हा केवळ एका अभिनेत्याचा राजकीय प्रवास नाही; तर तो तामिळनाडूतील बदलत्या राजकीय संस्कृतीचा संकेत आहे. राष्ट्रीय राजकारणासाठीही ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते.

दक्षिण भारतातील राजकारण नेहमीच वेगळ्या वळणांनी पुढे सरकत आले आहे. तामिळनाडू तर विशेषतः व्यक्तिमत्त्वाधारित राजकारण, प्रादेशिक अस्मिता, भाषा-अभिमान आणि सिनेसृष्टीच्या प्रभावासाठी ओळखले जाते. आता पुन्हा एकदा त्या राज्यात मोठी राजकीय घडामोड घडताना दिसली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय पेच, द्रमुक-काँग्रेसमधील तणाव, अण्णाद्रमुकची कमकुवत होत चाललेली ताकद आणि जनतेत वाढत असलेली अस्वस्थता यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत विजय या अभिनेता-राजकारणी नेतृत्वाचा मार्ग शुक्रवारी संध्याकाळी मोकळा झाला. विजय यांनी आपल्या समर्थकांच्या नावांसह राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतल्यावर तामिळनाडूच्या राजकारणातील गुंता सुटला असे म्हणावे लागेल. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या मुख्यमंत्रिपदाची शपथविधीची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे विजय हेही शनिवारी सकाळी शपथ घेतील असे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी पश्चिम बंगालमध्ये कोणताही राजकीय पेच नव्हता, याउलट तामिळनाडूकडे जनतेचे अधिक लागले होते. द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षांना नव्या पक्षाने दिलेला धक्का सर्वांच्याच दृष्टीने अनपेक्षित आहे. तामिळनाडूतील मतदार हा भावनिक असला तरी तो अत्यंत राजकीयदृष्ट्या जागरूक आहे. सिनेमा आणि राजकारण यांचा संबंध तिथे नवीन नाही. एमजीआर, जयललिता यांच्यानंतर आता विजय यांच्याकडे नव्या पिढीचा करिष्माई चेहरा म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी, सोशल मीडियावरील प्रभाव, युवकांमध्ये निर्माण झालेली आकर्षणाची लाट आणि भ्रष्टाचारविरोधी भाष्य यामुळे त्यांनी पारंपरिक पक्षांना अस्वस्थ केले आहे.
द्रमुक सरकारविषयी वाढणारी नाराजी ही विजय यांच्या उदयामागची सर्वांत मोठी पार्श्वभूमी आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काही कल्याणकारी योजना राबवल्या असल्या तरी बेरोजगारी, उद्योगांचे स्थलांतर, पायाभूत सुविधांतील विस्कळीतपणा आणि घराणेशाहीचे आरोप यामुळे जनतेचा एक वर्ग नाराज आहे. विशेषतः युवक आणि मध्यमवर्गाला नवा पर्याय हवा होता. काँग्रेससोबतच्या मतभेदांमुळे द्रमुकची प्रतिमा आणखी ढासळली असून विरोधक विखुरलेले असतानाच विजय यांनी स्वच्छ आणि नव्या राजकारणाचा संदेश दिला. दुसरीकडे अण्णाद्रमुक अजूनही नेतृत्वाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर आलेली नाही. पक्षातील गटबाजी, कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि जुने जनाधार टिकवण्यात आलेले अपयश यामुळे अण्णाद्रमुक प्रभावी पर्याय बनू शकले नाहीत. भाजपने दक्षिणेत पाय रोवण्याचा प्रयत्न केला; परंतु तामिळ अस्मितेच्या प्रश्नावर त्यांना अजून व्यापक स्वीकार मिळालेला नाही. या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये विजय यांना तिसरा पर्याय म्हणून प्रचंड जागा मिळाल्या आणि अन्य पक्षांच्या अवाजवी मागण्या मान्य करत सत्ताग्रहणाचा निर्णय विजय यांनी घेतल्याचे दिसून येते.
विजय यांच्या राजकारणातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःची प्रतिमा केवळ अभिनेता म्हणून मर्यादित ठेवली नाही. त्यांनी समाजकारण, विद्यार्थ्यांशी संवाद, शैक्षणिक मदत, पूरग्रस्तांसाठी मदतकार्य आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका यांमधून जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची शैली आक्रमक नसून भावनिक आणि संवादप्रधान आहे. त्यामुळे पारंपरिक राजकीय भाषणांपेक्षा त्यांचे बोलणे युवकांना अधिक जवळचे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांमध्ये बदल हवा ही भावना तीव्र होत चालली होती. देशातील अनेक राज्यांत गेल्या दशकात प्रस्थापित राजकीय घराण्यांविरोधात मतदारांनी नवीन नेतृत्व स्वीकारले. तामिळनाडूतही तशीच मानसिकता दिसते. विजय यांच्यासमोर आव्हानेही कमी नाहीत. लोकप्रिय अभिनेता असणे आणि यशस्वी प्रशासक होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राज्याची अर्थव्यवस्था, उद्योग, पाणीटंचाई, केंद्र-राज्य संबंध, भाषा प्रश्न, सामाजिक समतोल आणि रोजगारनिर्मिती या प्रश्नांवर ठोस धोरण मांडावे लागेल. केवळ करिष्म्यावर निवडणूक जिंकता येईल; पण राज्य चालवण्यासाठी सक्षम संघटना, अनुभवी सहकारी आणि प्रशासकीय दृष्टी आवश्यक असते. तरीही विजय यांच्या उदयाचे महत्त्व कमी होत नाही. कारण हा केवळ एका अभिनेत्याचा राजकीय प्रवास नाही, तर तो तामिळनाडूतील बदलत्या राजकीय संस्कृतीचा संकेत आहे. राष्ट्रीय राजकारणासाठीही ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते. दक्षिण भारतातील प्रादेशिक पक्षांचे समीकरण, केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे गणित आणि विरोधकांची रणनीती यावर त्याचा परिणाम होईल. जर विजय यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले, तर ते केवळ तामिळनाडूपुरते मर्यादित राहणार नाहीत; तर राष्ट्रीय स्तरावरही नव्या पिढीचे प्रादेशिक नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात.