा गाठला आहे. वाढती जंगलतोड, कमी होत चाललेले हरित क्षेत्र आणि बिघडत चाललेले पर्यावरणीय संतुलन ही या संकटामागची प्रमुख कारणे आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. दरम्यान, क्रिकेटच्या सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक असलेल्या आयपीएल २०२६ मध्ये पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली राबवण्यात येणाऱ्या ‘ग्रीन क्रेडिट’ मोहिमेकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष गेले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत प्रत्यक्षात किती झाडे लावली गेली आणि ती नेमकी कुठे आहेत, हा प्रश्न आता अधिक तीव्र होत आहे.
बीसीसीआय आणि टाटा समूहाने २०२३ पासून ‘ग्रीन क्रेडिट’ उपक्रम सुरू केला. या मोहिमेनुसार आयपीएलच्या सामन्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूमागे म्हणजेच ‘डॉट बॉल’मागे ५०० झाडे लावली जाणार असल्याचा दावा करण्यात आला. या उपक्रमाची जाणीव प्रेक्षकांना करून देण्यासाठी सामन्यादरम्यान स्कोअरबोर्डवर नेहमीच्या ठिपक्याऐवजी ‘हिरवे झाड’ दाखवले जाते. अधिकृत आकडेवारीनुसार, या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६ लाख २७ हजारांहून अधिक झाडे लावल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ही झाडे प्रत्यक्षात कुठे आहेत, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. बीसीसीआयच्या अहवालानुसार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ओसाड जमिनींवर ही झाडे लावण्यात आली. याशिवाय मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ‘मियावाकी’ पद्धतीने छोटी पण दाट शहरेवने उभारल्याचेही सांगण्यात आले. जाहिरातींमध्ये केरळ, आसाम आणि गुजरात या राज्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या सर्व दाव्यांना पुष्टी देणारे ठोस पुरावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. आजच्या डिजिटल युगात इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाल्याचा दावा केला जात असेल, तर प्रत्येक प्रकल्पाचे जिओ-टॅगिंग, छायाचित्रे, स्थाननिहाय अहवाल आणि झाडांच्या वाढीची माहिती सार्वजनिक असणे अपेक्षित मानले जाते. परंतु ६ लाखांहून अधिक झाडांचे अचूक अक्षांश-रेखांश, प्रत्यक्ष छायाचित्रे किंवा स्वतंत्र पडताळणी अहवाल उपलब्ध नसल्याने हा उपक्रम केवळ जाहिरातीपुरताच मर्यादित आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. केवळ टीव्ही जाहिराती किंवा स्कोअरबोर्डवरील हिरवा ठिपका यावरून इतक्या मोठ्या मोहिमेची सत्यता सिद्ध होऊ शकत नाही, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावरून पर्यावरणाचा संदेश दिला जाणे ही सकारात्मक बाब मानली जाऊ शकते. मात्र, अशा मोहिमांचे यश केवळ घोषणांनी नाही तर पारदर्शक अंमलबजावणी, सार्वजनिक अहवाल आणि प्रत्यक्ष परिणामांवर ठरत असते.
- प्रवीण साठे