युरोपमध्ये ८४ हजार अमेरिकी सैनिक तैनात

Story: विश्वरंग - युरोप |
08th May, 11:05 pm
युरोपमध्ये ८४ हजार अमेरिकी सैनिक तैनात

युरोपमध्ये अमेरिकेची मोठ्या प्रमाणावर लष्करी उपस्थिती असून, विविध संशोधन संस्थांच्या माहितीनुसार तेथे अमेरिकेचे डझनावारी लष्करी तळ कार्यरत आहेत. या तळांवर ८० हजारांहून अधिक अमेरिकी सैनिक तैनात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपच्या सुरक्षेचा कणा मानली जाणारी अमेरिकन लष्करी उपस्थिती आजही कायम असून, ती मुख्यतः जर्मनी, इटली, ब्रिटन आणि पोलंडमध्ये केंद्रित आहे.

कौन्सिल ऑन फॉर्रेन रिलेशन्स यांच्या माहितीनुसार, २०२५ च्या सुरुवातीस युरोपमध्ये सुमारे ८४ हजार अमेरिकी सैनिक तैनात होते. प्रशिक्षण मोहिमा आणि बदलत्या तैनातीमुळे ही संख्या वेळोवेळी वाढत-घटत असते. युक्रेन युद्धानंतर पूर्व युरोपमध्ये अतिरिक्त सैनिक पाठवण्यात आल्याने ही संख्या ७५ हजार ते १ लाख ५ हजारांच्या दरम्यान पोहोचल्याचे अमेरिकी संशोधन संस्थांनी नमूद केले आहे.

युरोपमधील अमेरिकेचे सर्वात मोठे लष्करी केंद्र जर्मनीमध्ये आहे. येथे असलेला रामस्टीन हवाई तळ हा अमेरिकेबाहेरील सर्वात मोठा अमेरिकी हवाई तळ मानला जातो. याशिवाय स्टटगार्ट येथे अमेरिकेच्या युरोपियन लष्करी कमांडचे मुख्यालय, तर विस्बाडेन येथे युरोप आणि आफ्रिकेसाठी अमेरिकी सेनेचे मुख्यालय आहे. ग्राफेनव्होहर आणि होहेनफेल्स या भागांमध्ये मोठी प्रशिक्षण केंद्रे असून, जर्मनीत सुमारे ३८ हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. त्यांच्यासोबत हजारो नागरिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही तेथे निवास आहे.

सैन्य तळांच्या संख्येनुसार इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे पाच अमेरिकी तळ असून, आवियानो हवाई तळ हा सर्वात महत्त्वाचा तळ मानला जातो. हा तळ उत्तर इटलीत वेनिसपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे आणि नेटोच्या दृष्टीने अत्यंत रणनीतिक महत्त्वाचा मानला जातो. येथे सुमारे साडेआठ हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. याशिवाय कॅम्प डार्बी, विसेन्झामधील कॅम्प एडरले, सिसिलीतील सिगोनेला नौदल तळ आणि नेपल्समधील नौदल कमांडमुळे भूमध्य समुद्र परिसरात इटली अमेरिकेसाठी महत्त्वाचे लष्करी केंद्र ठरले आहे.

युरोपमध्ये अमेरिकी सैन्याची तैनाती मुख्यतः चार प्रकारे केली जाते. यात कायमस्वरूपी तैनात सैनिक, रोटेशन पद्धतीने तैनात सैनिक, नेशनल गार्ड भागीदारी कार्यक्रम आणि अल्पकालीन संयुक्त युद्धाभ्यासासाठी पाठवण्यात येणाऱ्या तुकड्यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, जगभरातील अमेरिकी लष्करी तळ हे संरक्षण, कूटनीती आणि मानवीय मोहिमांचे केंद्र आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये सुरू झालेली अमेरिकेची लष्करी उपस्थिती आता युरोपच्या सामूहिक सुरक्षा व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली आहे.

- सुदेश दळवी